शांत, निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या बदलापूर शहरात सध्या अनेकांचा ताप वाढला आहे. गुंतवणुकीच्या सागरात विश्वासाने गुंतवलेले पैसे बुडाल्याच्या शंकेने अनेकांना घाम फुटला आहे. त्यामुळे बदलापुरातील गुंतवणूकदारांच्या सागरात त्सुनामी येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या आर्थिक वादळात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीतीही यावेळी व्यक्त केली जात आहे. ३० वर्षे या सागरात अशा प्रकारच्या अविश्वासाच्या लाटा दिसल्या नव्हत्या. त्यामुळे गुंतवणूकदार अजूनही आपले पैसे मिळतील, अशी आशा धरून आहेत.

मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर वसलेले बदलापूर शहर तसे सहसा चर्चेत येत नाही. शांत, निसर्गसंपन्न असे वातावरण असल्याने डोंबिवली-कल्याणनंतर दोन दशकांपूर्वी  बदलापूर शहराला अनेक चाकरमान्यांनी पसंती दिली. त्यामुळे सध्या शहरात संमिश्र लोकवस्ती आढळते. ब्राह्मण, कुणबी, मराठा, आगरी आदी अनेक जातींची कुटुंबे येथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. साधारण तीन दशकांपूर्वी बदलापूर ग्रामपंचायत असताना एक खाजगी गुंतवणूक कंपनी सुरू झाली. पुण्यातील एका खाजगी व्यवसायातून बदलापूरला आलेल्या एका व्यक्तीने मुंबईत एका बँकेत शिपायाची नोकरी स्वीकारली. तेथे पैसे जमा करण्यास येणाऱ्यांना मदत करीत त्याने या व्यवसायातील मर्म समजून घेतले. बँकेतील काम संपल्यानंतर एका खातेधारकाच्या कार्यालयात जाऊन या व्यक्तीने शेअर बाजार, वस्तू बाजार आणि ट्रेडिंगचा अभ्यास शिकण्यास सुरुवात केली. त्यातून काही वर्षांतच या व्यक्तीने बॅँकेची नोकरी सोडून बदलापुरातील धनाढय़ लोकांना पैसे गुंतवण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यातूनच १९९० च्या दशकात एक गुंतवणूक कंपनी सुरू झाली. मूळ स्वभावाने मृदू, धार्मिक असल्याने बदलापुरातील बहुतेकांनी या कंपनीत पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. मुंबईतील एका प्रतिष्ठित शेअर मार्केटिंग करण्याऱ्या कंपनीसोबत त्यांनी अलिखित करार करून त्यांच्यामार्फत बदलापूरकरांचे पैसे शेअर बाजारात गुंतवण्यास सुरुवात केली. पुढे याच माध्यमातून विश्वास संपादन करत हजारांपासून ते कोटय़वधी रुपये मुदत ठेवीरूपाने विशिष्ट कालावधीसाठी घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एक, दोन आणि तीन वर्षांपुरत्या या गुंतवणूक योजना होत्या. कोणत्याही बँकेत मिळणार नाही असा व्याजदर यावेळी गुंतवणूकदारांना देण्यात येत होता. त्याचसोबत व्याजाचे पैसे मिळण्याचा ठरलेला दिवस कधीही चुकला नाही हेही तितकेच खरे. त्यामुळे बदलापुरात विश्वासाच्या रूपाने गुंतवणुकीचा सागर उभा राहत गेला. अगदी सहजरीत्या गुंतवणूकदारांना भेटणे, धार्मिक कार्यात सहभागी होणे, मितभाषी आणि साधेपणामुळे कंपनीचे सर्वेसर्वा लोकांच्या मनात घर करून बसले. सुरुवातीला गर्भश्रीमंतांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. बँकेपेक्षा अधिक व्याजदर मिळत असल्याने कोणत्याही नियम आणि कायद्याच्या कसोटीवर कंपनीला तपासण्यात आले नाही. कारण विश्वास हेच फार मोठे भांडवल होते. त्याचमुळे बदलापूर शहरातील नामांकित डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, राजकारणी, उद्योगपती यांनी या कंपनीत पैसे गुंतवले होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक सरकारी, खाजगी कंपन्यांतील नोकरदार वर्गानेही मोठी गुतंवणूक केली. अनेकांनी तर आपले संपूर्ण निवृत्तिवेतन या कंपनीत गुंतवले. भविष्य निर्वाह निधीची गुंतवणूकही अनेकांनी या कंपनीत केली आहे. नंतरच्या काळात तर हातावर पोट असणाऱ्यांनीही या कंपनीत मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली. व्याज वेळेवर मिळत असल्याने अनेक गुंतवणूकदारांचे घर या गुंतवणुकीच्या व्याजावर चालत होते. जवळपास २८ वर्षे वेळेवर व्याज मिळण्याची ही परंपरा कायम होती. मात्र नोटाबंदीनंतरच्या महिन्यांनी या परंपरेला खंडित केले. निश्चलनीकरणाचा फटका या कंपनीला बसल्याचे बोलले जाते. जवळपास चार हजार गुंतवणूकदार या कंपनीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या गुंतवणुकीचा सागर ३०० कोटींच्या घरात असण्याचीही शक्यता आहे. गेल्या पाच महिन्यांपासून गुंतवणूकदारांना व्याजाचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे हतबल झालेल्या गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीच्या अखेरीस कंपनी मालकाचे घर गाठले. मात्र घराबाहेर लेखा परीक्षणाचा फलक लावून घरातल्या सर्वानी पळ काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हताश झालेल्या गुंतवणूकदारांच्या अडचणींत वाढ झाली आहे. शहरातील एकमेव शाखाही मार्चच्या मध्यात बंद करून कामगारांना ‘तुम्ही दुसरे काम शोधा, आमच्याकडे पगारासाठी पैसे नाहीत’,  असे सांगून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना नक्की कुणाकडे जावे असा प्रश्न पडला आहे. अनेक निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याचा प्रश्न या कंपनीच्या बुडण्याच्या शक्यतेमुळे निर्माण झाला आहे.

Two railway gates closed between Satara-Sangli Road traffic will be closed for some time
सातारा-सांगलीदरम्यान दोन रेल्वे फाटक बंद; रस्ते वाहतूक काही काळ बंद राहणार
Traffic changes in Kharegaon and Kalwa area
खारेगाव, कळवा भागात वाहतुक बदल
lok sabha election 2024 mns ignore toll issue after alliance with mahayuti
‘इंजिन’ची दिशा बदलताच मनसेला पथकराचा विसर 
Encounter in Abujhmad, naxalite Encounter Abujhmad, 10 naxalites killed, 10 naxalites killed near gadchiroli, naxalite news, chhattisgarh news, marathi news, naxali news, marathi news,
अबुझमाड जंगलात चकमक, १० नक्षलवादी ठार, छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई

या बाबतीत एक विशेष बाब प्रकर्षांने जाणवते आहे की गेल्या पाच महिन्यांपासून व्याजाचे पैसे बंद होऊन कंपनी डबघाईला आल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी अद्याप एकाही गुंतवणूकदाराने पोलिसांत तक्रार केलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीचे रोख व्यवहार अडचणीत आले असले तरी मालक स्वत:ची मालमत्ता विकून पैसे देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सध्याचे आर्थिक गणित पाहता ते शक्य आहे असे वाटत नाही.  त्यामुळे अनेकांनी पैसे परत मिळण्याच्या आशा सोडल्या आहेत.

अनेकांनी गेली २८ वर्षे पैसे योजनेत गुंतवल्याने त्यांना मुद्दलीपेक्षा कितीतरी अधिक पटीने व्याज मिळाले आहे. त्यामुळे अनेकांना त्या पैशांबाबत सोयरसुतक नाही. काहींना पैशांपेक्षा प्रतिष्ठा महत्त्वाची वाटल्याने ते उघडपणे तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या संपर्क कार्यालयात गेल्या काही दिवसांत हजारो गुंतवणूकदारांनी पावत्या जमा केल्या आहेत. उशिराने का होईना, आपले पैसे मिळतील, अशी आशा ते बाळगून आहेत.