शहरामध्ये झाडे लावण्यास जमिनीची जागा फारच थोडय़ा जणांना उपलब्ध असते. त्यामुळे बागेची हौस पूर्ण करण्यासाठी खूप जणांना कुंडीतच झाडे लावावी लागतात. मात्र जमिनीत झाड लावण्यापेक्षा कुंडीत झाडे लावण्याचे अन्य काही फायदेही आहेत.
पहिला फायदा म्हणजे आपण कुठेही राहात असलो चाळीत, फ्लॅटमध्ये, टेरेस फ्लॅटमध्ये किंवा बंगल्यात तरी कुंडी आपण ठेवू शकतो. तसेच आपण तळमजल्यावर असो किंवा वरच्या मजल्यावर कुंडीत आपण झाड लावू शकतो. घरातसुद्धा कुठलीही जागा कुंडी ठेवायला वज्र्य नाही. बैठकीची खोली, स्वयंपाकघर, बेडरूम, संडास, न्हाणीघर अशा सर्व खोल्यांमध्ये योग्य ठिकाणी योग्य आकाराची कुंडी ठेवू शकतो.
कुंडीत झाड लावण्याचा दुसरा फायदा म्हणजे कोणत्याही ऋतूत कुंडीत झाड लावणं सोपं आहे. त्यासाठी पावसाळाच असणं गरजेचं नाही. ऊन जास्त असताना जरी झाड लावलं तरी नवीन झाड लावलेली कुंडी आपण सावलीत ठेवू शकतो. जमिनीत असं करता येत नाही. थोडक्यात कुंडीतील लागवड आपण कुठेही आणि केव्हाही करू शकतो.
कुंडी हलवता येत असल्यामुळे कुंडीतील झाड आपण पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा ठेवू शकतो. हा कुंडीतील लागवडीचा फारच मोठा फायदा आहे. त्यामुळे जमिनीची जागा उपलब्ध असली तरी काही झाडं मुद्दाम कुंडीत लावावीत. कुंडीतील झाडांच्या सहाय्याने, आपण बागेमध्ये जायच्या ऐवजी, बागच आपण आपल्याजवळ आणू शकतो.
कुंडीची निवड :
बाजारात विविध मटेरीअलच्या कुंडय़ा उपलब्ध आहेत. उदा. माती, प्लास्टिक, सिरामिक, सिमेंट, इत्यादी. त्यापैकी फक्त मातीच्या कुंडय़ा सच्छिद्र असल्यामुळे त्यातून हवा खेळते. हवा खेळणे या एका फायद्याव्यतिरिक्त तिचे तोटे जास्त आहेत. उदा. पावसाळ्यात शेवाळे धरणे, हलवायला जड, कुंडी फुटणे इत्यादी. सिरामिक आणि सिमेंटच्या कुंडय़ाही जड असतात. त्यामुळे प्लास्टिकच्या कुंडय़ा वापरणे सोयीचे पडते. कुंडय़ांसाठी वापरले जाणारे प्लास्टिक हे बहुतेकदा पुनर्प्रक्रिया केलेले असते. त्यामुळे प्लास्टिकची कुंडी पर्यावरणाला धोका निर्माण करत नाही.
कुंडीच्या आकारा बाबतीतही वेगवेगळ्या आकाराच्या कुंडय़ा उपलब्ध असतात. कुंडीच्या आकाराचा विचार करताना, झाड आणि कुंडी एकमेकांना शोभून दिसणारी असावी. कोणतेही झाड लहान असताना त्याला साजेशी लहानच कुंडी वापरावी. ते मोठे झाल्यावर, त्याला साजेशा मोठय़ा कुंडीत आपण हलवू शकतो. यामुळे जागा वाचते आणि जास्त कुंडय़ा आपण ठेवू शकतो. जमिनीवरचा झाडाचा भाग आपल्याला दिसतो, पण कुंडी ही झाडाच्या न दिसणाऱ्या भागासाठी अर्थात मुळांसाठी आहे. कुंडीमध्ये झाडाची मुळे वाढणार आहेत. सर्वसाधारणपणे मुळांचा पसारा हा झाडाच्या डोलाऱ्याप्रमाणे असतो. उंच, उभे वाढणाऱ्या झाडाची मुळे खोल जातात तर पसरणाऱ्या झाडाची मुळेही पसरतात. उंच झाडाला उभी, खोल कुंडी वापरावी तर पसरणाऱ्या झाडाला पसरट कुंडी वापरावी. यावरून कुंडी आणि झाड याचे योग्य समीकरण आपण ठरवू शकतो.
कुंडीला तळाशी भोकं आहेत की नाही ते आवर्जून बघावं. पाण्याचा निचरा होण्यासाठी तसेच कुंडीतल्या मातीत हवा खेळण्यासाठी कुंडीला तीन ते चार भोकं असावीत. कुंडी जमिनीवर ठेवल्यावर तिची भोकं आणि जमीन यात थोडं अंतर राहील अशाच कुंडय़ा निवडाव्यात. त्यामुळे भोकं बुजण्याची आणि त्यामुळे पाण्याचा निचरा न होण्याची शक्यता कमी होते.
लेखासोबतच्या छायाचित्रातील कुंडी योग्य आहे, कारण तिची ४ भोके प्लेटला/जमिनीला टेकतील, पण ४ भोके जमिनीला टेकणार नाहीत. अशा प्रकारे योग्य कुंडीची निवड करूनच गृहवाटिकेला सुरुवात करावी.

Can Spicy Food Cause Stomach Ulcers
तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात अल्सर होतो का? झणझणीत खायला आवडत असेल तर नक्की वाचा
Preparation Strategy for Competitive Exams
करिअर मंत्र
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा