आशीष वेले जगावरचे परावलंबित्व संपवून भारताला अन्नधान्य उत्पादनात समृद्ध करण्यात आणि जगातील सर्वात मोठी कृषी अर्थव्यवस्था म्हणून भारताला नावारूपाला आणण्यात डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले. म्हणूनच त्यांना ‘भारतीय हरित क्रांतीचे जनक’ म्हटले जाते. स्वामिनाथन यांच्या निधनाने जागतिक कृषी क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. डॉ. स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून कृषी अनुवांशिकता आणि वनस्पती प्रजनन शास्त्रात पीएच. डी. संपादन केली. डॉ. स्वामिनाथन यांनी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करून समृद्धही केले. गहू आणि तांदळाच्या संकरीत, जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचा शोध लावला. परिणामी पीक उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. देशाच्या कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला. त्यांनी संशोधित केलेले वाण कीड, कीटक आणि रोगांनाही अधिक प्रतिरोध करणारे होते. परिणामी पिकांचे कीड, रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टळले आणि उत्पादनात मोठी वाढ झाली. अन्नधान्य उत्पादनामुळे देशाची अन्नसुरक्षा अधिक मजबूत झाली. डॉ. स्वामिनाथन यांच्या कार्याचा भारतातीलच नव्हे तर जगभरातील कृषी क्षेत्रावर दूरगामी सकारात्मक प्रभाव पडला. हरित क्रांतीचा संदेश इतर गरीब, विकसनशील देशांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. अनेक गरीब देशांचे अन्नधान्य उत्पादन वाढवून लाखो लोकांचा जीव वाचवून राहणीमान सुधारण्यास त्यांनी मदत केली. डॉ. स्वामिनाथन यांनी बदलत्या पर्यावरणाचा विचार करून कायम शाश्वत शेतीचेही जोरदार समर्थन केले. शेतकऱ्यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे, हानिकारक रसायनांचा वापर कमी करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यावर त्यांनी भर दिला आहे. हा दृष्टीकोन केवळ शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन सुधारण्यास मदत करत नाही तर भविष्यातील पिढय़ांना सुपीक जमीन आणि शुद्ध पाणी उपलब्ध करण्याची खात्री देतो. डॉ. स्वामिनाथन यांना पद्मविभूषण, जपान सरकारकडून जागतिक अन्न पुरस्कार आणि ऑर्डर ऑफ द सेक्रेड ट्रेझरसह अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळाले. संयुक्त राष्ट्रे (युनायटेड नेशन्स) आणि जागतिक आरोग्य संघटनेसह (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते अखेरच्या श्वासापर्यंत संशोधक म्हणून काम करत राहिले. शाश्वत शेतीचे समर्थन करत राहिले. अन्नसुरक्षा विधेयकात डॉ. स्वामिनाथन यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी ७ ऑगस्ट २०२३ रोजी ९९ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, स्वामिनाथन फाउंडेशनने (एमएसएसआरएफ) चेन्नई येथे पौष्टिक तृणधान्य बाजरीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. वयाच्या ९९ व्या वर्षीही स्वामिनाथन यांनी पौष्टिक तृणधान्याचा प्रचार प्रसिद्धीसाठी मोलाचा वाटा स्वीकारला. डॉ. स्वामिनाथन अहवाल स्वीकारण्यास देशातील कोणत्याही राजकीय पक्षांनी तयारी दाखवली नाही, ही या देशातील शेतकरी समुदायाबाबतची मोठी शोकांतिका आहे. शेतकरी उद्धारक २०व्या शतकातील जगातील सर्वात महत्त्वाच्या कृषी शास्त्रज्ञांपैकी एक अशी डॉ. स्वामिनाथन यांची ओळख आहे. त्यांचे संशोधन शेतकऱ्यांच्या नव्या पिढय़ांना प्रेरणा देत राहणार आहे. प्रत्येकाला पोषक आणि परवडणारे अन्नधान्य उपलब्ध करून देणारा खरा लोकनायक, शेती आणि शेतकऱ्यांचा उद्धार करणारा खरा भूमिपुत्र म्हणून डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांची आठवण कायम राहील.