भारतातील स्मार्टफोन्सची बाजारपेठ वेगाने विकसित होत असून हे उद्योगक्षेत्र २०१६ मध्ये लक्षणीय विस्तार करेल, असा अंदाज आहे. बाजारपेठेचा विकास साधण्यात स्मार्टफोन्सचा महत्त्वाचा वाटा असेल आणि गेली तीन वर्ष सरासरी ३२ टक्के असलेला विकासदर यंदा ३७ टक्कय़ांवर जाईल, अशी अपेक्षा आहे. या आकडय़ांवरून लक्षात येते की, सदर विकासात महानगरांचा मोठा वाटा असून नजीकच्या भविष्यात पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील विकास महत्त्वाचा ठरेल. चिनी स्मार्टफोन्सनी खऱ्या अर्थाने बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.

बाजारपेठेचा इतक्या वेगाने विकास होण्यामागे भरपूर भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय नव्या ब्रँड्सचा मोठा वाटा आहे, कारण त्यामुळे स्पर्धा वाढीस लागली. उत्पादकांनी आता त्यांचे फोन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित केले असून त्यामुळे नफा कमी झाला आहे. दर महिन्याला स्मार्टफोनच्या कमीतकमी किमतीचा नवा मापदंड प्रस्थापित केला जातोय. म्हणूनच किमतीत होणारी घट आणि मुबलक पर्यायांमुळे साध्या फोनऐवजी स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

या क्षेत्राचा विकास होत असल्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ४जी. तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे स्मार्टफोनच्या वापरात मोठी वाढ होत असून ते फक्त फोन करण्यापुरते साधन राहिलेले नाही. दुर्गम भागातही स्मार्टफोनमुळे चांगला वेग देणाऱ्या इंटरनेटची सुविधा उपलब्ध होत आहे.

पुढचे कारण म्हणजे, स्मार्टफोन्सच्या विक्रीची ई-कॉमर्स पद्धत. बऱ्याच ब्रँड्सनी फक्त ई-कॉमर्सवरच विक्री करण्याचा निर्णय घेऊन वितरणाचे नवे माध्यम खुले केले आहे. ई-कॉमर्स या उद्य्ोगक्षेत्रासाठी सर्व समीकरणे बदलणारे ठरले आहे, कारण ते फक्त स्मार्टफोन्सपुरते मर्यादित नाही, तर त्याने भारतातील उपकरणांच्या बाजारपेठेवर आपला चांगला प्रभाव निर्माण केला आहे. ई-कॉमर्सच्या एकूण रिटेल विक्रीमध्ये मोबाइलची टक्केवारी सर्वाधिक आहे. प्रभावी रिटेलिंगमुळे विक्रीत चांगली वाढ झाली आहे. शिवाय, गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन उत्पादकांनी सुलभ हप्त्यांचा पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे स्मार्टफोन्स परवडण्यासारखे झाले आहेत.

सारांश सांगायचा, तर दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील ग्राहक जास्त जागरूक व माहीतगार होत आहेत. ४जी आणि दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरे तसेच दुर्गम खेडय़ांपर्यंत त्याची व्याप्ती ही भारतातील स्मार्टफोनच्या विकासाची प्रमुख कारणे ठरतील. स्मार्टफोन उद्योगक्षेत्रात ४जीच्या क्रांतीमुळे विकासाची पुढची लाट येणार असून याआधीच ३जी उपकरणांची जागा ४जीयुक्त उपकरणे घ्यायला लागली आहेत. छोटी गावे व शहरांमध्ये फीचर फोनवरून कमी किमतीच्या स्मार्टफोनकडे वळण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी ते इंटरनेट व मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करणारे एकमेव कनेक्टेड उपकरण ठरणार आहे. चिनी उत्पादकांनी आपल्या दर्जेदार ब्रँड्समुळे आधीच निर्माण केलेले बळकट स्थान आणि पैशांचे जास्तीत-जास्त मूल्य देण्याच्या पद्धतीमुळे बाजारपेठेचा मोठा हिस्सा मिळवतील. भारतातील पाच आघाडीच्या शहरांचा भारतातील ऑनलाइन स्मार्टफोन विक्रीमधील वाटा अंदाजे ६० टक्कय़ांपर्यंत जाईल.

दीपक गुप्ता

(लेखक ‘जोश मोबाइल्स’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)