परदेशांतून आलेल्या १५ जणांचा अहवाल अद्याप प्रलंबित

भाईंदर :-  ‘ओमायक्रोन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर  मीरा भाईंदर शहरात २६० नागरिक परदेशातून आले असल्याची माहिती पालिकेला प्राप्त झाली आहे. पालिकेने या सर्व जणांची करोना चाचणी केली असता ती नकारात्मक आली असून उर्वरित १५ जणांचा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे.

सध्या जगभरात करोना आजाराच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या विषाणूने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत या विषाणूचा शिरकाव देशात झाला असून महाराष्ट्रातदेखील नऊ रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून खबरदारीची पावले उचलण्याकडे भर देण्यात येत आहे. यात परदेशातून येत असलेल्या नागरिकांवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे.

आतापर्यंत पालिकेला प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण २६० नागरिक हे परदेशांतून मीरा-भाईंदरमध्ये आले आहेत. अशा नागरिकांशी पालिकेने संपर्क साधून सर्वाची करोना चाचणी केली असून सर्वांचा अहवाल नकारात्मक आला आहे. याचप्रकारे अशा नागरिकांच्या संपर्कात असलेल्या नागरिकांचीदेखील शोधमोहीम सुरू असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी प्रकाश जाधव यांनी दिली.

मीरा-भाईंदर शहरात आतापर्यंत परदेशांतून आलेल्या नागरिकांची करोना चाचणी नकारात्मक आलेली आहे. शिवाय नुकतीच ६० जणांची चाचणी करण्यात आलेली असून त्यातील ४५ जणांचा अहवाल नकारात्मक आला असून उर्वरित अहवाल अद्यापही शिल्लक आहे.

संजय शिंदे , उपायुक्त (वैद्यकीय विभाग)