महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया महामार्गावरील नवेगाव नागझिरा अभयारण्याजवळ एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वास्तविक वेगात कार चालविणाऱ्या एका व्यक्तीने वाघाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, वाघ जागीच पडला आणि गंभीर जखमी झाला. त्या वाघाची अशी अवस्था झाली होती की, त्याला पायावर धड उभेही राहता येत नव्हते.

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त परिसर असून, वाघांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अवघ्या १९ सेकंदांचा हा व्हिडीओ खूपच क्लेशदायक आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा या दुर्घटनेचा व्हिडीओ X च्या हॅण्डल @Prateek34381357 वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, वाघ रस्त्याच्या कडेला उदास अवस्थेत बसलेला आहे.

मोठ्या कष्टाने वाघ रस्ता ओलांडतो, कधी अडखळतो, तर कधी स्वतःला ओढतो. व्हिडीओसोबत माहिती देताना प्रतीकने लिहिले आहे, ‘नवेगाव-नागझिरा अभयारण्यातून जाणाऱ्या भंडारा-गोंदिया महामार्गावर हा प्रकार घडला. येथे भरधाव येणाऱ्या क्रेटा कारने रस्ता ओलांडणाऱ्या वाघाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की. कारच्या दोन एअर बॅग्ज बाहेर आल्याने कारचेही मोठे नुकसान झाले. परंतु, वाहनातील कुणालाही इजा झाली नाही. मात्र, या अपघातात वाघाला जबर मार बसल्याने तो आपल्या पायावर उभाही राहू शकत नव्हता. अखेर बऱ्याच वेळाने जखमेमुळे विव्हळत त्याने जंगलात प्रवेश केला.

(हे ही वाचा : VIDEO: माशाच्या नादाला लागणं मगरीला महागात पडलं; १८ सेकंदात घडवली आयुष्यभराची अद्दल, पाण्यात नेमकं घडलं काय?)

क्रेटा कारच्या धडकेत हा वाघ जखमी झाल्याची बातमी वन विभागाला मिळाली होती. वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेला वाघ जंगलात निघून गेला. रात्रीच्या अंधारात टॉर्चचा वापर करून, रस्त्यालगतच्या जंगलात वन कर्मचाऱ्यांनी वाघाचा शोध घेतला. परंतु, जखमी वाघाला उपचाराकरिता नागपूरला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या वाघाच्या मृत्यूने वन्यजीवप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या व्हिडीओला चार लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. मात्र, अनेक युजर्स हा जुना व्हिडीओ असल्याचा दावा करीत आहेत. अनेक युजर्सनी कार चालविणाऱ्या व्यक्तीबद्दल संताप व्यक्त केला आहे. बहुतेक वापरकर्त्यांनी खात्रीशीरपणे असे मत व्यक्त केले आहे की, “हा अपघत केवळ निष्काळजीपणाचा परिणाम आहे.” अनेक युजर्सनी असेही लिहिले आहे की, “एखादी व्यक्ती इतकी बेफिकीर कशी असू शकते.”

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://x.com/Prateek34381357/status/1792806688086716807?ref_src2v

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. काहींनी भरधाव कार चालवणाऱ्या चालकावर संताप व्यक्त केला. जंगलाच्या वाटेने कारमधून जाताना वन्यजीवांचा विचार करून वाहने चालविण्याचा सल्लाही काहींनी दिला आहे.

मात्र, या घटनेबाबत तुमचे काय मत आहे? कृपया आपले विचार लिहा.