हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

भारतीय मंडळींमध्ये साधारणपणे चहाचे चाहते आणि कॉफीचे भोक्ते असे दोन गट आढळतात. थंडीच्या दिवसांत काही जण आलटूनपालटून दोन्ही गटांत असतात. पण फक्त कॉफीपानाचा विषय येतो तेव्हा ब्रॅण्ड एकच.. नेसकॅफे. तिथे दुमत नाही. कॉफी आणि नेसकॅफे हे अद्वैत आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर फिल्टर कॉफी की इन्स्टंट कॉफी असं कधी विचारल्याचं ऐकिवात आहे? वेटर विचारणार, फिल्टर कॉफी की नेसकॅफे? इतका हा ब्रॅण्ड मिसळून गेलाय.

गरज ही शोधाची जननी असते या उक्तीप्रमाणे या ब्रॅण्डची निर्मिती झाली. १९३०च्या काळात ब्राझीलमध्ये घडलेल्या काही अर्थविषयक घडामोडींमुळे कॉफीची किंमत विलक्षण घसरली आणि कॉफीचा खूप सारा साठा पडून वाया जात होता. अशा वेळी ब्राझीलियन सरकारने नेस्टले (नेसले) या सुप्रसिद्ध कंपनीकडे यावर उपाय म्हणून अशी कॉफी निर्माण करण्याची विनंती केली, जी गरम पाण्यात पटकन मिसळली जाईल आणि इन्स्टंट कॉफी उपलब्ध होईल. नेस्टले कंपनीचे कॉफीगुरू मॅक्स मॉरगॅनथॅलर यांनी आणि त्यांच्या टीमने हे आव्हान स्वीकारले. विविध प्रयोगांमधून निव्वळ गरम पाणी ओतून कॉफी बनवण्याचा आणि हे करताना कॉफीचा मूळ स्वाद कायम टिकवण्याचा फॉम्र्युला मॅक्सनी शोधून काढला. त्याआधीदेखील असे प्रयत्न झाले होते, पण मॅक्स यांनी अधिक अचूक पद्धती विकसित केली. १ एप्रिल १९३८ रोजी स्वित्र्झलडमध्ये हा ब्रॅण्ड उपलब्ध करून देण्यात आला. नेस्टले आणि कॅफे यातून या उत्पादनाला ‘नेसकॅफे’ असे नाव दिले गेले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या कॉफीची सुरुवात थोडी धिम्या गतीने झाली, पण लवकरच या कॉफीचा आवाका मोठा होत गेला. फ्रान्स, ब्रिटन, अमेरिकेत कॉफी निर्यात होऊ  लागली. या नेसकॅफेचा सर्वात जास्त प्रचार कुणी केला असेल तर तो अमेरिकन सैन्याने! अमेरिकेन सैनिकांना दिल्या जाणाऱ्या रेशनिंग अन्नधान्यात नेसकॅफेचा समावेश होता. अमेरिकन सैन्यात नेसकॅफे इतकी लोकप्रिय झाली होती की, अमेरिकेतील नेसकॅफेचा पूर्ण प्लांट फक्त सैन्यदलासाठी राखीव होता. १९३८ मध्ये सुरू झालेला हा ब्रॅण्ड १९४० पर्यंत ३० देशांत पसरला.

सातत्याने नवनवे प्रयोग करीत नेसकॅफेने आपले अव्वल स्थान आज कायम टिकवले आहे. भारताच्या संदर्भात विचार करायचा झाला तर भारतातील सर्वाधिक विश्वासू ब्रॅण्डच्या यादीत नेसकॅफेचा समावेश आहे. या ब्रॅण्डच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार नेसकॅफेचे ५५०० कप दर सेकंदाला प्यायले जातात. १८० देशांत हा ब्रॅण्ड विस्तारलाय. नेसकॅफेच्या यशात त्यांच्या काचेच्या हवाबंद बरणीचाही तितकाच वाटा आहे. या ब्रॅण्डच्या लोगोचा विचार करता पूर्वी काळ्या-पांढऱ्या अक्षरांत दिसणारा लोगो आता लाल-पांढऱ्या अक्षरांत तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सिद्ध झाला आहे.

घरगुती वापराच्या कॉफी उत्पादनात नेसकॅफे अव्वल असलं तरी नवनव्या कॉफी ब्रॅण्ड्सची स्पर्धाही आहेच. आज अनेक घरांमध्ये कॉफी पिणारं कुणी नसलं तरी आलेल्या पाहुण्यांना लागलीच तर म्हणून कॉफी आणताना नेसकॅफेवर भरवसा ठेवला जातो. चहा असो वा कॉफी, प्रत्यक्ष ओठाला लागण्यापूर्वी त्या गंधाचा मनाला होणारा स्पर्श महत्त्वाचा. आळसावलेली सकाळ असो, थोडी सैल पसरलेली दुपार, काळोखात आलेली संध्याकाळ किंवा ‘जागते रहो’ म्हणणारी रात्र, या प्रत्येक प्रहरात नेसकॅफेने दिलेली साथ तरतरीत करणारी असते. म्हणूनच सुंदर सकाळ, महत्त्वपूर्ण चर्चा, गप्पांची मैफल.. इट ऑल स्टार्ट्स विथ नेसकॅफे.

viva@expressindia.com