ठाणे : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्यात वाक् युद्ध सुरू असतानाच आता या वादात आव्हाड यांच्या भगिनींनी उडी घेऊन परांजपे यांच्यावर टीका केली आहे. आमचे नातेसंबंध कसे आहेत, हे आनंद परांजपे यांनी सांगण्याची गरज नाही. आम्ही नात्यांचे झेंडे घेऊन फिरत नाही आणि आमच्या घरात एक छोटं कुत्रं आहे ते ठराविक माणसांवर भुंकत, अशा शब्दात त्यांनी परांजपे यांना सुनावले आहे. तसेच परांजपे यांनी आपल्या औकातीत रहावे, असा इशारा देत आमचे घर सांभाळण्यास आम्ही सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद परांजपे यांनी सोमवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषद घेऊन आव्हाड यांच्यावर टीका केली होती. आव्हाडांनी घरातील नातेसंबंध सुदृढ करावे” असे विधान परांजपे यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा आव्हाड यांच्या भगिनी शुभांगी गर्जे आणि डाॅ. ज्योती आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्हा भावंडांचे नातेसंबंध कसे आहेत, हे परांजपे यांनी सांगणे हास्यास्पदच आहे. आनंद परांजपे हे २४ तास आमच्या घरी चकरा मारायचे, हजेरी लावायचे. या हजेरी लावणाऱ्या माणसाला आमचे नाते दिसले नसेल. सुप्रिया सुळे आणि अजित पवार हा विषय वेगळा आहे. परांजपे हे आमच्या घरात गरज नसताना शिरले आहेत, असे शुभांगी गर्जे म्हणाल्या. आम्ही सामान्य कुटुंबातील आहोत. आम्ही सतत सोबतच असतो. पण, भावाच्या घरात बहिणीने सतत तळ ठोकून असावे, हे मराठी संस्कृतीमध्ये कुठेच नाही. आमचे नाते काय आहे, हे आम्हाला माहित आहे. आमच्या घरात शिरून आमचा काही संबध नसताना अशी विधाने जो माणूस करतो, त्याची मानसिकता काय आहे, हे वेगळं सांगायला नको. जी व्यक्ती आधी वडिलांच्या पुण्याईवर आणि नंतर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आधारावर उभी राहिली आहे. त्या व्यक्तीवर फारसे बोलू नये. आमचे संस्कार आणि शिक्षण उच्च दर्जाचे आहे. तरीही, या ठिकाणी आपण आनंद परांजपे यांना सांगू इच्छिते की, आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. त्यामुळे त्यांनी आमच्या वाटेला जाऊ नये. त्यांनी आपल्या औकातीत रहावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका

आनंद परांजपे यांना जे बोलायचे ते बोलू द्या. पण, परांजपे जेव्हा आमच्याकडून गेले, तेव्हा आम्हाला आमच्या घरातील छोट्या कुत्र्याची आठवण आली. आमच्या घरातलं एक कुत्रं नेहमी ठराविक माणसांवरच भुंकायचा, तोच गेला, असे आम्हाला वाटले. यावरून आमच्या लक्षात येतेय की आम्ही काय सांभाळले , असे शुभांगी गर्जे म्हणाल्या. तर, आम्ही राजकारणाशी संबंधित नाहीत. आम्ही आमचा व्यवसायात व्यस्त आहोत. पण, ज्या माणसाला ज्या कुटुंबाने सन्मान दिला. तोच माणूस त्या कुटुंबावर अशी टीका करीत असेल तर त्याची किव येते, असे डाॅ. ज्योती आव्हाड यांनी सांगितले. दरम्यान, आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करण्याची सुपारी घेतली आहे. ज्या माणसाने अजित पवारांच्या प्रतिमेला चपलेने मारण्याचे आदेश दिले होते. तो माणूस काय असेल, हे न सांगितलेले बरे, असे महिला जिल्हाध्यक्षा सुजाताताई घाग म्हणाल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane ncp jitendra awhad s sister shubhangi garje warns anand paranjape css