दयानंद लिपारे

घरची शेती नाही. पशुधन नाही. पण नोकरीपेक्षा व्यवसाय करावा या हेतूने परिसरातील गोठे पाहत त्यांचा अभ्यास केला आणि त्याने दूध व्यवसायात उतरायचे ठरवले. एका गाईपासून सुरू केलेला पशुपालनाचा हा व्यवसाय आता १६ जनावरांपर्यंत गेला असून, वार्षिक १५ लाखांची उलाढाल होत आहे. शेती, शेती पूरक व्यवसायात परवडत नाही अशी ओरड असणाऱ्या वातावरणात आशावाद देणारी ही यशोगाथा आहे अमोल यादव या तरुणाची!

Successful experiment of pistachio farming in Solapur
सोलापुरात पिस्ता शेतीचा यशस्वी प्रयोग!
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
dairy industry in maharashtra
अग्रलेख: दूध गेले, दही चालले..

बारावी झाल्यावर सीएनजीचा छोटेखानी अभ्यासक्रम केलेला. त्याच जोरावर कोल्हापूरजवळील शिरोली औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत १९९६ दरम्यान सीएनजी ऑपरेटरची नोकरी मिळाली. पगार जेमतेम पाच हजार. इतक्या पगारावर चार जणांचे कुटुंब चालण्यासारखी परिस्थिती नव्हती. वेगळा काही मार्ग चोखळावा असा निर्धार करून कामाला सुरुवात केली. मित्रांच्या जनावरांच्या गोठय़ावर जाणे-येणे असायचे. त्यांचे गोठा व्यवस्थापन बारकाईने पाहिले होते. त्यापासूनच बोध घेऊन आपणही पशुपालन करावे असे ठरवले. आणि पाहता पाहता एकही गुंठा शेती नसणाऱ्या अमोल यशवंत यादव या तरुणाने अवघ्या आठ वर्षांत दुग्ध व्यवसायात चांगलेच बस्तान बसवले आहे. एका गाईपासून सुरू केलेला पशुपालनाचा व्यवसाय आता १६ जनावरांपर्यंत गेला असून, १५ लाखांची उलाढाल होत आहे. मासिक प्राप्ती ५० हजार रुपयांची झाली आहे. नोकरी सोडून देणाऱ्या एका ध्येयवादी तरुणांची दमदार धवलकथा बेरोजगारीशी झगडणाऱ्या आजच्या तरुणाईला प्रेरणादायी ठरावी अशीच आहे.

अमोल यादव यांचे आई-वडील, पत्नी असे कुटुंब. घरी दोन म्हशी होत्या. त्यांच्यापासून दूधही केवळ दोन-तीन लिटर मिळायचे. आई-वडील दुसऱ्याच्या शेतावर काम करून तेथील वैरण आणून म्हशींना घालत. घरातल्या म्हशीच्या धारा काढताना अमोलला कंटाळा यायचा. त्याच वेळी जातिवंत जनावरे घेऊन चांगला गोठा करावा, असे वाटत होते. घराची आर्थिक परिस्थिती बेताची. वारणा नदीच्या पलीकडे असलेले तांदुळवाडी हे त्यांचे गाव. जनावरं घेण्याची ऐतपत नव्हती. वडिलांशी चर्चा करून घरातील दोन्ही म्हशी विकून टाकल्या. त्याचे आलेले पैसे आणि हात-उसने पैसे घेऊन एक जर्सी गाय विकत घेतली आणि अमोलच्या गोठा व्यवस्थापनाचा श्री गणेशा सुरू झाला.

जनावरांसाठी सर्वदूर भ्रमंती

एमआयडीसीतील नोकरी सोडून दिली. एक गाय आणि तिचे व्यवस्थापन करण्यात सगळा वेळ जाऊ लागला. त्यानंतर थोडासा जम बसल्याने अजून दोन गाई आणण्याची गरज भासू लागली. प्रश्न पैशाचा आला. गरज तिथे मार्ग निघतो. तसेच झाले. वारणा सहकारी दूध संघाच्या गावातील विठ्ठल डेअरीने काही मदत केली. त्यातून बेंगलोरहून तीन गाई विकत आणल्या. आता गोठय़ात चार गाई झाल्या होत्या. बेंगलोरच्या गाई प्रति जनावर २५-३० लिटर दूध देत होत्या. गोठय़ाचे चक्र नीट फिरू लागले होते. घराच्या शेजारच्या जागेवर साधे पत्र्याचे शेड बांधून गोठा केला. बाजूला वीट बांधकाम केले. चोवीस तास गोठय़ावर काम सुरू झाले. एका धवल प्रवासाची ती नांदी ठरली. पुढे आर्थिक स्थिरता आल्यावर पंजाबहून चार गाई आणल्या. गेली सात वर्षे हा आठ गाईंचा गोठा व्यवस्थित सुरू आहे. सात गाई दुधावरच्या आहेत. एक व्यायला झालेली आहे. पाच कालवडी आहेत. त्यांपैकी दोन आता तयार झालेल्या आहेत. सध्या प्रतिदिनी १२०-१२५ लिटर सरासरी दूध उत्पादन आहे. त्यामुळे आठवडय़ाला सरासरी ४० ते ४२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.

आर्थिक नियोजनावर भर

सध्या गोठय़ावर एक गाय ३५ लिटर दूध देते, दोन गाई २८ ते ३० लिटर, बाकीच्या गाई २५ लिटरच्या आसपास दूध देतात. गोठय़ावर वासरू संगोपनातून तीन डेन्मार्कची व दोन एबीएस वासरे तयार झाली आहेत. सगळे दूध स्थानिक विठ्ठल डेअरीमार्फत वारणा दूध संघाला पाठविले जाते. वारणा दूध संघ महिन्यातून दहा दिवसांच्या फरकाने दुधाचे बिल शेतकऱ्यांना देत असतो. त्याचे नेटके आर्थिक नियोजन अमोल यांनी केले आहे. महिन्यातील एक बिल पशुखाद्याला जाते, दुसरे बिल ओल्या-वाळल्या चारा व्यवस्थापनाला जाते आणि तिसरे बिल मालकाला राहते. त्यामुळे मला सरासरी ५० हजार रुपये शिल्लक राहतात.

नसता जमीन गोठापालन

यादव कुटुंबीयांची स्वत:ची एक गुंठाही शेती नाही. गोठा थोडा मोठा करावा म्हटलं, तर गावात दुसरी जागा नाही. त्यामुळे आहे त्या जनावरांचं जास्तीत जास्त जादा दूध उत्पादन कसे होईल, याबाबत अधिक लक्ष दिले जाते. कमीत कमी खर्चात गोठा व्यवस्थापन व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातात. ओल्या वैरणीसाठी दुचाकीचा गाडा तयार केला आहे. त्यामुळे गडी-माणूस, वाहन, वाहतूक या सगळय़ामध्ये बचत होते आहे. चाऱ्यासाठी ऊस विकत घेतो. तो स्वत: तोडून स्वत:च्या गाडय़ातून गोठय़ावर आणतो. तसेच हरभरा, शाळूचा कडबा, सोयाबीन, गव्हाचे भुसकाट वाळला चारा म्हणून विकत आणतो. ते एकत्रित करून त्याचा मूरघास तयार करतो. दोन-तीन टन मूरघास केला जातो. जादा मूरघास ठेवायला जागा नाही. तसेच हंगाम भरात असताना मका विकत घेतला जातो. त्याची ओली वैरण होते.

साध्या पत्र्याच्या शेडमध्ये गोठा केला आहे. ते हवेशीर वातावरण जनावरांना मानवते. जनावरे बाहेर फिरायला सोडायला जागा नाही. स्वत:ची पाण्याची सोय नाही. ग्रामपंचायतीची चावी घेतली आहे. घरचे भरून झाले, की मग त्याचेच पाणी जनावरांना वापरले जाते. आई-वडील, पत्नी सगळे गोठा- व्यवस्थापनाला मदत करतात. तसेच डेअरीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांचे अमोल यांना मोठे सहकार्य राहिले आहे.

माझा गोठा माझी जनावरे

दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वत:चा गोठा विकसित केल्याचे अमोल यांना आत्मिक समाधान वाटते आहे. मात्र, यासाठी २४ तास राबावे लागते. ते अमोल आनंदाने करतात. गावातच भाडय़ाने किंवा विकत जागा मिळाल्यास गोठा मोठा करण्याचा मानस आहे. जनावरांची संख्याही वाढविता येईल. पंजाब, हरयाणा, बेंगलोरला न जाता स्वत:च्या गोठय़ावर खात्रीची जनावरे तयार करण्यावर भर असेल. गोठा व्यावसायिकांनी प्रति जनावराचे दूध वाढविणे आणि वासरू संगोपनावर विशेष भर दिल्यास गोठा यशस्वी व्हायला वेळ लागत नाही.

यशाचा कानमंत्र

गोठा व्यवस्थापन करताना जनावरांच्या आहाराकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. हे काम करताना जनावरांच्या पोषणाच्या गरजा, त्यांच्या सवयी, त्याचा दुधावर होणारा परिणाम या सगळय़ा गोष्टींकडे अधिक लक्ष दिल्यास आपल्याला चांगले दूध मिळण्यास काहीही हरकत येणार नाही. दुग्ध व्यवसायात उतरताना संयम महत्त्वाचा. एखादे जनावर पुरेसे दूध देत नसल्याचे दिसल्यावर ते विकण्याची घाई केली जाते. असे न करता त्याच्या आहार, पालन-पोषणाकडे योग्य लक्ष दिले, तर वर्षभरात तेच जनावर अपेक्षित दूध देते. त्यातून नक्कीच बरकत येते. वैरणाचा खर्च मोठा, महत्त्वाचा असतो. थोडे दूरचे अंतर कापले, की स्वस्त दरात वैरण मिळते. त्याचा शोध घेण्याचे कष्ट उपसले पाहिजे. मी जनावरांना वैरण काहीशी कमी देतो; पण पेंड – गोळी अधिक घालतो. त्यामुळे दूध अधिक मिळते. अशा काही बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत, असा कानमंत्र अमोल यादव देतात.

कार्याचा सन्मान

स्वत:ची एक गुंठाही जमीन नसताना अमोल यांनी गोठा व्यवस्थापन यशस्वी केले आहे. वैरण असो नाहीतर पशुखाद्य, प्रत्येक गोष्टीवर ते स्वत: आणि कुटुंबीय काम करीत असतात. वैरणीसाठी परिसरातून कडबा, उसाचे वाढे किंवा इतर वैरण मिळवण्यासाठी सतत भ्रमंती सुरू असते. यातून दुग्ध व्यवसायाच्या यशाचे गमक सापडले आहे. त्याचे हे कार्य बेरोजगारीबाबत तक्रार करणाऱ्यांना उत्तर आहे. अमोल यादव यांचे यश पाहून वारणा दूध संघाने सलग तीन वर्षे संघाच्या दूध उत्पादकांमध्ये मानाचे स्थान असलेल्या वारणा दिनदर्शिकेत आदर्श दूधउत्पादक म्हणून छायाचित्रासह प्रसिद्धी दिली आहे. मासिक शेतीप्रगतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

गोठय़ाची वैशिष्टय़े

गुंठाही शेतजमीन नसलेला गोठा व्यावसायिक. शंभर टक्के गोठय़ावर कुटुंबाचा उदरनिर्वाह. घरातील सगळय़ांचे गोठय़ामध्ये सहकार्य. गोठय़ावर जातिवंत वंशाच्या जनावरांवर भर. स्वानुभवामुळे स्वत: जनावरांचे औषधोपचार. जनावरांच्या आजाराचे प्रमाण शून्य टक्क्यावर. कमीत कमी खर्चामध्ये गोठा व्यवस्थापन. भविष्यात गावातच मोठा गोठा तयार करणार.