बोरिवली राष्ट्रीय उद्यान मुंबई महानगराच्या मधोमध विस्तारलेलं असल्याने सर्वपरिचित आहे.
उद्यानातील पर्यटन क्षेत्र, व्याघ्र व सिंह विहार आणि कान्हेरी गुंफा या ठिकाणांना दर आठवडय़ाला हजारो पर्यटक भेट देतात. वन विभाग व विविध संस्थांसोबत उद्यानातील शिलोंढा, मानपाडा व येउरसारख्या ठिकाणीं निसर्गप्रेमी मंडळी वेळोवेळी पदभ्रमणाकरता जात असतात. तुलनेने उद्यानाचा दक्षिणेकडील गोरेगावचा भाग अपरिचित आहे. शिवाय इथे फाळके चित्रनगरी, आरे दुग्ध वसाहत, विहार व पवई तलाव, आयआयटीचं आवार आणि बीएनएचएस संवर्धन शिक्षण केंद्र (सिइसी) अशी नसíगक अधिवास शाबूत असलेली ठिकाणं उद्यानाला संलग्न आहेत. त्यामुळे उद्यानातील सापडणारे विविध पशु-पक्षी इथेही आपलं अस्तित्व टिकवून आहेत.
बीएनएचएस सीइसी परिसरातील जंगलात अलीकडेच पावसाळा संपताना संध्याकाळी पाच-सहा निसर्गअभ्यासकांसोबत पदभ्रमण करण्याचा योग आला आणि जंगलच्या राजाशी समोरासमोर गाठ पडली! मुंबईतील शेवटचा पट्टेरी वाघ १९४० च्या दशकात मारल्यापासून बिबटयाच इथला राजा बनला आहे. बोरिवली राष्ट्रीय उद्यानात पंधरा वर्ष भटकंती करून व वेळोवेळी वन विभागासोबत रात्री मचाणावर बसूनही न पाहिलेलं अपूर्व दृश्य असं अवचितपणे सामोरं आलं! आत्तापर्यंत केवळ बिबटयाचे आवाज ऐकले होते, विष्टा व नखांच्या झाडावरील खुणा पहिल्या होत्या आणि त्याच्या अंगाचा उग्र दर्प अनेकवेळा नाकाला स्पर्श करून गेला होता. पण त्याचे हे प्रत्यक्ष दर्शन अंगावर काटा उमटवणारे होते.
नुकताच पावसाळा संपला होता. जंगल सर्वत्र घनदाट झालं होतं. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना बांबू, हेदू, करवंद, कराई, साग, सावर, कांचन आणि काही ठिकाणी वन विभागाने लावलेली गिरिपुष्प, सोनमोहर व गुलमोहर अशी सगळी झाडं दाटीवाटीने उभी होती. उन्हं कललेली होती व त्यामुळे वातावरण एकप्रकारे गूढ व गंभीर भासत होतं. जागोजागी खाली लाल व वर पांढरी असणारी पेवची फुलं डोलत होती. त्यामुळे वातावरणात थोडा जिवंतपणा येत होता. मराठीत ‘पेव फुटणे’ हा वाक्प्रचार रानात मोठ्या संख्येने वाढणाऱ्या या सपुष्प झुडपामुळेच प्रचलित झाला. सोबत जांभळी तेरड्याची फुलं (बाल्सम), गुलाबी-पिवळी रानहळदीची फुलं व नाजूक गौरीची फुलंही (सिल्व्हर कॉक्स कोंब) लक्ष वेधून घेत होती.
चतुर हवेत अविश्रांत तरंगत होते. ‘आउल फ्लाय’ ही तोंडावर मिशीसारखी दोन संवेदनाग्र असलेली चतुरची जात काही झुडपांवर बसली होती. ‘ऑर्ब विव्हर’ हे भगव्या व काळ्या रंगाचे कोळी ठिकठिकाणी आपली वर्तुळाकार जाळी विणून ध्यानस्त बसले होते. या कोळ्यांच्या काळ्या पायांवर ठळक पिवळ्या रेषा असतात. आपल्याकडच्या जंगलांत अनेक ठिकाणी दिसणाऱ्या जायंट वूड स्पायडर या मोठ्या कोळ्यापेक्षा हे लहान असतात. ‘ऑरेंज टीप’ जातीची सुंदर फुलपाखरं इकडून तिकडे उडत होती. रानकेळीची मोठमोठी पानं वाऱ्यावर हलत होती. नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यामुळे सर्वत्र ओल होती व पोपटी रंगाचे नेचे उगवले होते.
अचानक उजवीकडच्या हेदुच्या उंच झाडावर एक घोरपड सरसर चढत गेली व दिसेनाशी झाली. बहुतेक एखाद्या पक्ष्याची अंडी फस्त करण्याचा तिचा विचार असावा. डोमकावळ्यांचे कर्कश आवाज व कवड्यांचं शांत स्वरात ‘‘क्रूक्रूक्रू’’ आलटून पालटून कानांवर येत होतं. इवल्याशा िशपीचं मोठ्या आवाजातलं ‘‘टोवीट-टोवीट’’ मधेच ऐकू येत होतं. एके ठिकाणी उंचवट्यावर थोडं मोकळण होतं व एका उंच झाडावर पंखांची फडफड ऐकू आली. दुसऱ्या क्षणी दोन करडे धनेश (इंडियन ग्रे हॉर्नबिल) दिमाखदारपणे दूर उडत गेले. इथून जवळच असलेल्या विहार तलावाचा विशाल पृष्ठभाग व काठावरचं दाट जंगल असं सुंदर दृश्य दिसत होतं.
थोडं पुढे गेल्यावर पायवाटेवरील उतारावर आम्हाला एक प्राणी रस्त्याच्या मधोमध उभा असलेला दिसला. एक-दोन पावलं टाकल्यावर तो बिबटय़ा असल्याचं लक्षात आलं! सर्वजण जणू पुतळा होऊन त्याकडे पाहत होतो. काही क्षणात ते उमदं जनावर वाटेच्या कडेला गेलं आणि एक डौलदार उडी मारून बाजूच्या रानात अदृश्य झालं. उडी मारताना त्याची कमानदार शेपूट छान दिसली. हा बिबटय़ा बराच गडद रंगाचा दिसत होता. कदाचित संध्याकाळच्या उजेडात तसा भासला असेल. केवळ १५-२० सेकंदांचा हा अनुभव अविस्मरणीय होता. एखाद्या ‘जेन्टलमन’ सारखा तो आपल्या वाटेने शांतपणे निघून गेला. जंगलात पुरेसं नसíगक खाद्य असेल तर हे प्राणी माणसाच्या वाटेला जात नाहीत हे प्रत्यक्ष अनुभवलं होतं. पण असाच एखादा भुकेला बिबट्या जर जंगलाला सतत मागे रेटत वाढणाऱ्या वस्तीत शिरला तर भयंकर रूप धरण करू शकतो, हे आपण वेळोवेळी वर्तमानपत्रात वाचतोच. अशावेळी निष्पाप जीव त्याचे बळी ठरतात. मानव व मार्जार कुळातील प्राणी हे दोन्ही आपापल्या क्षेत्राचे राजेच आहेत. आणि दोन शांतताप्रिय व समंजस राजांनी नेहेमीच एकमेकांच्या सरहद्दींचा आदर ठेवून राहायला हवं.या पूर्वी मी गोरेगाव बाजूच्या जंगलात सांबर, चितळ हरण, हनुमान लंगुर व दख्खनी माकड अनेक वेळा पाहिलय. त्याशिवाय येथील जंगलात भेकर, रानडुक्कर, मुंगुस, रान मांजर व वाघाटी (लेपर्ड कॅट) आढळतात. झाडावर व जमिनीवर मुंग्यांची वारुळं अनेक ठिकाणी दिसतात. दोन वेळा मला इथे चक्क मलबार कवड्या धनेश (पाईड हॉर्नबिल) दिसलाय! कोकणात इतक्या उत्तरेला हा पक्षी अन्यत्र कुठे आढळल्याचं माझ्या माहितीत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच उद्यानाच्या बोरिवलीकडील भागात मला हा कधीच दिसला नाही. कदाचित गोरेगाव भागात आणून सोडलेले एक-दोन पक्षी इथे वावरत असतील. या व्यतिरिक्त सुभग (आयोरा), स्वर्गीय नर्तक (पॅराडाइस फ्लायकॅत्चर), कुतुर्गा (ब्राऊन-हेडेड बाब्रेट), करडा रानकोंबडा, मोर, हळद्या, काळटोप हळद्या, शिक्रा, तुरेवाला सर्पगरुड, नाचण, खरुची (केस्ट्रेल), बगळा, पाणकावळा, वंचक व टिटवीसारखे असंख्य पक्षिगण इथे आहेतच.
पुन्हा बिबट्या दिसेल अशा थरारयुक्त आशेने आम्ही सूर्य पश्चिम क्षितिजाकडे कलायच्या आत परतीचा रस्ता धरला. या अनिश्चित प्रकाश-सावलीच्या वातावरणात सुदैवाने किंवा दुर्दैवाने तो पुन्हा दिसला नाही. मात्र िपगळ्याचे आवाज दोन-तीन वेळा कानावर आले. दिवस मावळतीला लागल्याचे हे संकेत होते. वाटेत एके ठिकाणी येताना पाहण्यात न आलेली बिनविषारी धामणची नुकतीच टाकलेली कात पायवाटेच्या बाजूला पडली होती. दोन पावलं पुढे कडेच्या ओढ्याकाठी दगड-धोंड्यात सळसळत जाणारी धामण दिसली. अशा सांजवेळी ती कात सुद्धा प्रथम जिवंत सापासारखीच वाटली होती. अचानक झालेल्या या सर्व वन्यजीवांच्या दर्शनाने तृप्त होऊन आम्ही पुरेसा उजेड असताना कॉन्क्रीटच्या जंगलात परत आलो. बीएनएचएस सीइसीच्या वर्षभर होणाऱ्या कार्यशाळा व पदभ्रमण उपक्रमांच्या निमित्ताने परत कधीतरी बिबट्याची स्वारी भेटेल कदाचित. येऊ घातलेल्या थंडीच्या दिवसांत झाडांची पिवळी होऊन गळणारी पानं, त्यामुळे जंगलात दूपर्यंत पोहोचणारी नजर आणि पशु-पक्षी निरीक्षणाची वाढलेली शक्यता या सगळ्या जमेच्या बाजू आहेत.