बटाट्याचे वेफर्सची गणना कदाचित सर्वाधिक खरेदी होणाऱ्या फास्ट फुडमध्ये केली जाऊ शकते. याची किंमत किती असेल? आपल्याकडे कदाचित 10 रूपये, 20 रूपये, 50 रूपये. परंतु तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात महागड्या बटाट्याच्या वेफर्सची किंमत किती आहे? स्वीडनची कंपनी एरिक्स ब्रुवरी ही जगातील सर्वात महागडे बटाट्याचे वेफर्स तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीची एक खासियत म्हणजे या कंपनीच्या एका पॅकेटमध्ये केवळ 5 बटाट्याचे वेफर्स असतात आणि त्या पॅकची किंमत 56 डॉलर्स म्हणजेच 3 हजार 993 रूपये आहे. म्हणजेच एका बटाट्याच्या वेफरची किंमत जवळपास 784 रूपये इतकी आहे.

दरम्यान, असे वेफर्स घेण्यापूर्वी नक्कीच मनात एक विचार येईल की असं काय खास आहे या वेफर्समध्ये? तर या वेफर्सचे पॅकेट एका ज्वेलरीच्या बॉक्सप्रमाणे दिसते. प्रत्येक वेफरला ठेवण्यासाठी यामध्ये वेगवेगळा कप्पा करण्यात आला आहे. कंपनीच्या वेबसाईटवर याच्या संदर्भात काही फोटोज टाकण्यात आले आहेत.

आम्हाला आमच्या कंपनीच्या बिअरसोबत सर्व्ह करण्यासाठी एक नव्या प्रकारचे स्नॅक हवे होते. आम्हाला त्याच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड करायची नव्हती. त्यासाठी आम्ही खुप मेहनत केली आहे आणि जगातील एक्सक्लुसिव्ह बटाट्याचे वेफर्स तयार केले असल्याची माहिती कंपनीचे ब्रॅन्ड मॅनेजर मार्कस फ्रियरी यांनी सांगितले. हे बटाट्याचे वेफर्स सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. लेकसँड ओनिअन, अलमंड पोटॅटो, क्राऊन डिल, इंडिया पॅले अल वर्ट, टफल्ड सीवीड आणि मशरूम या प्रकारांमध्ये हे वेफर्स उपलब्ध आहेत.

या कंपनीच्या बॉक्समध्ये केवळ पाच वेफर्स मिळतात. तसेच यासोबत एक सर्टिफिकेटही देण्यात येते. हे वेफर्स तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ खुप दुर्मिळ आहेत. यामध्ये वापरण्यात येणारा कांदा हा केवळ लेकसँड शहरात 18 मे ते 10 ऑगस्टदरम्यानच पिकवण्यात येतो. कंपनी त्यांचे हे वेफर्स केवळ लिमिटेड एडिशन म्हणून तयार करते.