क्रीडा संकुले प्रकरणात प्रशासनाविरोधात आवाज उठविणाऱ्या ठाण्यातील भाजप आमदारांकडे दुर्लक्ष

ठाणे शहरात मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेली क्रीडा संकुले मर्जीतल्या ठेकेदारांना विनानिविदा बहाल करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या वादग्रस्त निर्णयाला विरोध करत या प्रक्रियेत पारदर्शकतेचा आग्रह धरणारे भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर यांची कोंडी करण्याचे  प्रयत्न सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत. ठोस धोरण ठरवून आणि निविदा प्रक्रिया राबवून ही संकुले भाडेपट्टय़ावर दिली जावीत अशी मागणी केळकर यांच्याकडून आली होती. या मागणीकडे कानाडोळा करत प्रशासनाने क्रीडा संकुलांचे प्रस्ताव कायम ठेवले आणि शिवसेनेने विरोधी पक्षातील राष्ट्रवादीला सोबत घेऊन ते बहुमताने मंजूर केले. या मुद्दय़ावर मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा इशारा देऊनही केळकर यांना जुमानायचे नाही, असा पवित्रा शिवसेना आणि प्रशासनातील ठरावीक अधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यातील जवळीक आता पक्षाच्या मुळावर उठू लागल्याची चर्चा भाजप नेत्यांमध्ये यानिमित्ताने दबक्या आवाजात सुरू आहे.

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांसोबतही अलीकडच्या काळात जयस्वाल यांनी जुळवून घेतले आहे.

क्रीडा संकुलाच्या मुद्दय़ावरही सर्वपक्षीय नेत्यांनी प्रशासनाच्या मदतीने भाजपला एकाकी पाडल्याचे चित्र दिसत असून आमदार केळकर यांचा विरोध जुमानायचा नाही, अशीच भूमिका या युतीने घेतल्याचे दिसू लागले आहे. विशेष म्हणजे, ठाणेकरांच्या हिताआड येणाऱ्या या प्रस्तावांना विरोध केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून हवी तशी साथ मिळत नसल्याची कुजबूज स्थानिक भाजप नेत्यांमधून सुरू झाली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधील ‘समन्वया’च्या राजकारणाची उघड चर्चा सुरू आहे.

कळवा-मुंब्रा भागात ‘संघर्षां’चा आव आणणाऱ्या नेत्याशी संबंधित असलेल्या संस्थेस कौसा येथील मोठे स्टेडियम कोणत्याही निविदेशिवाय यापूर्वीच बहाल करण्यात आले आहे.  घोडबंदर भागातील ढोकाळी येथील शरदचंद्र पवार क्रीडा संकुल आणि कोरम मॉलजवळील शहीद तुकाराम ओंबळे बॅडिमटन कोर्टही अशाच पद्धतीने विनानिविदा ठरावीक संस्थांना भाडेपट्टय़ावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तीनही प्रस्तावांना  केळकर यांनी विरोध केला आहे. स्वारस्य अभिव्यक्ती करारासंबंधी ठोस निर्णय होत नसताना प्रायोगिक तत्त्वावर ठरावीक संस्थांना ही संकुले भाडेपट्टय़ावर देणे नियमाला धरून नाही. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागू असा इशारा केळकर यांनी दिला होता. असे असतानाही प्रशासनाने हे प्रस्ताव कायम ठेवले आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यास हिरवा कंदील दाखविला.

प्रतिक्रियेस नकार

यासंबंधी आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते पालघर निवडणुकीत व्यस्त असल्याचे त्यांच्या स्वीय साहाय्यकाकडून सांगण्यात आले. शिवसेनेच्या महापालिकेतील एकाही पदाधिकाऱ्याने क्रीडा संकुलाच्या विषयावर बोलण्यास नकार दिला. एका पदाधिकाऱ्याने ‘तुम्ही शिंदे साहेबांशीच बोला’ अशी प्रतिक्रिया दिली. क्रीडा संकुलांच्या प्रस्तावांमध्ये काहीही वादग्रस्त नाही अशी भूमिका प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मांडली.

निर्णय काय?

  • ठाणे महापालिकेने उभारलेली क्रीडा संकुले कोणत्याही निविदेशिवाय मर्जीतल्या ठेकेदारांना बहाल करण्याच्या प्रशासनाच्या वादग्रस्त प्रस्तावावर महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरीची मोहर उमटवली.
  • ठरावीक संस्थांना भाडेपट्टय़ावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीनही प्रस्तावांना आमदार केळकर यांनी विरोध केला आहे.