|| रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

विज्ञान व त्याच्या वापराविषयी होणारे निर्णय या बाबी फक्त प्रयोगशाळेत संशोधन करणारे संशोधक, सरकारचे नोकरशहा व राजकीय नेते यांच्यापुरत्या मर्यादित  नाहीत, तर ज्यांच्या आयुष्यावर त्यांचा प्रभाव पडणार आहे अशी सर्वसामान्य जनताही त्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होऊ शकते असे लोकविज्ञान मानते.

article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी :विज्ञान आणि तंत्रज्ञान
loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
congress not responsible for the defeat of babasaheb ambedkar in 1952 election as well by election in 1954
आचारसंहितेचे बंधन तपासयंत्रणांवरही असू शकते…

आपण या लेखमालेतून विज्ञानाची संकल्पना व तिची विविध दृष्टिकोनांतून केली गेलेली समीक्षा समजून घेत आहोत. तिच्या मुळाशी ‘हे सारे काय आहे?’ हा प्रश्न किंवा जिज्ञासा असली, तरी आपली प्रेरणा विशुद्ध ज्ञानवादी नाही तर ती उपयोजिततावादी आहे. स्थूलमानाने ती जनवादी आहे, असेही म्हणता येईल. म्हणजे ‘या साऱ्याचा सर्वसामान्यांच्या दृष्टीने लाभ काय?’ हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. विज्ञान-तंत्रज्ञान हे मानवजातीच्या हितासाठी आहे हे मान्य केले तरी त्यांचा लाभ गरीब-वंचित लोकांना कसा होऊ शकेल, हे आपण शोधत आहोत.

ज्या भांडवली अर्थव्यवस्थेत विज्ञानाचा विकास झाला, त्याची मूल्यव्यवस्था व विचाराची चौकट प्रस्थापित विज्ञानाने स्वीकारली, असा महत्त्वाचा आक्षेप मार्क्‍सवाद्यांनी घेतला आहे. भांडवलशाहीप्रमाणे विज्ञानाने समूहाऐवजी व्यक्तिवादाला महत्त्व देणे हे विश्लेषणवादाचे द्योतक आहे, असेही मार्क्‍सवाद मानतो. विज्ञानाचा उपयोग मूठभर भांडवलशहांच्या आíथक लाभासाठी न होता सर्वसामान्य जनसमूहांच्या व्यापक हितासाठी तो व्हावा, असा मार्क्‍सवादाचा आग्रह आहे.

लोकविज्ञान किंवा ‘पीपल्स सायन्स’ ही संकल्पना युरोपात विसाव्या शतकात विकसित झाली. जे बी एस हाल्डेन, जे डी बरनाल, जोसेफ नीडहॅम यांसारख्या मार्क्‍सवादी विचारवंतांनी केलेल्या समीक्षेतून तिचा उगम झाला. (विज्ञानाच्या मार्क्‍सवादी समीक्षेचा विचार आपण स्वतंत्रपणे करणार आहोतच.) आजही युरोप व अमेरिकेत ‘पीपल्स सायन्स’ व ‘सायन्स अ‍ॅण्ड सोसायटी’ अशा नावांनी मार्क्‍सवादी समूह कार्यरत आहेत; पण आपण या लेखमालेत ‘लोकविज्ञान’ या संकल्पनेत भारतातील लोकविज्ञान चळवळीने स्वीकारलेल्या विचारधारेचा किंवा दृष्टिकोनाचाच विचार करणार आहोत. त्याचे एक कारण म्हणजे भारतातील व पाश्चात्त्य जगातील भौतिक परिस्थिती व तेथील (विज्ञानासमोरील) प्रश्न भिन्न स्वरूपाचे आहेत. शिवाय भारतातील लोकविज्ञान हे मार्क्‍सवादी व गांधीवादी यांच्या संयुक्त प्रभावातून निर्माण झालेले रसायन आहे. लोकविज्ञानाचा आशय व त्याने प्रस्थापित विज्ञानाला विचारलेले प्रश्न लक्षात घेण्यापूर्वी आपण लोकविज्ञान चळवळीचा उगम समजून घेऊ या.

लोकविज्ञान चळवळीची सुरुवात : मुंबईतील भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रातील अनेक संशोधकांनी त्या काळात एकत्र येऊन फेडरेशन ऑफ इंडियन लिटररी सायंटिस्ट्स या संघटनेची स्थापना केली. यापूर्वी विविध वैज्ञानिक हे आपापल्या मातृभाषांतून विज्ञानासंबंधी लिखाण करीत होते, कुठे कुठे त्यांच्या संघटनादेखील स्थापन झाल्या होत्या. त्यांचीच ही शिखर संस्था.

या परिषदांच्या माध्यमातून एकत्र आलेल्या वैज्ञानिकांना अनेक समस्यांची चर्चा करण्याची निकड भासू लागली. उदा. देशाच्या वैज्ञानिक धोरणाची समीक्षा, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीचे लाभ गोरगरिबांपर्यंत का पोहोचत नाहीत इ. १९८४ मध्ये भोपाळमध्ये युनियन कार्बाईड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या गलथानपणामुळे हजारो माणसांचा बळी गेला व त्यातून विज्ञान-तंत्रज्ञानविषयक अनेक प्रश्न उभे राहिले. त्यातून या सर्व संघटनांना प्रत्यक्ष कृती करण्याची व एका सामाईक विचारपीठाची गरज भासू लागली. केरळमध्ये अनेक वष्रे सक्रिय असणाऱ्या केरळ शास्त्र साहित्य परिषदेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रासह काही राज्यांत लोकविज्ञान चळवळ उभी राहिली. १९८८ मध्ये या सर्व संघटनांनी एकत्र येऊन अखिल भारतीय लोकविज्ञान नेटवर्क उभे केले.

लोकविज्ञान चळवळीची वैचारिक भूमिका देशात लोकविज्ञान चळवळ उभी राहण्यात केरळ शास्त्र साहित्य परिषदे (केशासाप)चा सिंहाचा वाटा राहिला आहे. केशासापच्या निर्मितीमध्ये तेथील मार्क्‍सवादी विचारक व वैज्ञानिकांचे मोठे योगदान आहे. मानवी समाजाच्या विकासात विज्ञान व तंत्रज्ञान यांची मोलाची भूमिका आहे असे लोकविज्ञान मानते; परंतु विज्ञान ही काही तरी कठीण, सर्वसामान्यांना समजू न शकणारी अशी बाब आहे आणि म्हणून तिच्याविषयी फक्त तज्ज्ञ मंडळींनी विचार करावा, त्याबद्दलचे सर्व निर्णय घ्यावेत हे लोकविज्ञानाला मान्य नाही. विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेतील संशोधनात व वैज्ञानिक नियतकालिके व ग्रंथ यांत अडकून पडू नये, तर ते लोकांपर्यंत पोहोचायला हवे, त्यातून त्यांना नवी दृष्टी मिळायला हवी व त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यातून गवसायला हवीत, ही लोकविज्ञानाची दृष्टी आहे. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन हा लोकविज्ञानाच्या कामाचा महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात लोकविज्ञान आंदोलनाने ग्रहणाच्या दिवशी जनजागृती यात्रा आयोजित केल्या. ग्रहण ही अतिशय महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना आहे, ती सर्वानी पाहावी व समजून घ्यावी यासाठी खास गॉगल्स तयार केले व त्यातून लाखोंचे प्रबोधन केले. अशा प्रयत्नातूनच विज्ञान हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, अशी जनसामान्यांना खात्री पटू शकेल. विज्ञानाची निर्मिती ही कित्येक पिढय़ांच्या सामूहिक आविष्कारातून झाली असल्यामुळे विज्ञान हा साऱ्या मानवजातीचा सामाईक ठेवा आहे व त्यावर सर्वाचा समान हक्क आहे. त्यामुळे पशाच्या बळावर त्याच्यावर एकाधिकार प्रस्थापित करून बहुसंख्यांना उपयुक्त तंत्रज्ञानापासून वंचित ठेवणे हे लोकविज्ञानाला मान्य नाही. वैज्ञानिक पद्धती ही कोणालाही शिकविणे शक्य आहे. म्हणून सर्वसामान्य जनतेला वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला शिकविणे, त्या आधारावर लोकांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित बाबी जाणून घेणे, त्यांच्याशी संबंधित सरकारी धोरणे समजून घेणे व आवश्यकता भासेल तिथे निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करून लोकांच्या हिताची धोरणे ठरविण्यास सरकारला बाध्य करणे आवश्यक आहे असे लोकविज्ञान मानते. म्हणजेच विज्ञान व त्याच्या वापराविषयी होणारे निर्णय या बाबी फक्त प्रयोगशाळेत संशोधन करणारे संशोधक, सरकारचे नोकरशहा व राजकीय नेते यांच्यापुरत्या मर्यादित नाहीत, तर ज्यांच्या आयुष्यावर त्यांचा प्रभाव पडणार आहे अशी सर्वसामान्य जनताही त्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होऊ शकते असे लोकविज्ञान मानते.

आतापर्यंत या चळवळीने सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञानविषयक धोरणाची समीक्षा करणे, त्यातील उणिवा व अंतर्वरिोध स्पष्ट करणे आणि त्यापुढे जाऊन शक्य असेल तिथे त्यांना पर्याय सुचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. सार्वजनिक आरोग्य, औषध, बौद्धिक संपदा अधिकार (पेटंट), ऊर्जा, पर्यावरण, पंचायती राज व सत्तेचे विकेंद्रीकरण, परमाणू शस्त्रसंधी- या व अशा किती तरी महत्त्वाच्या विषयांवरील धोरण ठरविताना देशात ज्या चर्चा झडल्या, त्या सर्वात लोकविज्ञानाने अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. अनेकदा सरकारी धोरणांच्या उणिवा दाखवून त्यांना पर्याय सुचविणे हेदेखील अपुरे ठरते. आपण देत असलेला पर्याय व्यवहार्य आहे हे छोटय़ा प्रमाणावर (पायलट प्लान्ट) प्रयोग करून सिद्ध करावे लागते. लोकविज्ञानाने साक्षरता, शेती, आरोग्य, पाणलोट विकास, स्थानिक संसाधनांचे व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांत असे यशस्वी प्रोटोटाइप्स (नमुने/ उदाहरणे) उभे केले आहेत.

आज साऱ्या जगात जे तंत्रज्ञान विकसित होत आहे व जे आपल्या देशात मोठय़ा प्रमाणावर वापरले जात आहे, ते बहुतांशी अतिशय खर्चीक, यंत्राधारित (म्हणजेच माणसांचा रोजगार हिरावून घेणारे), तेलासारख्या मर्यादित ऊर्जासाठय़ावर अवलंबून असणारे असे आहे. त्यामुळे मोठमोठे प्रकल्प उभे राहू शकतील; पण त्यातून बेरोजगारी व पर्यावरणाचे प्रश्न अधिकच बिकट होतील, सामाजिक विषमता व हिंसा वाढेल, ही बाब आता गल्लीपासून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संघटनांपर्यंत सर्व पातळ्यांवर स्वीकारली जाते; पण त्याला जणू काही पर्यायच नाही असे मानले जाते. या विचारसरणीला There Is No Alternative (TINA) phenomenon – टिना प्रत्यय – असे मानले जाते. लोकविज्ञानाने या समजुतीला छेद देत सर्वसामान्य कारागिरांना उपयोगी पडू शकतील व त्यांच्या आवाक्यात असतील अशी अनेक तंत्रे व तंत्रज्ञान विकसित केले आहे. ती स्वस्त, कमी ऊर्जा लागणारी, अनेकांना रोजगार पुरविणारी आहेत. उदा. गावाच्या पातळीवर मोबाइल फोनसाठी वायरलेस यंत्रणा उभारणे, लोकसहभागातून ग्रामविकासाचे नियोजन करण्यासाठी सॉफ्टवेअर बनविणे, तेलघाणी व हातमाग यांची उत्पादकता वाढविणे, पवनऊर्जेवर आधारित उपकरणे बनविणे, लोहाराच्या कामाला यंत्राची जोड देणे इ.

लोकविज्ञानाचा हा विचार आपल्या देशात फारसा फोफावला का नाही, लोकविज्ञानाने लोकांचे कोणते प्रश्न घ्यायला हवेत, असे तुम्हाला वाटते, याबद्दलचे तुमचे विचार कळवा. आपण पुढच्या लेखात लोकविज्ञानाचा विचार व कार्य यांची अधिक खोलात जाऊन चर्चा करू.

ravindrarp@gmail.com

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत.