लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: मागील काही दिवसांपासून वसई-भाईंदर रो-रो सेवा सुरू झाली आहे. मात्र या सेवेमुळे खाडीत पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.

वसई, नायगाव, कोळीवाडा या भागातील मच्छीमार वसई खाडी तसेच जास्त करुन भाईंदर खाडीत पारंपारिक पद्धतीने आणि त्यावर डोल, जाळे बांधून मागील ६० ते ७० वर्षांपासून मासेमारी करत आहेत.

आणखी वाचा- नालासोपाऱ्यातील बनावट चकमक प्रकरण, दोन पोलिसांना हत्येच्या गुन्ह्यात अटक

सदर जागेचा खुंटवाच्या रुपाने सरकारला कर भरणा केला जात आहे. परंतु मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई भाईंदर अशी रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्या भागात मच्छीमारांची मासेमारी करण्याची जागा होती त्याच भागातून या रो-रोची वाहतूक सुरू असते. याचा परिणाम पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीवर होऊन नुकसान होऊ लागले आहे, असे नायगाव कोळीवाडा येथील मच्छीमारांनी सांगितले

उपाययोजना करण्याची मागणी

आधीच मत्स्य दुष्काळ व इतर समस्या यामुळे अडचणी आल्या आहेत. त्यातच आता रोरो वाहतूक यामुळे मासेमारी करण्याची जागा बाधित झाल्याने व्यवसाय ठप्प होईल यासाठी यावर योग्य त्या उपाययोजना करून मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळ व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार ही करण्यात आल्याचे मच्छीमारांनी सांगितले आहे.