पाळीव प्राण्यांपैकी सर्वांना आवडणारा एक प्राणी म्हणजे कुत्रा. प्रामाणिकपणाचं उदाहरण देताना कुत्र्याकडून शिक असं लोक म्हणतात. प्रामाणिकबरोबरच चाणाक्ष आणि  हुशारही असतो. त्यामुळेच बहुदा कुत्रा इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत अधिक हवाहवासा वाटतो. परंतु या प्राण्याची हुशारी कधीकधी मालकाच्या अंगलटदेखील येऊ शकते. अशीच काहीशी आश्चर्यचकित करणारी घटना फ्लोरिडा येथे घडली आहे. येथील एका कुत्र्याने चक्क शेजाऱ्यांची गाडी पळवण्याचा अनोखा प्रयत्न केला.

प्रकरण नेमकं काय आहे?

पोर्ट सेंट लुईस येथील पोलीस स्टेशमध्ये एक फोन आला. या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तिनं त्याची गाडी कोणीतरी पळवून नेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. तसेच त्याने गाडीचा नंबर व घराचा पत्ता देखील दिला. त्यानंतर पोलिसांनी गुगल नेव्हिगेशनच्या मदतीने गाडीचे नेमके लोकेशन शोधून काढले. गाडीचे लोकेशन पाहून पोलीस आश्चर्यचकित झाले, कारण त्या व्यक्तिने घराचा जो पत्ता दिला होता, तिथेच गाडी गोल फिरत होती. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस त्या पत्त्यावर गेले. त्यावेळी त्यांना गाडी एकाच जागेवर गोल गोल फिरत असल्याचे दिसले. खरं तर, ही गाडी एक कुत्रा चालवत होता.

पोलिसांना एंड्रयू सॅबोल या व्यक्तिने फोन केला होता. त्याच्या शेजारच्या घरात राहणारा एक पाळीव कुत्रा गाडीच्या खिडकीतून आता गेला व त्याने गाडी चालवण्याचा हा अनोखा प्रयत्न केला. गॅरेजबाहेर जाणारी गाडी पाहून सॅबोलला ती चोरी होत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली. परंतु पोलीस आल्यावर शेजारील कुत्राच गाडी चालवत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी गाडी थांबवली व त्या कुत्र्याला बाहेर काढले. दरम्यान जागोजागी आपटून गाडीचे खुप नुकसान झाले होते.