पीयूष गोयल केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री

‘इंडियन एक्स्प्रेस’ समूह आणि ‘लोकसत्ता’ नेहमीच चांगल्या संकल्पनांना वर्षानुवर्षे प्रोत्साहित करीत आहे. नवसंकल्पना आणि उमेदीने वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या तरुणांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘तरुण तेजांकित’ पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले तरुण राज्यातील ग्रामीण भागासह कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. गरीब किंवा मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेल्या या तरुणांची त्यांच्या क्षेत्रांमधील कामगिरी अतिशय उत्कृष्ट असून त्यातून मलाही नवी ऊर्जा व ऊर्मी मिळाली आहे. त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा ‘लोकसत्ता’चा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.

मी या उपक्रमामुळे अतिशय प्रभावित झालो आहे. आतापर्यंत मी अनेक पुरस्कार वितरण कार्यक्रमांना गेलो, पण असा कार्यक्रम कधी पाहिला नाही. पुरस्कार विजेते तरुण हे कोणतेही आडनाव किंवा घराण्यामुळे पुढे आलेले नसून आपल्या कर्तबगारीने ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत. हे तरुणच देशाचे भविष्य असून त्यांच्या हाती देश सुरक्षित आहे, असा मला विश्वास आहे.

देशाची अर्थव्यवस्था १० वर्षांपूर्वी अतिशय नाजूक अवस्थेत होती व ती जगात ११ व्या क्रमांकावर होती. पण गेल्या १० वर्षांत आर्थिक धोरणे बदलल्यावर देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणूक वाढली. उद्याोगांना चालना मिळाली आणि देशाची अर्थव्यवस्था आज जगात पाचव्या क्रमांकावर गेली आहे. देशाच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये १०० वर्षे होतील, तेव्हा भारताची गणना जगात विकसित राष्ट्र म्हणून होईल आणि पुढील पाच-सात वर्षांत देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर जाईल, असे आमचे उद्दिष्ट असून ते निश्चितच साध्य होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने होत आहे. गरिबांना अन्न, वस्त्र व निवारा पुरविण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना असून त्याचा लाभ कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. देशात आतापर्यंत कधीच झाली नाही, एवढी प्रचंड गुंतवणूक पायाभूत सुविधा क्षेत्रात झाली असून आणखीही होत आहे. देशात भ्रष्टाचारमुक्त सुशासन असून गरीब कल्याणाचा कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने राबविला जात असल्याने देश विकसित होईल, तेव्हा गरिबी राहणार नाही. गुलामगिरीची भावनाही शिल्लक राहणार नाही. कोणत्याही समस्यांना तोंड देण्यासाठी आता कोणीही मागे राहू नये. आता कशालाही घाबरण्याचे कारण नाही.

देशाच्या विकासमार्गावरील वाटचालीत १४० कोटी जनतेने साथ द्यावी आणि राष्ट्रउभारणीत योगदान द्यावे. नवभारताच्या उभारणीसाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे असून राष्ट्रउभारणीसाठी नवनवीन संकल्पना घेऊन त्यांनी नवभारताचे शिल्पकार व्हावे.

सध्या धाराशिवमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी ‘लोकसत्ता’चा आभारी आहे. तरुण पिढीने देशासाठी समाजोपयोगी व प्रेरणादायी काम करावे.

अतुल कुलकर्णी (प्रशासन)

आपापल्या क्षेत्रात चुकांमधून शिकत नवीन सुरुवात करणाऱ्या माझ्यासारख्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारामुळे व्यासपीठ निर्माण झाले आहे. या पुरस्कारामुळे ग्रामीण भागांतील सर्वसामान्य तरुण, शेतकरी, महिला बचत गट यांच्यात समाजात बदल घडवण्याची जिद्द निर्माण होईल. त्यांनाही स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

अनंत ईखार (उद्याोजक)

लोकसत्ता तरुण तेजांकित’ या पुरस्कारामुळे अनेकांना प्रेरणा व ऊर्जा मिळेल. तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या नवोदितांना नवसंजीवनी मिळेल. नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या सर्वांसाठी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

अभिषेक ठावरे (क्रीडा)

आपले काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार प्राप्त होणे हे एखाद्या वारीमध्ये सहभागी झाल्यासारखे आहे. कारण विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या अनेकांना यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भविष्यातही अनेक जण या पुरस्काराचे मानकरी ठरतील. हे सर्व जण भविष्यात उत्तम कार्य करत या पुरस्काराला नव्या उंचीवर नेऊन पोहोचवतील आणि माझाही तोच प्रयत्न असेल.

वरुण नार्वेकर (मनोरंजन)

तरुणांनी समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतींनी दिलेल्या योगदानाचे कौतुक करणारा ‘लोकसत्ता’चा ‘तरुण तेजांकित’ पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद आहे. स्त्रीच्या कौमार्याविषयी समाजात असलेल्या गैरसमजांना, तसेच चुकीच्या रूढी-परंपरांना बगल देऊन त्यांच्याकडे समानतेने पाहणाऱ्यांचा हा पुरस्कार आहे.

विवेक तमाईचीकर (सामाजिक)

लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ विजेत्यांच्या यादीत ‘पुस्तकवाले’ला मान मिळणे, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. पुस्तके, वाचन तसेच वाचकांबद्दल सातत्याने चर्चा घडवत राहणाऱ्या ‘लोकसत्ता’ने आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल खूप आनंद होत आहे.

ऋतिका वाळंबे (नवउद्यामी)

लहानपणापासून आमच्यावर ज्या वृत्तपत्राचा प्रभाव आहे अशा ‘लोकसत्ता’कडून सन्मान करण्यात आला त्यामुळे छान वाटते आहे. नवीन प्रेरणा आणि नवीन जबाबदारी देणारा हा पुरस्कार आहे. इतके दिवस फक्त ‘तरुण’ होतो हा पुरस्कार मिळाल्यानंतर ‘तेजांकित’ झालो आहे.

हेमंत ढोमे (मनोरंजन)

माझ्या कामाची दखल घेऊ ‘तरुण तेजांकित’ हा पुरस्कार मला दिला त्याबद्दल ‘लोकसत्ता’चे मन:पूर्वक धन्यवाद. ‘तरुण तेजांकित’ या उपक्रमामुळे इतर अनेक क्षेत्रांत कामगिरी करणाऱ्या तरुणांची ओळख झाली. त्यांच्या कामाची आम्हाला माहिती मिळाली. हा उपक्रम असाच कायम सुरू राहावा.

प्रियांका बर्वे (मनोरंजन)

लोकसत्ता’ ‘तरुण तेजांकित’ हा एक प्रेरणा देणारा पुरस्कार आहे. त्यामुळे अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. हा पुरस्कार फक्त माझ्यासाठी नसून देशासाठी आहे. कारण मी फक्त स्वत:साठी नाही तर संपूर्ण देशासाठी खेळतो.

ओजस देवतळे (क्रीडा)

नवे काही करू पाहणाऱ्यांसाठी आणि उद्याोगांसाठी ‘तरुण तेजांकित’ हे फार मोलाचे प्रोत्साहन आहे. ‘लोकसत्ता’सारख्या मोठ्या व्यासपीठाने आमच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल आभार. पुरस्कार सोहळ्यात ‘तेजांकितां’ची निवड कशी केली जाते हे समजले आणि इतक्या पारदर्शकतेने आपल्या कामाची निवड झाली याचा अभिमान वाटला.

सायली मराठे (उद्याोजिका)

तरुण तेजांकित पुरस्कारा’मुळे मी ज्या क्षेत्रात काम करते ते क्षेत्र लोकांपर्यंत पोहोचले, तसेच या पुरस्कारामुळे आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली.

नेहा पंचमिया (सामाजिक)

तरुण तेजांकित पुरस्कार’ मिळाल्याचा आनंद आहे. या पुरस्कारामुळे विविध क्षेत्रांची नव्याने ओळख होण्यास मदत होते. यंदाच्या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार. आता जबाबदारी आणखी वाढली आहे.

निषाद बागवडे (नवउद्यामी)

तरुण तेजांकित पुरस्कारा’मुळे मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे माझ्या कामाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि त्याचबरोबर काम करण्यासाठी आणखी ऊर्जा निर्माण झाली. ‘लोकसत्ता’ने माझी या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल धन्यवाद.

ज्ञानेश्वर जाधवर (कला)

अभिनय किंवा निर्मिती क्षेत्रातील कुठलेही काम असो, ते अत्यंत मनापासून तसेच पूर्ण क्षमतेने करण्याची माझी तयारी असते.

प्रिया बापट (मनोरंजन)

प्रत्येक चळवळ ही आव्हानात्मक असते. जे समाजाचे प्रश्न आहेत, तेच प्रशासनाचे आहेत, मात्र काम करताना कुठल्या कामांना प्राथमिकता द्यायची हे ठरविल्यास काम करणे सोपे जाते.

राहुल कर्डिले (कायदा व धोरण)

आपली स्वप्ने पूर्ण करताना लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करायचा नाही. केवळ आपल्या आई-वडिलांचा सल्ला घ्यायचा. स्वप्न बघण्याला मर्यादा नसल्याने कितीही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ठरवल्यास ती पूर्णही करता येतात.

दिव्या देशमुख (क्रीडा)

स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत आणि काम करत राहणे, अशी माझी वैचारिक पार्श्वभूमी आहे. मी ज्या ध्येयाने काम करतो आहे, त्याच इमानदारीने येणाऱ्या काळातही काम करत राहणे हा माझ्यासाठी पुरस्कार आहे.

सूरज एंगडे (सामाजिक साहित्य)

कुठल्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी उच्च शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे. ‘एकलव्य फाऊंडेशन’च्या माध्यमातून लावलेल्या रोपट्याचा येत्या एक ते दोन दशकांत मोठा वृक्ष होईल.

– राजू केंद्रे (सामाजिक)