सह्य़ाद्रीत भटकंती करणाऱ्या प्रत्येकालाच दरवेळी त्याचं नवीन रूपडं दिसतं. त्यामुळे पावलं नेहमीच सह्य़ाद्रीची वाट शोधत फिरतात. जुन्नर तालुक्यातील चावंड किल्ला नुकताच आम्ही सर करून आलो. येथे जाण्यासाठी पुणे-जुन्नर-आपटाळे मागे टाकत जुन्नरपासून पश्चिमेला जवळपास १५ कि.मी. असलेल्या चावंड गावापर्यंत पोहोचावे लागते. समुद्रसपाटीपासून या किल्ल्यांची उंची १०६५ मीटर असून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला प्रसन्नगड असे उपनाम दिले आहे. या किल्ल्याचा समृद्ध इतिहास आपल्याला थेट सातवाहन काळात घेऊन जातो.

किल्ल्याच्या पायथ्यापासूनच पायऱ्यांचे बांधकाम झाले असल्याने अर्धी वाट चढणे फारच सोयीचे झाले आहे. परंतु, पुढची वाट मात्र किंचित घाबरवणारी आहे. कारण ही वाट सरळ अंगावर येणाऱ्या उभ्या कडय़ावरून चढते. गडाची मूळची वाट इंग्रजांनी १८१८ मध्ये उडवली आहे. सुरुंग लावल्याच्या खुणा आजही येथील कातळावर स्पष्टपणे दिसतात. पानिपतच्या युद्धानंतर महाराष्ट्रातील सर्व किल्ले नेस्तनाबूत करण्यासाठी इंग्रजांनी ही कारवाई केली. सध्या गडावर जाण्यासाठी कातळात केवळ पाऊल ठेवण्याजोग्या खोदीव पायऱ्यांवरून जावे लागते. आता वनखात्याने या साहसी वाटेला कठडे बसवले आहेत.
पायऱ्या चढून वर आलो की डाव्या बाजूला संपूर्ण कातळात कोरलेले गडाचे प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वाराकडे वळण्याआधी समोरच कातळात कोरलेली सुबक गणेशमूर्ती लक्ष वेधून घेते. या प्रवेशद्वारातून काही पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला तटबंदीकडे रस्ता जातो. तर उजव्या बाजूला गेल्यावर बांधकामाचे काही चौथरे दिसतात. येथून वरच्या दिशेने गेल्यास कोरीव काम केलेल्या एका मंदिराचे अवशेष दिसतात. या मंदिरासमोरच एक भले मोठे कुंड आहे. याला पुष्करणी असेही म्हणतात. या कुंडाच्या चारही बाजूंना अनेक कोरीव मूर्तीचे अवशेष आजही तग धरून आहेत. भग्नावस्थेत असलेल्या या मंदिराच्या केवळ अवशेषांवरूनही त्याच्या भव्यतेचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.
चावंड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम आधुनिक असले तरी आतील मूर्ती मात्र प्राचीन आहे. आजूबाजूला अन्यही देवतांच्या मूर्ती आहेत.
गडावर पाण्याच्या एकूण १७ टाक्या आहेत. त्यापैकी उत्तर दिशेला ७ टाक्यांचा एकत्रित समूह पाहण्यासारखा आहे. गडावरील हे सर्वात विलोभनीय ठिकाण म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सात टाक्यांपैकी सहा टाक्या या अंतर्गत जोडलेल्या वाटतात. कारण या सहाही टाक्यांमधील पाण्याची पातळी नेहमी सारखी असते. याची रचनाही फार वैशिष्टय़पूर्ण आहे. आत उतरण्यासाठी पायऱ्या असून, याला एक कोरीव दरवाजादेखील आहे. दरवाज्याच्या मध्यभागी असलेली आकर्षक गणेशमूर्ती सहजपणे नजरेत भरते.येथून पुढे एक वाट उत्तर दिशेस खाली उतरत जाते. इथे डोंगराकडेने खाली उतरून गेल्यावर कातळात कोरलेल्या गुहा लागतात. या वातानुकूलित खोल्याच म्हणा ना!! यातील एक गुहा आजही सुस्थितीत असून, आत जाण्यास छोटासा दरवाजा आहे.
या गुहांमध्ये आल्यावर समोरचे दिसणारे
दृश्य डोळ्याचे पारणे फेडते. माणिकडोह धरणाचे निळेशार पाणी, भोवतीची लाल मातीची
आकर्षक बेटे, टुमदार छोटी-छोटी घरे, समोर धडकी भरवणारी सह्य़ाद्रीची
डोंगररांग, त्यावर दिमाखात उभे असणारे हडसर, निमगिरी, शिंदोळा आणि पाठिमागे स्वच्छ निळा आसमंत! स्वर्गसुख म्हणतात ते यापेक्षा वेगळे तरी काय असेल?