MS Dhoni First Job Appointment Letter : आयुष्यात यशस्वी व्हायचे, तर संघर्ष हा करावा लागतोच. कोणीची साथ असा वा नसो, कोणी काहीही बोलो; सर्व गोष्टी बाजूला ठेवून जो प्रामाणिक प्रयत्न करतो, तोच यशाच्या शिखरावर पोहोचतो. त्यामुळे प्रयत्नांना जर नशिबाची जोड मिळाली, तर व्यक्तीचे नशीब कुठे घेऊन जाईल ते सांगता येत नाही. भारतातील लोकप्रिय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचा प्रवासही असाच काहीसा होता. क्रिकेटर होण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. एक वेळ अशी आली की, क्रिकेट खेळताना घरच्या जबाबदाऱ्यांचा विचार करून त्याने टीसी म्हणजे तिकीट कलेक्टर म्हणून काम केले. त्याचा हा काळ खूप संघर्षमय होता. याच संघर्षातून त्याने यशाला गवसणी घातली; ज्यामुळे महेंद्रसिंग धोनी हे नाव आज केवळ भारतातच नाही, तर जगभरातील क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. धोनीच्या याच संघर्षमय प्रवासातील एका क्षणाची आठवण करून देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या फोटोत धोनीने भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून काम सुरू केले, ही त्याची पहिली नोकरी होती, याच नोकरीचे नियुक्ती पत्र व्हायरल होत आहे. सध्या हे नियुक्ती पत्र चाहत्यांसाठी एक चर्चेचा विषय बनले आहे.

हे नियुक्ती पत्र महेंद्रसिंग धोनीच्या रांची या शहरात सुरू असलेल्या इंग्लंड टेस्ट मॅचदरम्यान टीव्हीवर दाखविण्यात आले. या नियुक्ती पत्राचा फोटो @mufaddal_vohra या एका एक्स युजरने पोस्ट केले आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, एम. एस. धोनीचे पहिले नियुक्ती पत्र. ही पोस्ट पाहून एमएस धोनीच्या एका चाहत्याने म्हटले – आता हा बाकीचा इतिहास आहे. तर इतरांनी लिहिले – व्वा, अप्रतिम. 

या पोस्टवर आता शेकडो युजर्स कमेंट्स करीत आहेत.अनेकांना माहीत आहे की, एम. एस. धोनी आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात भारतीय रेल्वेच्या खरगपूर रेल्वेस्थानकावर तिकीट कलेक्टर म्हणून रुजू झाला; पण त्याने क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही नोकरी सोडली. दरम्यान, धोनीचा हाच संघर्षमय प्रवास एम. एस. धोनी चित्रपटात दाखविण्यात आला आहे.