आजच्या काळात अनेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सिस्टीमचा वापर वाढला आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. एआयमुळे नोकऱ्यांवर परिणाम होणार का? अशी चिंता व्यक्त होत असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एक्सल सर्विस या अमेरिकन स्थित आयटी कंपनीने भारत आणि युनायटेड स्टेट्समधील तब्बल ८०० कर्मचाऱ्यांची कामावरुन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) वाढत्या मागणीमुळे ‘एआय’वर भर देण्यासाठी या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एक्सल सर्विस आयटी कंपनी जवळपास २ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. या नोकऱ्या कपातीमुळे यूएस आणि भारतातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे.

हेही वाचा : फेसबुक देणार इन्स्टाग्राम Reels ला टक्कर! नवीन अपडेटमध्ये होणार ‘हा’ बदल, जाणून घ्या

एक्सल सर्विस ही आयटी कंपनी जागतिक स्तरावर तब्बल ५५ हजार लोकांना रोजगार देते. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानामुळे कंपनीने हा बदल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कपात करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांना दुसरीकडे नोकरीची संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. एक्सल सर्विस कंपनीचे सीईओ रोहित कपूर यांची काही दिवसांपूर्वीच सीईओ पदावरून थेट बोर्डाच्या अध्यक्षपदी पदोन्नती झाली. यानंतर कंपनीने काही बदल करण्याचा निर्णय घेतला.

कंपनीच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार, “कंपनीच्या पुनर्रचनेमध्ये सध्याच्या पदांमध्ये काही बदल करण्यात येत आहेत. तसेच डेटा आणि ‘एआय’चे ज्ञान असलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत आहे. आमच्या ग्राहकांच्या मागणीनुसार हे निर्णय आम्हाला घ्यावे लागत आहेत. तसेच एआयमधील कौशल्यासह उच्च प्रतिभा समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे”, असेही त्यांनी सांगितले. एक्सल सर्विस ही कंपनी डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटल सोल्यूशन्स सेवा प्रदान करते.