Watch लेले काही : हरवलेले आणि सापडलेले!

चार्ली चॅप्लीन आणि टॉम अ‍ॅण्ड जेरी यांचेच गेल्या शतकातील व्हिडीओ याही शतकात सारखेच प्रसिद्ध आहेत

Must Watch video
‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.

‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.

प्रत्येक कलाकाराला कालबाह्य़तेच्या शापातून जावे लागतेच लागते. मासिके आणि इतर माध्यमांच्या बळावर एल्विस प्रिस्ले आणि बिटल्सनी जेव्हा जगभरावर राज्य केले त्याआधी ब्रिटन-अमेरिकेतील किती तरी संगीत कलाकारांच्या कारकिर्दीला पुसून टाकले. मायकेल जॅक्सन जेव्हा आला तेव्हा प्रिस्ले आणि बिटल्सच्या जादूने राजीनामा दिला होता. एमटीव्हीच्या दशकानंतर मायकेल जॅक्सनचीही सद्दी संपलेली होती. नव्या कलाकारांचा, नावांचा प्रसिद्धी, ऐशआरामी जगण्याचा इतका बोलबाला झाला की संगीत क्षेत्रातील सुपरस्टार्स, त्यांच्या भल्याऐवजी बुऱ्या बाजूंची चर्चा मोठय़ा प्रमाणावर रंगू लागल्या. आता  ग्लोकलीकरणाच्या फेऱ्यामध्ये आज काळाला पुरून उरणारी स्टारपदे मुळातच पुसली गेली आहेत. शंभर वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. तेव्हा बातम्यांचा म्हणजेच वृत्त माध्यमांचा जोर आजच्याइतका नव्हता आणि कलाकाराची लोकप्रियता ही प्रसिद्धी तंत्राऐवजी त्याच्या कामातून ठरत होती.

चार्ली चॅप्लीन आणि टॉम अ‍ॅण्ड जेरी यांचेच गेल्या शतकातील व्हिडीओ याही शतकात सारखेच प्रसिद्ध आहेत. पण त्यांच्याच तोडीस तोड असणारे कित्येक कलाकार आणि कित्येक चित्रपटांची आज दखलच घेतली जात नाही. गंमत म्हणजे यूटय़ूबवर हे सारे अभ्यासायला उपलब्ध असूनही त्यांच्याकडे फिरकणारा वर्ग आता थोडाच आहे. म्हणजे चार्ली चॅप्लीनला समांतर असणारा बस्टर केटन आणि हॅरॉल्ड लॉयड या अवलियांचे व्हिडीओ आज केवळ यू टय़ूबवर पाहायला मिळतात. चॅप्लीनइतकाच बाज असलेल्या या कलाकारांना विसरण्यासाठी मधल्या तीनेक पिढय़ांनी बरीच मेहनत घेतली. हॉलीवूडच्या काही चित्रपटांमध्ये चॅप्लीनहून अधिक केटन आणि लॉयडचे भक्त असल्याचे चित्रण आहे. पण ते तेवढय़ापुरतेच. हे कलाकार वाहियातपणासोबत अतिकठीण प्रसंग समोर आणून हास्य तयार करायचे. हॅरॉल्ड लॉयडच्या ‘सेफ्टी लॉस्ट’ चित्रपटातील क्लॉक टॉवरचे दृश्य पाहिले तर त्याने जिवावर बेतू शकणाऱ्या या सीनला निधडय़ा छातीने चित्रित करून वर प्रेक्षकांमध्ये हास्यफवारेही उत्पन्न केलेले दिसतील. बस्टर केटनचे स्टंट चार्ली चॅप्लीन किंवा लॉयडलाही जमणारे नाहीत इतके भीषण आहेत. प्रत्येक क्षणाला फटफजिती होणारी अशी कार्टूनीश शैली साधत त्याने प्रेक्षकांना हसविलेले दिसते. त्याचा १९२६ सालातील जनरल नावाचा मूकपट यूटय़ूबवर पूर्ण पाहायला मिळतो. संपूर्ण रेल्वे इंजिनावर असलेल्या या चित्रपटामध्ये मसाला चित्रपटातील सर्व गुणवैशिष्टय़े आहेत. शिवाय त्यातला निरागसपणाही भावणारा. १९३२ सालातील मूव्ही क्रेझी या हॅरॉल्ड लॉयडच्या बोलपटामधले सिनेमावेडही गमतीशीर. चित्रपट या कलेचा विकास होत असताना शंभर टक्के मनोरंजनासाठी झटणारे हे सिनेमे आज पूर्णपणे हरविलेले आहेत. पण त्याचा आस्वाद घ्यायला गेल्यास आजच्या सिनेमांमध्ये नसलेल्या किती तरी गोष्टी गवसतील. या हरविलेल्या कलाकारांप्रमाणे मायकेल जॅक्सनच्या सद्दीकाळातली एक संपूर्ण पिढी बाद झाली आहे. नव्वद ते दोन हजारोत्तर काळातील पिढीला ना त्याची गाणी आवडत, ना त्याचे नृत्य. त्यांच्या संगीत संग्रहात म्हणजे कॉम्प्युटर हार्ड डिस्क मायकेल जॅक्सनच्या गाण्यांनी कधीही भरल्या नव्हत्या. तरीही आत्ताच्या पिढीला अचानक मायकेल जॅक्सन गाण्यांसाठी नाही तर त्याच्या नृत्यासाठी आठवत आहे. जगभरामध्ये टॅलेण्ट शो होत आहेत आणि त्यात मायकेल जॅक्सन नव्या पिढीला बऱ्यापैकी सापडलेला दिसत आहे. अमेरिकेतील एका लोकप्रिय टीव्ही शोमध्ये चीनमधून दाखल झालेल्या चार वर्षीय मुलाचा मायकेल जॅक्सन अवतार पाहायलाच हवा असा आहे. त्याच्या तोडीस तोड अचंबित करणारा नृत्याविष्कार आणखी एका लहान मुलाने ‘इंडोनेशिया गॉट टॅलेंट’मध्ये सादर केला आहे. आणखी एका बारा वर्षीय मुलाने सादर केलेला शरीर लवचीकतेचा प्रकार प्रेक्षकांना वेडावून सोडणारा आहे. या सादरीकरणात परीक्षकांचीही बोबडी वळली आहे. भारतामध्येही मायकेल जॅक्सनच्या नवभक्तांची कमतरता नाही. एका व्हिडीओत टीव्हीवर नृत्यवेडय़ा बाप-बेटय़ांची टॅलेंट शोसाठीची ऑडिशन पाहायला मिळते. यात अर्थातच लहानग्या मुलाची निवड झाली असून पुढे त्याने आपल्या नृत्याने सगळ्यांची मने जिंकलेली आहेत. आताच्या पिढीवर गारूड पडण्यासाठी किती तरी नर्तक असताना मायकेल जॅक्सनचा नृत्यासाठी का होईना नव्याने लागलेला शोध गमतीशीर आहे. हे हरविणे-सापडणेही यूटय़ूबमुळे चांगल्या प्रकारे कळू शकते.

 

पंकज भोसले viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Must watch video on youtube

ताज्या बातम्या