गावातील शेतकरी कुटुंबाचं घर म्हणजे, कोंबडय़ांचं खुराडं, दारात जनावराचा गोठा. मात्र या गोठय़ात बांधलेली शेळीच एका तरुणाचं ठरलेलं लग्न मोडण्यास कारणीभूत ठरली. पलूस तालुक्यातील अडीच हजार लोकसंख्येच्या एका गावात घडलेल्या या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. लग्नात विघ्न आणणाऱ्या या शेळीचा मात्र उद्या मंगळवारी पलूसच्या बाजारात बाजार करण्याचा निर्णय वराच्या मातेने घेतला.

एका विठ्ठलाच्या नावाने वसलेल्या गावात एका सुशिक्षित आणि माध्यमिक शाळेत कायमस्वरूपी नोकरीस असलेल्या तरुणाचे लग्न याच परिसरातील निमशहरी गावातील मुलीशी निश्चित करण्यात आले होते. यासाठी पडद्याआड फारशी देवघेवही करण्यात येणार नव्हती. लग्नापूर्वीच्या वाटाघाटीही पूर्ण झाल्या होत्या. मुलगी निमशहरी गावातील असल्याने चांगले शिक्षणही झालेले. यामुळे दोन्हीकडे पसंतीची तयारी दर्शविण्यात आली.

मुलाने मुलीला आणि मुलीने मुलाला पसंत केले असल्याने दोघांनीही निम्मे लग्न झाले असल्याची समजूत करीत एकमेकांना संपर्कासाठी भ्रमणध्वनीचे नंबरही दिले. दोन दिवस दोघांमध्ये भावी संसाराची स्वप्नेही रंगवली जात होती. आता विवाहमुहूर्त दोन्ही घरच्या सामंजस्याने निश्चित करण्यासाठी मुलीकडील मंडळी वराच्या घरी आली होती.

मात्र दारात पाउल टाकताच गोठय़ात बांधलेल्या शेळीने घात केला. शेळी पाहून मुलीच्या आईचा पारा चढला. गुरा-ढोराच्या वासात माझी कोमल पोरगी नांदायची कशी हा प्रश्न तिला सतावू लागला. यातच सोबत आलेल्या मुलीकडील महिलांनीही या म्हणण्याला दुजोरा देत शहरातील वास्तव्य केलेल्या मुलीला असले घर काय म्हणून पसंत करतेस, असे म्हणत फोडणी दिली. झालं. ठरू पाहणारं लग्न दारातील शेळीच्या दर्शनाने मोडण्याचा ठाम निर्धार व्यक्त करीत वधूकडील मंडळी गावी परतली.

गेले दोन दिवस पलूस तालुक्यात शेळीमुळे लग्न मोडल्याची खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. या चच्रेमुळे वैतागलेल्या मुलाच्या घरच्या मंडळींनी शेळीला मंगळवारचा पलूसचा बाजार दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.