अमेरिकन फूड चेनमध्ये प्रसिद्ध असलेल्या बर्गर किंगने एक अतिशय वाह्यात जाहिरात केली आहे. सध्या सुरु असलेल्या फुटबॉल विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चाही सुरु आहे. या जाहिरातीमुळे कंपनीला माफी मागण्याचीही वेळ आली आहे. रशियामध्ये सध्या फुटबॉल विश्वकपची स्पर्धा सुरु आहे. रशियामध्ये कोणतीही तरुणी विश्वकप स्पर्धेत सहभागी असलेल्या फुटबॉल खेळाडूकडून गर्भवती राहील्यास तिला ३२ लाख रुपये देण्यात येतील. तसेच या तरुणीला आयुष्यभरासाठी बर्गर किंगमध्ये मोफत पदार्थ मिळणार आहेत.

या जाहिरातीवर लोकांनी अतिशय कडक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे ही जाहिरात हटविण्यात आली. आपण चूक केली असल्याचे कबूल करत माफीही मागितली. हा आमच्या ब्रँडचा स्तर नसून आमच्याकडून भविष्यात अशाप्रकारची चूक होणार नाही असेही बर्गर किंगकडून सांगण्यात आले आहे. बर्गर किंगने अशाप्रकारची जाहिरात करण्याची ही पहिली वेळ नसून त्यांच्याकडून याआधीही अशाप्रकारचा चुका करण्यात आल्या आहेत. २०१७ मध्ये बलात्कारपिडीत अल्पवयीन मुलींबाबतही एक वादग्रस्त जाहिरात केली होती. त्यावेळीही टिका झाल्यावर ही जाहिरात काढून टाकण्यात आली होती. २००९ मध्येही आपल्या एका बर्गरच्या जाहिरातीमध्ये अश्लील गोष्टी दाखवल्या होत्या.