Indian Father Gifts Son Lamborghini Huracan as 18th birthday gift : वाढदिवस कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण असतो. यानिमित्त मित्रपरिवाराकडून खास सेलिब्रेशन केले जाते. या दिवशी जर कुटुंबीयांकडून काही खास गिफ्ट मिळाले तर होणारा आनंद दुप्पट असतो. अशाचप्रकारे एका १८ वर्षांच्या तरुणाला वाढदिवसाच्या दिवशी वडिलांकडून असे काही गिफ्ट मिळाले ज्याच्या त्याने स्वप्नातही विचार केला नसेल, तो क्षण तरुण आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. एका उद्योगपती वडिलांनी आपल्या मुलाला १८ व्या वाढदिवसानिमित्त चक्क महागडे गिफ्ट दिले, त्यांनी मुलाला तब्बल पाच कोटींची नवी कोरी अशी आलिशान लम्बोर्गिनी कार गिफ्ट म्हणून दिली. तरुणाच्या खास गिफ्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, वडील आपल्या मुलाला त्याच्या स्वप्नातील कार गिफ्ट करताना दिसत आहेत. या कारची किंमत पाच कोटींच्या घरात आहे. लम्बोर्गिनी हुराकन एसटीओ असे या कारचे नाव आहे. उद्योगपती विवेक कुमार रूंगटा आणि त्यांचा मुलगा तरुष याला गिफ्ट देतानाचा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य उमटेल.

हेही वाचा- PHOTO : मेट्रो ट्रेनमधील ‘ते’ दृश्य पाहून युजर्सचा संताप; म्हणाले, त्या व्यक्तीला शोधा आणि…

तरुष याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या स्वप्नातील कार गिफ्ट म्हणून देत वडिलांनी माझा १८ वा वाढदिवस खास व जादुई बनवला, ज्यासाठी वडील विवेक कुमार रूंगटा यांचे आभार व खूप-खूप प्रेम! तुमचे प्रेम व पाठिंबा माझ्यासाठी सर्व काही आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, विवेक कुमार रूंगटा आपल्या मुलासह लम्बोर्गिनी कारच्या शोरुममध्ये प्रवास करतात, यानंतर पुढे एका पिवळ्या रंगाच्या लक्झरी कारचे अनावरण होते, व्हिडीओच्या शेवटी तरुष आपल्या वडिलांना आनंदाने घट्ट मिठी मारतो. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी वडिलांचे मुलावरील असलेले प्रेम पाहून आनंद व्यक्त केला, तर अनेकांनी मुलाला अभिनंदन करत पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.