कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांचे कारवाईचे आदेश

कमला मिल दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील हॉटेल्स, ढाबे, बिअर-बार, सिनेमागृह, रुग्णालये, शाळा, जिमखाना, मॉल्स, व्यापारी संकुलांमध्ये करण्यात आलेल्या नियमबाह्य़ कामांची तपासणी करण्यासाठी आयुक्त पी. वेलरासू यांनी अधिकारी आणि अभियंत्यांची स्वतंत्र पथके तयार केली आहेत. शहरातील बेकायदा बांधकामांची पाहणी करून कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गावे तसेच शीळफाटा रस्त्यावर अनेक हॉटेल्स, ढाबे, बिअर बार बांधकामांचे सर्व नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आली आहेत.

अनेक हॉटेल्स अरुंद पोटमाळे काढून तेथे ग्राहकांची सोय करण्यात आली आहे. बहुतांशी हॉटेलांमध्ये तळ मजल्यावर भटारखाना आणि त्याच्या वरती ग्राहकांना बसण्यासाठी आसने बनवलेली आहेत.

कल्याणमधील अ, ब, जे, क, ड, आय प्रभाग हद्दीतील बेकायदा वाढीव बांधकामे प्रभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्या नेतृत्वाखाली, डोंबिवलीतील फ, ग, ई आणि ह प्रभागातील बेकायदा बांधकामे प्रभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्या देखरेखीखाली जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. या कारवाईवर उपायुक्त सुरेश पवार नियंत्रक असतील.

रुग्णालय, शाळा, हॉटेल्स तपासणीसाठी शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, उप स्थानक अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे.

* राजाजी पथावर एका रहिवाशाने इमारतीला हिरव्या जाळ्या लावून तेथे उपाहारगृह सुरू.

* अनधिकृत बांधकामप्रकरणी प्रभाग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा.

* काही खासगी शाळांनी नियमबाह्य़ वाढीव बांधकामे

* काही दुर्घटना घडली तर प्रसंगी विद्यार्थी, शिक्षकांच्या जिवावर बेतू शकते म्हणून शाळांची पाहणी करणार.

* मॉल्स, व्यापारी संकुलांमध्ये वाढीव बांधकामे.