ठाणे : घोडबंदर मार्गालगत असलेल्या महत्त्वाचा कापूरबावडी ते ढोकाळी हा बंद मार्ग अखेर ठाणे महापालिकेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत हा मार्ग खुला होणार आहे. हा मार्ग खुला करण्यात यावा यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात होती. मार्ग खुला झाल्यानंतर कोलशेत, हायलँड, कापूरबावडी, ढोकाळी येथील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा मार्ग एका ‘ सुमित बाबा’च्या आदेशाने बंद केल्याची चर्चा ठाण्यात सुरू होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्याकाही वर्षांमध्ये ठाण्यातील घोडबंदर, हायलँड, बाळकूम, कोलशेत, ढोकाळी आणि मनोरमानगर भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. या भागातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. घोडबंदर मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेने कापूरबावडी आणि माजिवडा चौकात काही बदल सूचवले होते. या बदलाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेने येथील ढोकाळी, कोलशेत मार्गाला जोडणारा कापूरबावडी ते ढोकाळी हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वाहतुक कापूरबावडी येथून हायलँड, ढोकाळी मार्गे सोडली जात होती. या वाहतुक बदलामुळे कापूरबावडी चौकात मोठी वाहतुक कोंडी होत होती.

हेही वाचा… उल्हासनगरात कलानी ताकदवान, श्रीकांत शिंदेंकडून टीम कलानीवर स्तुतीसुमने

काही महिन्यांपूर्वी कोलशेत भागात सेंट्रल पार्क आणि हायलँड भागात प्रशस्त मंदीर उभारण्यात आले आहे. त्यामुळे या पार्कमध्ये आणि मंदीरात येणाऱ्या वाहनांचा भार देखील मार्गावर वाढला होता. सुट्ट्यांच्या दिवसांत हायलँड, कोलशेत भागात मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. हा मार्ग खुला करण्यासाठी वाहतुक पोलिसांकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून देखील हा मार्ग खुला करण्यासाठी मागणी केली जात होती. परंतु महापालिकेकडून हा मार्ग खुला केला जात नव्हता. त्यामुळे येथील कोंडी सोडविताना वाहतुक पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.

गेल्या आठवड्याभरात कापूरबावडी, हायलँड भागात वाहतुक कोंडीच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर अखेर उशीराने जाग आलेल्या ठाणे महापालिकेने येथील कापूरबावडी- ढोकाळी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील दुभाजक हटविण्यात आले आहेत. येथे डांबरी रस्ता तयार करून येत्या एक ते दोन दिवसांत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… डोंबिवलीत पालिका साहाय्यक आयुक्ताबरोबर सफाई कामगाराची अरेरावी

ठाणे शहरात ठिकठिकाणी मुख्य मार्गावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. कापूरबावडी-ढोकाळी हा मार्ग देखील बंद करण्यात आला होता. हे दुभाजक ‘सुमित बाबा’ नावाच्या व्यक्तीच्या सूचनेवरून बसविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. हा रस्ता देखील त्यांच्या सांगण्यावरून केल्याची चर्चा ठाण्यात सुरू होती. त्यामुळे रहिवाशांकडून मागणी करूनही रस्ता खुला केला जात नसल्याची चर्चा रंंगली होती.

शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

रस्ता खुला करण्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांनीच पाठपुरावा केल्याने हा रस्ता खुला झाल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी परिसरात मोठे फलक उभारले आहे. तर भाजपचे पदाधिकारी दत्ता घाडगे यांनी सहा महिन्यांपासून आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत असल्याचा दावा केला आहे.

हा रस्ता खुला करण्यात यावा यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हायलँड येथे सभेला आले असताना, त्यांचासोबत आम्ही चर्चा केली. त्यामुळे हा रस्ता खुला झाला. परंतु काही लोक फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका संजय भोईर यांनी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे असे म्हणत त्यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांचे नाव घेणे टाळले.

हेही वाचा… ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू

मागील सहा महिन्यांपासून आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून रस्ता खुला करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ठाणे शहर जिल्हा फ्रेंड्स ऑफ भाजपचे संयोजक दत्ता घाडगे यांनी सांगितले. राज्यात भाजपची युती आहे. तन-मन-धनाने ही युती असायला हवी. परंतु ठाण्यात हे चित्र कमी प्रमाणात दिसते. ठाणे महापालिकेत केवळ एकाच पक्षाची ‘दादा’गिरी सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकी दिसून येत नाही असा आरोप त्यांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation going to open the kapurbawdi dhokali route due to public appeal asj