21 September 2020

News Flash

२७ गावांतील रस्त्यांची चाळण

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नुकतीच समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

| August 27, 2015 02:32 am

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नुकतीच समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. या गावांच्या समावेशाची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे येथील सार्वजनिक सुविधांचा आराखडा अद्याप कागदावरच असून रस्ते, पदपथ, दिवाबत्ती यांसारखी कामे अद्याप प्रभावीपणे सुरू करण्यात आलेली नाही. यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी बहुतांश गावांमधील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून महापालिकेने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, असा आग्रह ग्रामस्थ धरू लागले आहेत.डोंबिवली औद्योगिक विभाग तसेच २७ गाव परिसरातील रस्त्यांची कामे स्थानिक ग्रामपंचायतींच्या माध्यमातून केली गेली आहेत. या कामांच्या दर्जाविषयी सुरुवातीपासून प्रश्न उपस्थित केले जात होते. डोंबिवली औद्योगिक विभागात आणि २७ गावांच्या परिसरात रस्त्यांची देखभाल, डागडुजीची कामे करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाली आहे. हा सगळा परिसर नुकताच महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र या कामांचे ठोस नियोजन नसल्याने रस्त्यांवरील खड्डे आणखी वाढू लागले आहेत.महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना गावांच्या समावेशासंबंधीचा कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे या गावांमधील विकास कामांसाठी ठोस अशा आर्थिक तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, गावांमधील समस्या सोडविण्यास महापालिका असमर्थ आहे, अशी ओरड नव्याने सुरू झाली असून महापालिका नको या मागणीसाठी या तक्रारींचा उपयोग करून घेतला जात आहे. हे लक्षात आल्याने या गावांसाठी महापालिकेकडून आर्थिक तरतुदी करण्याचे काम सुरू आहे. निधीची तरतूद उपलब्ध नसल्याने रस्ते डागडुजीच्या कामांना विलंब होत आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून यासंबंधी केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित प्राधिकरणाने करावी, अशी महापालिकेची भूमिका आहे. मात्र, त्याकडे एमआयडीसी ढुंकूनही पहाण्यास तयार नाही. त्यामुळे या कामांचा आर्थिक भार महापालिकेस पेलावे लागेल, असे चित्र सध्या दिसू लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 2:32 am

Web Title: bad coundition of local roads at dombivali
Next Stories
1 गणरायाच्या आगमनानंतर सॅटिसचे विघ्न हटणार!
2 भर पावसातही ‘तानसा’ परिसर तहानलेलाच!
3 उत्सवकाळात सहकार्य करण्याचे ठाणे पोलीस आयुक्तांचे आवाहन
Just Now!
X