18 January 2019

News Flash

मनातलं घर

असावे घरकुल अपुले छान.. असं प्रत्येकालाच वाटतं. पण ते साध्य न होण्यामागे अनेक सबबी सांगितल्या जातात.

|| संपदा वागळे

असावे घरकुल अपुले छान.. असं प्रत्येकालाच वाटतं. पण ते साध्य न होण्यामागे अनेक सबबी सांगितल्या जातात. त्यातील नंबर एकची पळवाट म्हणजे पुरेशा जागेची उपलब्धता. परंतु या समस्येवर सौंदर्यदृष्टीने मात करून छोटय़ाशा जागेतही स्वर्ग फुलवणारी घरं आपल्या मनात घर करतात. डॉ. भारती माटे यांचं घर हे यापैकीच एक. पुण्याच्या दत्तवाडी परिसरातील त्यांच्या ६७० स्क्वे. फुटांच्या फ्लॅटमधील रंगावली चित्रांची ऊर्जा आणि त्या घराने साधलेली निसर्गजवळीक पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो.

दारापुढे काढलेली रेखीव स्वागतोत्सुक रांगोळी आणि डोअरबेलच्या बाजूच्या भिंतीवरील पसायदान-इथपासूनच घराच्या वेगळेपणाला सुरुवात होते. आत पाऊल टाकताच पॅसेजसमोरच्या भिंतीवरील ओरिसाची लोककला दर्शवणाऱ्या मोलेला टाइल्स नजर वेधून घेतात. चपलाबुटांचं कपाट ही खरं तर एक अडगळीची निर्जिव जागा. परंतु कुठून कुठून शोधून आणलेल्या नैसर्गिक दगडांची त्यावर आरास केल्याने हा कोपराही देखणा झालाय.

सुरुवातीच्या छोटय़ाशा पॅसेजमधून पुढे आलं की तीन आगळ्यावेगळ्या गोष्टी एकाच वेळी नजरेत भरतात – हॉल आणि किचन यांना विभागणारी गोलाकार दगडी भिंत, उर्वरित भिंती व्यापणारी रांगोळी चित्रं आणि खिडकीतून दिसणारा निसर्ग. परिणामी ‘आधी हे पाहू की ते’ या विचाराने मन क्षणबर भांबावून जातं. मी हॉलमधील भारतीय बैठकीवर स्थानापन्न होऊन सर्वप्रथम भिंतींवरील रांगोळी चित्रं समजून घेण्याचा पर्याय निवडला. दारापुढील रांगोळी कॅनव्हासवर आणण्याच्या संकल्पनेचं श्रेय भारतीताईंकडे जातं. ड्राय फेस्को रांगोळीतून (आर्ट ऑफ सरफेस मेकिंग) रेखाटलेल्या त्या पेंटिंग्जमुळे घरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. भारतीताई म्हणाल्या की, या ऊर्जेपाठचं रहस्य एका तज्ज्ञांच्या घरभेटीनंतर अधोरेखित झालं. त्या जाणकारांनी आणलेल्या ऑरा मशीनने स्कॅन केल्यावर या चित्रांमध्ये संरक्षक  आणि आश्वासक शक्ती दिसून आली..’ घरात येणाऱ्या प्रत्येकालाच या संवेदना जाणवतात.

सर्वप्रथम आपली दृष्टी खिळते ती स्वामी समर्थाच्या ४० बाय ५४ आकाराच्या भव्य पेंटिंगवर. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.. हे त्यांचे आधार देणारे वचन या चित्रातून पाहाणाऱ्याच्या मनात थेट पोहचते. स्वामींच्या लगत विजयलक्ष्मी, धनलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी आणि धान्यलक्ष्मी अशी अष्टलक्ष्मींची चित्रं आहेत. शंख, चक्र, गदा, कमळ, स्वस्तिक.. अशा शुभचिन्हांद्वारे भारतीताईंनी निर्मिलेली ही प्रतीकं त्यांच्याकडूनच समजून घेणं श्रेयस्कर.

याखेरीज हॉलच्या दुसऱ्या भिंतीवरली श्री यंत्राची रांगोळी, स्वयंपाकघरातील सूर्यमंडळ आणि बेडरूममधील रंगनाथ.. अशी सर्व रंगावली चित्रं बघताना या विषयातील त्यांच्या सखोल अभ्यासाचा प्रत्यय येतो. पुढे बोलता बोलता समजलं की त्यांच्या प्रबंधाचा विषयही याच संदर्भातील आहे. – ‘आर्ट हिस्ट्री ऑफ रंगावली अ‍ॅण्ड ड्राय फेस्कोज ऑफ रंगावली अ‍ॅज निओ अ‍ॅन्टिक्स.’

रांगोळीच्या पेन्टिंग्जशिवाय नजरबंदी करणाऱ्या अनेक चिजा या घरात दिसतात. स्वामींच्या चित्राखाली सागवानी लाकडाची दोनशे र्वष जुनी, कडीची, भक्कम पेटी आहे. त्यावर नीटसपणे मांडलेली तांब्या-पितळेची लखलखीत भांडी पाहात रहावी अशीच. फिरकीचा तांब्या, काजळाची डबी, शाईचा डबा.. अशा तीन पिढय़ांपासून जपलेल्या वस्तूंबरोबर भरतीताईंनी हौसेने जमवलेली तांब्याच्या ठोक्याच्या भांडय़ांची भातुकली बघताना मन हरखून जातं. स्वयंपाकघरातील निगुतीने राखलेलं आणि हारफुलांनी सजलेलं शिसवी लाकडाचं बैठं देवघर पाहाताना, तेही दोनशे र्वष जुनं आहे यावर विश्वास ठेवणं कठीण जातं.

या घरातील एक एक वस्तू बघताना, हे आपल्याला कसं नाही दिसलं किंवा सुचलं.. असं क्षणोक्षणी वाटत राहतं. उदा. वर्तुळाकार भिंतीच्या आयताकृती ओपन स्पेसमध्ये टांगलेलं तांब्याचं अभिषेकपात्र.. चिनीमातीच्या बरणीत उभा केलेला मोरपिसांचा गुच्छ.. बेडरूममधील कट्टय़ावरच्या खिडकीत झोके घेणारं सुगरणीचं घरटं.. खिडक्यांचे बांबूचे पडदे.. बाथरूममधील मांडी ठोकून आंघोळ करता येईल असा लांबरुंद चौकोनी काळा दगड.. या त्यातील काही सहज दिसलेल्या गोष्टी. भारतीताईंचं वर्कस्टेशन (कॉम्प्युटरवर काम करण्याची जागा) म्हणजे गॅलरीचा कायापालट करून आकाराला आलेला स्टुडिओ. या लहानशा जागेत एक उंच आणि खोल कपाट असं बसवलंय की ज्यात त्यांच्या एका प्रदर्शनाची चित्रं (२० ते २५) सहज मावतात.

६७० स्क्वे. फुटांची चौकोन, त्रिकोण आणि गोल या भूमितीय आकारात, चार खोल्यांत केलेली वैशिष्टय़पूर्ण मांडणी आणि कुठूनही डोकावलं तर दिसणारा निसर्ग हे या घराचं बलस्थान. तुम्ही ओटय़ापाशी पोळ्या लाटत असा किंवा हॉलमधील बैठकीवर विराजमान असा – बेडरूममधील पलंगावर पहुडलेले असा वा स्टुडिओत कार्यमग्न असा, मान वर केली की पुण्याची जीवनदायिनी मुळा नदी आणि तिच्याकाठची हिरवी सृष्टी डोळ्यांना सुखावणारच.

बेडरूमच्या प्रशस्त खिडकीलगतचा ऐसपैस दगडी ओटा ही या घरात येणाऱ्या प्रत्येकाला मोहात पाडणारी जागा. योगासनं करण्यापासून निवांत लोळण्यापर्यंत आणि पुस्तक वाचण्यापासून भजी खाण्यापर्यंत या कट्टय़ाचा करावा तसा उपयोग होतो. कोजागरीला चांदणं अनुभवण्यासाठी आणि पावसात दुथडी भरून वाहणारी मुळा आणि झिम्माड पाऊस नजरेत साठवण्यासाठी या कट्टय़ावर क्लेम लागलेले असतात. येत्या पावसासाठी माझाही नंबर लावून मी तिथून बाहेर पडले खरी पण त्या घरातील ऊर्जेने माझी पाठ आजगायत सोडलेली नाही.

waglesampada@gmail.com

First Published on May 12, 2018 12:08 am

Web Title: my dream house