राजकीय दबावामुळे जयस्वाल नमले
ठाणे शहरात एखादी जाहिरात करायची असेल तर मुंबईच्या धर्तीवर शुल्क आकारण्याचा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या प्रयत्नांना अखेर लोकप्रतिनिधींनी खो घातला असून वाढीव जाहिरात दर मागे घेण्यास भाग पाडले आहे. ठाणे महापालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जयस्वाल यांनी जाहिरात फलक, दिव्यावरील खांब, िभती, दुकाने तसेच बसथांब्यावर जाहिरात करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऊठसूट कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपल्या पक्षांचे/नेत्यांचे फलक लावणाऱ्या राजकीय नेत्यांनी या वाढीला विरोध केला होता. या पाश्र्वभूमीवर पालिका प्रशासनाने पूर्वीपेक्षा कमी दरवाढ प्रस्तावित केली आहे.
ठाणे महापालिकेच्या तिजोरीतील उत्पन्नाचा ओघ वाढवण्यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाणी, मालमत्ता करासह विविध करांमध्ये मोठी वाढ करण्याचे प्रस्ताव मांडले आणि सत्ताधारी पक्षाकडून आग्रहाने ते मंजूरही करून घेतले. मुंबईपाठोपाठ ठाणे शहराचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन जयस्वाल यांनी शहरातील मुख्य मार्गावर जाहिरात करण्यासाठीचे शुल्क मुंबई महापालिकेच्या प्रचलित दरांपेक्षा १० टक्के इतकेच कमी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई शहरात मोक्याच्या ठिकाणी जाहिरात करायचे असेल तर घसघशीत रक्कम शुल्कापोटी भरावी लागते. ठाण्यातही हा दर पॅटर्न निर्माण व्हावा, असा जयस्वाल यांचा प्रयत्न होता. त्यामुळे तीन हात नाका, नितीन कंपनी जंक्शन, कॅडबरी नाका, घोडबंदर मार्गावरील जाहिरात दरांमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
प्रति चौरस मीटर क्षेत्रासाठी ८५० रुपयांपर्यंत शुल्क आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच कापडी फलकांसाठी प्रति फूट, प्रति दिन १०० रुपयांचा दर आकारण्याचे ठरले. हा दर पूर्वी प्रति मीटरसाठी ३७५ रुपये इतका तुरळक होता. बॅनरचे दर वाढल्याने वाढदिवस, कार्यक्रमांची प्रसिद्धी करणाऱ्या राजकीय नेत्यांच्याही खिशाला झळ पोहोचणार होती. त्यामुळे ही दरवाढ तब्बल ९०० टक्क्य़ांच्या आसपास असल्याचा आक्षेप घेत ती मागे घेण्यासाठी जयस्वाल यांच्यावर दबाव वाढत होता. जाहिराती प्रदर्शित करणाऱ्या संघटनेनेही ही दरवाढ योग्य नसल्याचे पत्र दिले होते. पंधरवडय़ापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेतही शुल्कवाढ कमी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. अखेर वाढत्या दबावापुढे जयस्वाल यांनी माघार घेतली असून जाहिरातींसाठी आकारण्यात येणारी शुल्काची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सुधारित प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.