पाकिस्तानने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा तब्बल 143 धावांनी पराभव केला. कराचीमध्ये 9 वर्षानंतर हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. देशामध्ये क्रिकेटचं विजयाने पुनरागमन झाल्याने पाकिस्तानात क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला. टी-20 क्रिकेटमधील हा पाकिस्तानचा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पाच विकेट गमावून 203 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाहुणा वेस्टइंडिजचा संघ अवघ्या 13.4 षटकांत केवळ 60 धावा करून गारद झाला. टी-20 क्रिकेटमधील वेस्ट इंडिजची ही निचांकी धावसंख्या ठरली. 41 धावा आणि एक गडी बाद करून अष्टपैलू प्रदर्शन करणा-या हुसैन तलत याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

नाणेफेकीचा कौल जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत केवळ पाच गडी गमावून 203 धावा केल्या. त्यांच्याकडून हुसैन तलत याने सर्वाधिक 41 धावा केल्या. त्यानंतर फखर जमान (24 चेंडू 39 धावा) आणि सरफराज अहमद (22 चेंडू 38 धावा) आणि शोएब मलिकने केवळ 14 चेंडूंमध्ये 37 धावा फटकावल्या.
204 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला पाकिस्तानच्या धारधार गोलंदाजीपुढे मैदानात तग धरता आला नाही. त्यांची सुरूवात खराब झाली. अवघ्या 15 धावांच्या आत त्यांचे 4 गडी बाद झाले होते. मार्लन सॅम्युअल्सने 18 धावा केल्या पण अवघ्या 13.4 षटकात वेस्ट इंडिजचा संघ 60 धावांमध्येच गारद झाला, त्यांच्या पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.