अग्रवाल सेवा समिती

समाजातील त्रुटी, उणिवा, कमतरता लक्षात घेऊन ती कसूर भरून काढण्यासाठी असंख्य हात आपापल्या परीने झटत असतात. अशाच हातांची मोट बांधून सामाजिक संस्था उदयास येते. यातील काही संस्था एखाद्या वंचित घटकाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहतात, तर काही समाजालाच नवीन दिशा देण्यासाठी धडपड करतात. वसई-विरार, मीरा-भाईंदरमधील अशाच संस्थांच्या कार्याचा आढावा घेणारे हे पाक्षिक सदर..

मीरा-भाईंदरमध्ये अग्रवाल समाजाची लोकसंख्या हजारोच्या घरात आहेत. या समाजाच्या विकासासाठी समाजातील काही तरुण मंडळी एकत्र आली आणि त्यांनी ‘अग्रवाल सेवा समिती’ची स्थापना केली. ४०व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या या संस्थेचा आता वटवृक्ष झाला असून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या आज १२ लाखांच्या घरात जाऊन पोहोचली असली तरी ४०- ५० वर्षांपूर्वी येथील लोकसंख्या काही हजारांमध्ये होती. भाईंदर पश्चिम भागात तर केवळ मूळ गावाचा परिसर असलेल्या भागातच लोकवस्ती होती. यात राजस्थानी समाजही गुण्यागोविंदाने राहत होता आणि त्यातही अग्रवाल समाजाची सर्वाधिक म्हणजे १० ते १२ कुटुंबे होती. यात कामठिया, गाडोदिया आणि कंदोही या कुटुंबांचा समावेश होता. १०० वर्षांपूर्वी हा समाज भाईंदरमध्ये स्थायिक झाला. मिठाचा उद्योग हा त्यांच्या चरितार्थाचा मुख्य व्यवसाय होता.

१९७६ च्या सुमारास अग्रवाल समाजातील काही युवक एकत्र आले आणि त्यांनी युथ असोसिएशनची स्थापना केली. समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ या युवकांना होती. त्यावेळी समाजातील वरिष्ठांनी युथ असोसिएशनऐवजी समाजाच्या नावाने संस्था सुरू करण्याचा सल्ला या युवकांना दिला. यातूनच १९७८ मध्ये ‘अगरवाल सेवा समिती’ची स्थापना झाली. राजस्थानी समाजाची स्थापन झालेली ही पहिली संस्था यंदा ४० वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या ४० वर्षांत या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

संस्था स्थापन झाल्यानंतर संस्थेचे काम सुरू झाले. मात्र कामकाज करण्यासाठी कार्यालयाची नितांत आवश्यकता वाटू लागल्याने सदस्यांनी त्याकाळी प्रत्येकाने ५०० रुपये काढून ६ हजार रुपये जमा केले आणि संस्थेचे सुमारे शंभर सव्वाशे फुटाचे कार्यालय विकत घेतले. कार्याची सुरुवात करताना समाजातील व्यक्तींना लग्न कार्यात येणाऱ्या अडचणी समोर ठेवून त्यादृष्टीने काम सुरू करण्यात आले. त्याकाळी लग्नात लागणाऱ्या मोठय़ा भांडय़ांची तसेच इतर साहित्याची वानवा भासत होती. त्यामुळे संस्थेने भांडी आणि साहित्य खरेदी केले आणि ते समाजातील लोकांना कमी दरात देण्यास सुरुवात केली. यावेळेपर्यंत भाईंदर शहर वाढू लागले होते. अग्रवाल समाजाच्या कुटुंबांची संख्याही ३५०च्या आसपास जाऊन पोहोचली होती.

८०च्या दशकात भाईंदरला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. लोकसंख्या वाढत होती, परंतु पाणीपुरवठा काही वाढत नव्हता. पाण्याची ही निकड लक्षात घेऊन संस्थेने पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी संस्थेतर्फे गणेशभक्तांना पाणीवाटप केले जायचे, परंतु यापुढे जाऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. संस्थेचे सदस्य नंदलाल गाडोदिया यांच्या पुढाकाराने त्यावेळी भाईंदरमधली पहिली पाणपोई सुरू झाली. येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा मोठाच आधार निर्माण झाला. पुढे रस्ता रुंदीकरणात ही पाणपोई तुटली. त्यानंतर संस्थेच्या वतीने सध्याची भाईंदर पश्चिम येथील तिकीट खिडकीच्या बाजूला असलेली पाणपोई सुरू करण्यात आली, त्याचबरोबर रेल्वे स्थानकातही दोन पाणपोई उभारण्यात आल्या. त्यावेळचे खासदार रामभाऊ कापसे यांनी यासाठी मोलाची मदत केली. या पाणपोईंमुळे संस्थेला समाजात खरी ओळख प्राप्त झाली. लोकांची तहान भागवणारी संस्था अशीदेखील या संस्थेची ओळख सांगितली जाते.

पुढे संस्थेचे सदस्य ओमप्रकाश गाडोदिया आणि धनराज अग्रवाल यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना या पाणपोईला मोफत पाणीपुरवठा होईल, अशी व्यवस्था करवून घेतली. आज पाणपोई आणि लग्नकार्यासाठी लागणारे साहित्यपुरवठा ही कार्ये लहान वाटत असली तरी त्याकाळी या दोन्ही सुविधांमुळे समाजाला मोठाच आधार वाटत असे.

या सुविधांनंतर संस्थेने भाईंदर येथील स्मशानभूमीवर आपले लक्ष केंद्रित केले. याठिकाणी दहनासाठी लागणारी लाकडे नागरिकांना कमी दरात मिळतील यासाठी संस्थेने प्रयत्न केले. संस्थेचे सदस्य सत्यनारायण अग्रवाल, गौरीशंकर तोदी यांनी गावातील इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या मदतीने हे कार्य बरेच वर्ष सांभाळले. स्मशानभूमीत त्यावेळी बसण्याची व्यवस्था नव्हती. संस्थेने याठिकाणी आसन व्यवस्था उपलब्ध करून दिली. कामठिया बंधूंनी दहनाच्या जागी पत्र्याच्या शेडसाठी मोलाची मदत केली. त्यावेळी निधन झालेल्या व्यक्तीचे दिवसकार्य करण्यासाठी स्वतंत्र जागा नव्हती. त्यामुळे संस्थेच्या वतीने मांडली तलावाच्या शेजारी एक खोली बांधली आणि या खोलीचा दिवसकार्यासाठी वापर होऊ लागला.

विविध प्रकारच्या समाजोपयोगी कार्यासोबतच संस्थेने शैक्षणिक कार्यातही आपला ठसा उमटवला. यासाठी संस्थेने स्वतंत्रपणे शिक्षा समितीची स्थापना केली. अगरवाल समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्याचे काम संस्था करते. समाजातील एकही विद्यार्थी आर्थिक चणचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहता कामा नये असा विचार यामागे आहे. शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संस्थेने पुस्तक पेढी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शैक्षणिक पुस्तकांच्या शुल्काच्या अर्धी रक्कम गरजू विद्यार्थ्यांकडून अनामत म्हणून स्वीकारून त्यांना पुस्तके दिली जातात. चमकदार शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या आणि वर्गात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेकडून दरवर्षी करण्यात येत असतो. याव्यतिरिक्त रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर वाटप, महापालिका शाळेला विविध साहित्य वाटप, रस्त्यावर राहणाऱ्यांना कपडे वाटप आदी सामाजिक उपक्रमही राबवले जात असतात.

संस्थेने स्वत:चे संकेतस्थळही स्थापन केले असून संस्थेचे कार्य, सदस्यांची यादी, कार्यक्रमांची छायाचित्रे आदी माहिती या संकेतस्थळावर मिळू शकते, तसेच हे संकेतस्थळ फेसबुकशी संलग्नही करण्यात आले आहे. संस्थेची सदस्यसंख्या आज दीड हजारांवर जाऊन पोहोचली आहे. ओमप्रकाश सांगानेरिया, जगदीशप्रसाद अग्रवाल, वासुदेव अग्रवाल, शिवभगवान अग्रवाल, धनराज गाडोदिया, विजयकुमार मंगलुनिया, मन्नालाल तोदी, राजेंद्र मित्तल, महेंद्रकुमार चमडिया, राजकुमार मोदी आदींनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे.

महिला समिती कार्यक्षम

संस्थेची महिला समितीदेखील तितकीच कार्यक्षम आहे. समितीकडून होळी, दीपावलीनिमित्त स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते, शिवाय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रकारच्या स्पर्धा यांचे आयोजन ही समिती करत असते. मुख्य समितीच्या सर्व कार्यात महिला समिती तेवढय़ाच उत्साहाने सहभागी होत असते.