नाशिक, कल्याण आणि ठाण्याच्या जागांवरून भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. तिन्ही पक्षांकडून या जागांवर दावा सांगण्यात आला आहे. त्यामुळे या जागांचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यात ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या अपमान होतो आहे, ते बघून माझ्या सारख्या विरोधकालाही दु:ख होत आहे, असा टोला त्यांनी महायुतीला लगावला आहे.

हेही वाचा – संजय राऊत यांचं वक्तव्य, “एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणातच राहणार नाहीत”…

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

महायुतीच्या नाशिक, कल्याण आणि ठाण्याच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, माध्यमं त्यावर बोलत नाहीत, केवळ महाविकास आघाडीच्या जागांबाबत चर्चा करतात. ठाण्यात ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या अपमान होतो आहे, ते बघून माझ्या सारख्या विरोधकालाही दुख होत आहे. हा एकनाथ शिंदे यांना अपमान नाही, तर मुख्यमंत्री पदाचा अपमान आहे. मुख्यमंत्री पदाला आम्ही मोजत नाही, आम्ही म्हणू तेच करावं लागेल, दे दाखवण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

हेही वाचा – “शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचं हा अदृश्य शक्तीचा..”, सुप्रिया सुळेंचा भाजपाला …

पुढ बोलताना, शिखर बॅंकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चीटवरूनही त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. अजित पवारांना मिळालेल्या क्लीन चीट याबद्दल कशाला चर्चा करता? महाराष्ट्रात सगळ्यांना माहित आहे की भाजपा ही वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर बनवणारी कंपनी आहे. वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर इतकी मस्त आहे, की एक लाख कोटीचा घोटाळा माफ करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.