आजही खेड्यापाड्यातील अनेक ठिकाणी शौचालयाची सोय नाही. या गावतील शाळांमध्येही हिच परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक मुलांना बाहेरच जावे लागते. पण हिच परिस्थिती बदलण्यासाठी मध्य प्रदेशमधील दोन भावंडांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या शाळेत फक्त एकच शौचालय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शौचालय वापरण्यासाठी वाट पाहावी लागते. मधल्या सुट्टीच्या वेळी अनेक विद्यार्थ्यी मोठी लाईन लावून या शौचालयचा वापर करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची फारच आबाळ होते. म्हणूनच दोन भावंडांनी आपल्या बचतीच्या पैशातून शौचालय बांधायचे ठरवले आहे.
मेमूना खान आणि आमिर खान अशी दोघांची नावे आहेत. या मुलांना शिष्यवृत्ती मिळते. पण शिष्यवृत्तीचे पैसे त्यांनी शाळेसाठी शौचालय बांधण्याकरता वापरण्याचे ठरवले आहे. मेमूना खान ही फक्त १६ वर्षांची आहे. तर तिचा भाऊ आमिर खान हा १४ वर्षांचा आहे. हे दोघेही पैन पै साठवत आहेत. आतापर्यंत या दोन्ही भावंडांनी शिष्यवृत्तीचे पैसे आणि बचतीचे पैसे मिळून दहा हजार रुपये जमवले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते पैसे साठवत आहेत. मध्य प्रदेशच्या महाराणी लक्ष्मण बाई उच्च माध्यमिक शाळेत हे दोघेही शिकतात. येथे एकच शौचालय असल्याची माहिती त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. तर लवकरच आपण चौदा हजारांच्या आसपास रक्कम साठवू असेही त्यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी शाळेपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता बांधावा यासाठी मेमूना हिने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते आणि त्यांनंतर त्वरित रस्त्यासाठी निधी देखील जमा झाला होता.