खरे तर वडील म्हणून अण्णांविषयी काही लिहिणे वेगळे. तसे लिहिताना स्वत:च्या अनुभवांची आणि प्रतिक्रियांची आपल्याला मदत असते. संशोधक म्हणून वडिलांविषयी लिहिण्यासाठी नुसते नाते किंवा नुसता सहवास यांचा तसा उपयोग नाही. त्याचा मोठा उपयोग व्हायचा, तो त्यांच्या कामांविषयीचा आलोक देणारा माझा व्यासंग नाही. असे असूनही मी लिहिते आहे आणि स्वजनस्तुतीचा हेतू मनात नसतानाही तशी ती घडण्याचा वा वाटण्याचा धोका पत्करून लिहिते आहे.

१९३० साली अण्णांचा जन्म झाला आणि १९३५ च्या मध्यात त्यांचे आई-वडील दोघेही मृत्यू पावले. तेव्हापासून १९४३ सालापर्यंतचा आठ वर्षांचा काळ अण्णांनी त्यांच्या आजोळ घरी काढला. अंदर मावळात निगडे नावाच्या लहानशा गावी त्यांचे आजोळ होते. घरात हयात माणसे दोनच. अशक्त, आजारी, ब्रह्मचारी मामा आणि दु:ख-दारिद्रय़ाच्या तळीतून भरडून निघालेली नव्वदीच्या घरातली म्हातारी आजी.

one dead in lightning strikes
बुलढाण्यात पुन्हा अवकाळीचे थैमान; वीज पडून एकाचा मृत्यू, घरावर झाड कोसळले
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
caribbean writer maryse conde profile author maryse conde information zws
व्यक्तिवेध : मारिस कॉण्डे

पण या दोघांशिवाय घरात आणखीही पुष्कळ होते. आजोबांनी मागे ठेवलेले ग्रामजोसपण होते. कृष्णेकाठच्या वाईमधल्या कुठल्याशा पाठशाळेतून त्यांनी आणलेला ज्ञानसाधनेचा वसा होता, संस्कृत-प्राकृत हस्तलिखिते, पोथ्या-पुराणे आणि संस्कृतिदर्शन घडवणाऱ्या वस्तू यांचा मोठा संग्रह होता आणि आजीच्या स्मृतीत त्यांच्यामुळे उघडलेले, मौखिक परंपरागत ज्ञानाचे भांडार होते.

शिवाय त्या कर्मठ व्यवस्थेच्या पंजात सापडलेल्या निर्दय काळातही दलित कुटुंबासकट गावातल्या सगळ्यांशी सहृदय भलेपणाने जवळीक साधणारे घरातले वातावरण होते. प्रचंड पडीक शेती भाऊबंदांनी गिळून टाकल्यानंतर निमूट राहण्याची दुबळी सोशीकता होती आणि अगदी काठोकाठ दारिद्रय़ होते.

गावाकडचे ऋतुचक्राच्या लयीत फिरणारे लोकजीवन, तिथल्या श्रद्धा-समजुती, ग्रामदैवते, तिथे नाचणारी शिमग्याची सोंगे, उरसातले तमाशे, नवरात्रातले भराड, देवमंडपातली कीर्तने, घरोघरची व्रतवैकल्ये, दाराशी येणारे भुत्ये, वासुदेव, पोतराज- लोकसंस्कृती आणि संतसंस्कृतीने दिलेली ही ठेव उलगडणे हेच अण्णांनी आपल्या जगण्याचे साधन बनवले. अस्तित्वाला आधार आणि अर्थ देण्याचे प्रयोजन बनवले.

पुण्यात प्रतिष्ठेने जगण्यासाठी अण्णांनी केलेले कष्ट, सोसलेले कडूपण आणि धरलेले धीर यांचे तपशील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेताना आज महत्त्वाचे नाहीत असे मी म्हणणार नाही; पण वाईट परिस्थितीतून वर येऊन यशस्वी झालेल्या कोणाही माणसाची कहाणी बहुधा तशी असते. त्या कहाणीचा ढोबळपणा फोडून आत गेले, की मग अण्णांचे त्यांच्या गावाकडच्या जगण्याशी असलेले नाते लक्षात येते.

संशोधन ही एक सर्जक प्रक्रिया आहे, हे जर अण्णांना त्यांच्यामधल्या कवीने समजावले नसते, तर मग संस्कृतीची कोडी प्रगल्भ समजुतीने त्यांना जशी उलगडता आली तशी ती उलगडता आली नसती. महानग्नी लज्जागौरीच्या रूपात विश्वाचे आदिगर्भागार त्यांना दिसले नसते. त्यांच्यामधल्या कवीने संशोधनाच्या प्रज्ञेचा हात धरला आणि संशोधन हाच त्यांच्यासाठी प्रातिभ शक्तीचा विलास ठरला. ही गोष्ट मराठी संशोधनाच्या क्षेत्रात असाधारण म्हटली पाहिजे.

संशोधक कसा असतो, हे या माणसांमधून अण्णांनी समजून घेतले. त्यांच्या जोडीला आणखीही काही पूर्वसुरी आले. इतिहासाचार्य राजवाडे आले. सारस्वतकार भावे आले. वासुदेवशास्त्री खरे, ना. गो. चापेकर आणि रावबहादूर पारसनीस आले. अण्णांनी या माणसांच्या संशोधनाचे महत्त्व समजून घेतले. ते मराठी जगाला समजावून देण्यासाठी लेखन केले. त्यांच्या चुका, त्यांच्या भ्रांती यांचा दिव्यासारखा वापर करून चुकीच्या वाटा सावधपणे टाळल्या आणि त्यांनी अभिप्रेत वाटांवर मोठी मजल गाठली. त्यांचे काम नव्याने विस्तारताना त्यांच्या ऋणांची भरभरून आठवण केली.

या प्रकारे विचार केला, तर अण्णांच्या अनेक ग्रंथांमधले निष्कर्ष हे वेगवेगळ्या विद्याशाखांसाठी महत्त्वाचे आहेतच, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी संशोधन साधनांचा प्रचंड विस्तार केला आणि त्यातून निरनिराळ्या ज्ञानशाखांच्या विभाजनरेषा पुसून, ज्ञानाच्या अखंडपणाचा सातत्याने आणि भरीव प्रत्यय दिला. त्यांच्या कामामधून त्यांनी अभिजन-संस्कृती आणि बहुजन-संस्कृती यांच्यामधली दरी मिटवली आणि अभिजनांच्या सांस्कृतिक माहात्मेचे पोषण लोकसंस्कृतीने कसे केले आहे, याचा उलगडा केला. संशोधनाची सामाजिक अंगे त्यांनी निर्भयपणे तपासलीच, पण बहुजनांच्या उत्थानाच्या प्रक्रियेचे महत्त्वही सातत्याने अधोरेखित केले.

‘चक्रपाणि’, ‘लज्जागौरी’ आणि ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या पुस्तकांमधल्या अण्णांच्या प्रतिपाद्यांविरुद्ध मोठा गदारोळ उठला. ‘चक्रपाणि’च्या निमित्ताने सांप्रदायिक मठ-महंतांनी त्यांच्या आश्रित अभ्यासकांना वादाची प्रेरणा तर दिलीच, पण कोर्टात खटला दाखल करण्यापर्यंत अण्णांना अनेक प्रकारचे उपद्रव दिले. ‘लज्जागौरी’ला विरोध करण्यासाठी अंध देवीभक्त उठले. विठ्ठलमूर्तीचा वाद देवस्थानच्या हितसंबंधितांबरोबरच सांप्रदायिकांनीही संशोधन क्षेत्रातून बाहेर खेचला आणि काही अप्रबुद्धांनी भोळ्या भाविकांच्या श्रद्धांशी खेळण्याचा प्रयत्न करीत त्या वादाला वेगळा अशोभन रंग चढवला.

या वादासंबंधीची अण्णांची भूमिका स्वच्छ आणि अनाग्रही राहिली. ती त्यांनी प्रकटपणे मांडली. वादळे उठली आणि शमली. वादविषय झालेले ग्रंथ जाणकारांनी उचलून धरले. पुरस्कारांनी गौरवले गेले. संशोधनाचे पर्यावरण त्यामुळे स्वच्छ झाले असे नाही, पण सत्याच्या जातीला जगण्याचे आश्वासन तरी मिळत राहिले.

व्यक्तिगत आयुष्यात अण्णांसाठी सुखाची मूठ जेव्हा उघडली तेव्हा ती प्रतिकूलतेनेच उघडली. शारीर दुर्बलता जन्ममैत्रीण असल्यासारखी सोबतीला राहिली. त्यामुळे माणूस म्हणून अण्णा नेहमी व्यवहाराला धास्तावले आणि स्नेहाला आसुसले. त्यांच्याविषयी खरा लोभ असणाऱ्या माणसांची जवळीकही त्यांना फार काळ लाभली नाही. म्हणून कायम आतून ते एक दुखरेपण आणि एकटेपण अनुभवत राहिले. गृहस्थजीवन दिलासा देणारे नसते तर त्यांच्या दुर्दैवाला सीमा राहिली नसती, पण त्यांना जिथे आपल्या हळवेपणासकट, दुखरेपणासकट वावरता येईल असे घर त्यांना मिळाले.

मला तर वाटते, की ज्या वेळी घराने तो निर्णय स्वीकारला, त्याच वेळी त्यांच्या पायातली एक अदृश्य बेडी तुटली. एरवी घरात महिन्याच्या उपजीविकेचा प्रश्न असताना उधार-उसनवार करून पैसे घ्यायचे ते एखादे दुर्मीळ पुस्तक हातचे जाऊ नये म्हणून, असे प्रसंग वारंवार घडवून आणण्याचे धाडस अण्णांनी केले नसते, त्यांच्या चटकन भावविवश होण्याचा स्वभाव पाहता मुळीच केले नसते. घरातल्या मोठय़ा विवंचनांकडे त्यांनी पाठ फिरवली नाही, पण त्या विसरून संदर्भाचे भारे उलगडण्याची एकाग्रता त्यांना घराच्या पाठिंब्याशिवाय साधली नसती.

घराने अण्णांमधल्या संशोधकाला जगण्यासाठी, जवळ असलेला तुटपुंजा पैसा निरुपयोगी गोष्टीवर खर्च करण्याची मुभा दिली. गरजांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत न पोहोचवण्याची काळजी घेतली आणि त्यांच्या कामाचे व्यावहारिक भले-बुरे ओझे विनातक्रार आनंदाने वाहिले. त्यातली अनैसर्गिकता नैसर्गिक असल्यासारखी मिरवली.

या दुर्मीळ अनुभवाने अण्णांमधला एकाकी, हळवा माणूस संशोधक म्हणून ताठ, घट्ट उभा राहू शकला. संशोधन क्षेत्रातही सद्गृहस्थाची भूमिका निभावू शकला. अर्थात, परिस्थितीची योग्य साथ मिळती, तर अण्णांना करायच्या आणखी किती तरी गोष्टी होत्या.

(साभार- ‘लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेचा संपादित अंश)