अवजड वाहनांना खाडी पूल बंद करणार; ऐरोली, मुलुंड टोलनाक्यावरील कोंडी वाढणार
कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या कामामुळे ठाणे आणि कळव्याच्या प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या मार्गावरून दुपारी आणि रात्री उशिराच्या वेळेत होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. कळवा तसेच विटावा मार्गे होणारी अवजड वाहनांची वाहतूक यापुढे ऐरोली मार्गे ठाणे शहरात वळविण्यात येईल, अशी माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. मात्र, या निर्णयामुळे नवी मुंबईतील ऐरोली आणि द्रुतगती महामार्गावरील मुलुंड टोलनाक्यावरील वाहनांचा भार वाढण्याची शक्यता आहे.
ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी खाडीवर दोन पूल असून त्यापैकी ब्रिटिशकालीन पुलाचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे दुसऱ्या पुलावर वाहतुकीचा ताण वाढू लागल्याने कळवा तसेच साकेत भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. जवाहरलाल नेहरू बंदर ते मुंब्रा तसेच विटावामार्गे अवजड वाहतूक सुरू असते. काही वाहने मुंब्रा-खारेगाव टोलनाका मार्गे जातात तर काही कळवा खाडीपुलावरून साकेत मार्गे शहराबाहेर जात असतात. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जाण्यासाठी ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावरून जाण्याऐवजी ठाणे-बेलापूर रस्त्यावरून कळवा पुलाचा वापर करत साकेतमार्गे घोडबंदरच्या दिशेने जाण्याचा पर्याय अनेक वाहनचालक स्वीकारतात. खाडीवरील उड्डाणपुलाचे काम सुरू असताना अवजड वाहनांची वाहतूक सुरू ठेवल्यास ठाणे-कळव्याच्या वाहतुकीचे नियोजनच मोडून पडेल, असा महापालिकेचा दावा आहे.
या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी या भागातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्याचा विचार सुरू केला असून या बदलांचा एक भाग म्हणून महापालिकेने कळवा तसेच विटावामार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांना दिला आहे. ही वाहतूक ऐरोली मार्गे वळविण्याचा पर्यायही सुचविला आहे. या प्रस्तावानुसार वाहतूक पोलिसांनी नियोजन आखण्यास सुरुवात केली असून त्यासंबंधीची अधिसूचना काढण्यात येण्याची शक्यता आहे.
यासंबंधीचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडे दिला आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. तिसऱ्या पुलाच्या कामामुळे कळव्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पर्याय सुचविण्यात आला असला तरी कळव्याच्या कोंडीचा भार आता ठाणे शहरावर पडण्याची शक्यता आहे. ऐरोली तसेच आनंदनगर टोलनाका आणि कोपरीजवळील निमुळता मार्ग या भागात वाहतूक कोंडी होत असतानाच आता ऐरोली मार्गे सुरू होणाऱ्या अवजड वाहतूकीमुळे संपूर्ण शहराला कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

येथे कोंडी होणार
* ऐरोली शहरांतर्गत रस्ता
* ऐरोली टोलनाका
* मुलुंड टोलनाका
* आनंदनगर