लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात दररोज प्रत्येकी ५० ते ६० करोना चाचण्या होत असल्यामुळे रुग्णांचा शोध घेण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. मात्र, शहरातील बहुप्रतीक्षित प्रयोगशाळा अखेर सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेची दिवसाला तीनशे चाचण्या करण्याची क्षमता असल्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील चाचण्यांची संख्या आता वाढण्याची शक्यता आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील करोना संशयितांची चाचणी शहरामध्येच व्हावी तसेच त्याचे अहवाल कमी वेळेत उपलब्ध व्हावेत या उद्देशातून बदलापूर शहरात प्रयोगशाळा उभारणीचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जुलै महिन्यात दिले होते. त्यानंतर बदलापूर शहरात प्रयोगशाळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. महिनाभरातच या प्रयोगशाळेचे स्थापत्यविषयक कार्य पूर्ण करण्यात आले होते. मात्र प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रणा मिळण्यासाठी पालिका प्रशासनाना जिल्हा प्रशासन आणि काही कंपन्यांवर अवलंबून राहावे लागले. या काळात पालिकेचा मोठा वेळ खर्ची झाला. दरम्यान, प्रयोगशाळेचे यंत्र दाखल झाल्यानंतरही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची परवानगी आणि प्रयोगशाळेसाठी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ वेळीच उपलब्ध झाले नसल्याने प्रयोगशाळा सुरू होऊ  शकत नव्हती. अखेर गेल्या आठवडय़ात परवानगी मिळाल्यानंतर प्रयोगशाळा सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. बुधवारपासून या प्रयोगशाळेत चाचण्यांना सुरुवात करण्यात आलीे. या प्रयोगशाळेमुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील करोनाबाधितांचा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे सोपे होणार आहे. सध्या या प्रयोगशाळेची क्षमता ३०० चाचण्यांची आहे. गरज पडल्यास ही क्षमता एक हजारांपर्यंत वाढवली जाऊ  शकते. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील चाचण्यांची संख्या आता वाढणार आहे.

उल्हासनगरच्या प्रयोगशाळेचे प्रतीकात्मक उद्घाटन

उल्हासनगर शहरात शहाड स्थानकालगत कोणार्क गृहसंकुलालगत पालिकेने उभारलेली प्रयोगशाळा अजून सुरू होऊ  शकलेली नाही. बडय़ा नेत्याच्या हस्ते उद्घाटनाच्या हट्टापायी प्रयोगशाळा बंद असल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने मंगळवारी या प्रयोगशाळेचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले. शहराला गरज असतानाही दीड कोटी रुपये खर्चून उभारलेली ही प्रयोगशाळा बंद ठेवल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून जसे संशयित रुग्ण येतील, त्यांची चाचणी केली जाणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे. मुंबईत तपासणीसाठी जाणारे नमुने आता शहरातच तपासले जाणार आहेत.

– डॉ. हरेश पाटोळे, नोडल अधिकारी, बदलापूर.