साधरण दहा रुपयात उपलब्ध होणारं ‘लिंबू’ हे फार गुणकारी आणि उपयोगी देखील.  सरबत किंवा एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी लिंबाच्या रसाचा किंवा त्याच्या सालीचा उपयोग केला जातो. तेव्हा स्वस्त आणि गुणकारी लिंबू आपल्या इथे सहज उपलब्ध होतं पण तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की कोणे एके काळी हेच फळ विकत घेणं म्हणजे स्टेटस सिम्बल समजलं जायचं. आता जरी कवडीमोल किंमतीत आपल्याला लिंबू बाजारात विकत मिळत असलं तरी प्राचीन रोममध्ये त्याकाळी लिंबांची किंमत ही सोन्यापेक्षाही जास्त होती.

इस्त्रायलमधल्या तेल अवीव विद्यापीठानं नुकतंच एक संशोधन प्रकाशित केलंय. त्यानुसार इसवी सन पहिल्या शतकात रोममध्ये लिंबू हे सर्वात जास्त उपलब्ध होती. लिंबू इतके दुर्मिळ होते की त्यासाठी उच्चभ्रु वर्गातले रोमन सर्वाधिक किंमत मोजायलाही मागेपुढे पाहायचे नाहीत. भूमध्य प्रदेशात लिंबू हे तेव्हा सहज उपलब्ध व्हायचे नाही. लिंबामध्ये असणारे औषधी गुणधर्म, त्यांचा प्रसन्नदायी सुवास आणि कमी उपलब्धता यांसारख्या अनेक गुणधर्मांमुळे लिंबाला विशेष मागणी होती. दक्षिण आशियामधून लिंबू मध्यपूर्वेकडील देशात आले होते. त्यामुळे प्राचीन रोम लोक लिंबू खरेदी करणं स्टेटस सिम्बल मानायचे.