एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

दिवसागणिक येणाऱ्या असंख्य मेसेजसमध्ये वाचलेला एक मेसेज अगदी खास आठवतोय. ‘बदाम खाऊन जितकी अक्कल येत नसेल तितकी धोका खाऊन येते.’ अकलेचा आणि बदामाचा अगदी घनिष्ट संबंध असला तरी ऊठसूट बदामाचा खुराक परवडणारा नाही. त्यामुळे महागडा आणि स्टेटस दाखवण्यासाठी तत्पर असा हा सुकामेवा हायक्लास ठरतो. तसाच या शब्दाच्या उच्चाराचा फंडाही हटके आहे.
Almond अशा स्पेलिंगचा हा शब्द ’ या अक्षराला गिळून टाकतो आणि होतो आमंड. हाच या शब्दाचा अचूक उच्चार आहे. यातल्या ’ च्या उपस्थितीमुळे गोंधळ होतो. आलमंड की आमंड की आणखी काही अशी शंका मनात येते. पण ‘आमंड’ हाच उच्चार योग्य ठरतो. जुन्या फ्रेंच भाषेतून हा शब्द आणि उच्चार इंग्रजीत दाखल झाले. मात्र जुन्या फ्रेंच किंवा लॅटिनमध्ये नाही. हा का व कसा आला असावा? याबद्दल असा अंदाज बांधला जातो की Spanish भाषेशी संपर्क आल्याने हा अधिकचा वाढला असावा. कारण अनेक Spanish शब्दांची सुरुवात ‘AL’ अशीच आढळते. त्यामुळे स्पेलिंगला ‘’’ तर जोडला गेला. पण मूळचा उच्चार ‘आमंड’च होता. नंतर स्पेलिंगनुसार उच्चार करणाऱ्या काही जणांनी आलमंड असा उच्चार सुरू केला. त्यामुळे आमंड की आलमंड असा घोळ झाला. पण यातला ‘l’ हा निर्विवादपणे सायलंट आहे. आपल्या वाचक सायली बेंद्रे केळकर यांनी या उच्चाराविषयी विचारणा केली होती तर दुसरे वाचक संजय कोल्हे यांना शाळेत शिकलेला ‘l’ सायलंट असणारा आमंड हा उच्चार शेअर करावासा वाटला.
मुळात सुक्यामेव्याच्या यादीत हा बदाम राजासारखा शोभतो. त्याच्या किमतीमुळे तो शेंगदाण्यासारखा घरात सर्रास वावरत नसला तरी एकूण उत्पादनात शेंगदाण्या इतकाच सरस आहे. मुळात हे बदाम झाडावरून घरातल्या बरणीत येण्याची प्रक्रियाच खूप किचकट, वेळखाऊ आहे. झाडावरून काढलेले बदाम सात दिवस तरी वाळवावे लागतात. मग त्यांच्यावर प्रक्रिया होते. या दीर्घ प्रक्रियेमुळे त्यांची किंमत अर्थातच वाढते. बदमाचा तो विशिष्ट आकार, रंग आपल्या नजरेत बसलेला आहे पण हिरवा रंगाचे बदामही काही ठिकाणी आढळतात. भारताप्रमाणेच जपान,चीन व अन्य काही देशात या बदामांना सांस्कृतिक महत्त्व आहे.
आपण भारतीय संकल्पनेत बदामी डोळे ही सौंदर्याची संकल्पना मांडतो तशीच पाश्चत्य देशांतही ‘आमंड आइज’ अशी संकल्पना आहे. जाता जाता मनातली एक शंका आपल्याकडे व्यक्त करावीशी वाटतेय. नारळाच्या तेलाने तल्लख बुद्धी प्राप्त होते वगैरे आपण ऐकतो. तैलबुद्धी असा शब्दप्रयोगही ऐकतो. मात्र बदामाचा व अकलेचा संबंध असूनही कोणत्याही आमंड ऑइल जाहिरातीत केवळ घनदाट केसांचाच उल्लेख होतो. बुद्धी वाढते असा नाही. हे काय गौडबंगाल असावे? जोक अपार्ट, विषयांतर सोडून देऊया आणि बदाम न खाताच मेंदूला पुन्हा एकदा स्मरण करून देऊया its आमंड and not आलमंड.
रश्मी वारंग – viva.loksatta@gmail.com