पँटॉन कलर इन्स्टिटय़ूटने यंदा दोन रंग कलर्स ऑफ द इअर म्हणून जाहीर केलेत. रंग या विषयावर काम करणारी पँटॉन ही जगातली एक मातबर संस्था. ही संस्था रंगांचा अभ्यास करते. दरवर्षी फॅशन जगत ही इन्स्टिटय़ूट यंदा कोणता रंग जाहीर करते याकडे लक्ष ठेवून असते. दरवर्षीप्रमाणे एकच रंग कलर ऑफ इअर म्हणून जाहीर न करता या संस्थेने दोन रंग २०१६ साल गाजवणार असं भाकीत केलंय. हे दोन रंग आहेत – रोज क्वार्ट्झ् आणि सेरेनिटी. हे दोन रंग आणि या दोन रंगाचं ब्लेंडिंग यंदाच्या वर्षी उठून दिसणार.
ही संस्था नुसता रंग जाहीर करून थांबत नाही, तर त्या रंगाचं व्यक्तिमत्त्व काय, हेदेखील जाहीर करते. यंदाचे दोन्ही रंग थोडे फिकट आणि म्हणूनच शांत व्यक्तिमत्त्वाचे आहेत. गेली काही र्वष व्हायब्रंट रंग चलतीत होते. यंदा मात्र अगदी वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे रंग जाहीर झाले आहेत.
रोज क्वार्ट्झ् ही एक फिकट गुलाबी रंगातील छटा आहे आणि त्याला प्रेमाचं प्रतीक समजलं जातं. मग ते प्रेम कोणाही मधील असो. आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम, आई-मुलाचं प्रेम, मित्र-मैत्रिणींमधील प्रेम असो किंवा आपला प्रियकर-प्रेयसी यांमधील प्रेम असो. सटल, शांत, लोभस अशी ही शेड आहे आणि या रंगाचं व्यक्तिमत्त्वच असं प्रेमळ आहे. सेरेनिटी म्हणजे आत्मिक शांतता आणि हा फिकट निळा रंग त्याचंच प्रतीक. नितळ, निवांत हे याचं व्यक्तिमत्त्व. या वर्षी हे दोन्ही रंग फॅशन जगतात अधिराज्य करतील. लाल आणि निळा – वॉर्म कलर आणि कूल कलर अशा कॉम्बिनेशनचं हे वर्ष असेल. या दोन्हींचा बॅलन्स या दोन्ही रंगांमुळे साधला जाणार आहे.
दरवर्षी डिसेंबरमध्येच नवीन वर्षांचा रंग पँटॉनतर्फे जाहीर करण्यात येतो. यंदा जाहीर झालेल्या गुलाबी आणि निळ्या छटांमधील रंग आणि त्यांची कॉम्बिनेशन्स यंदा फॅशन शोजमध्ये बघायला मिळतील. दोन्हीही रंग एक प्रकारचा सटलनेस आणि क्लासिनेस आपल्याला मिळवून देतील. स्त्री-पुरुष दोघांसाठीही हे रंग साजेसे आहेत. साधारणत: हे दोन्ही कलर्स पेस्टल पॅलेटमध्ये मोडणारे आहेत. त्यामुळे येणारं वर्ष हे असंच सटल आणि पीसफुल रंगांचं असेल. या वर्षांचा ट्रेण्ड निळा- गुलाबी रंग साजिरा असेल हे नक्की. असेच आणखी काही नवे ट्रेण्ड्स जाणून घ्यायला भेटू या पुढच्या आठवडय़ात ‘व्हिवा’मध्ये.

20
भारतासाठी ‘मोनार्क गोल्ड’
पँटॉन ही अमेरिकन संस्था. ती ज्या धर्तीवर रंग जाहीर करते, त्याचप्रमाणे यंदा आणखी एका कंपनीनेदेखील कलर ऑफ द इअर जाहीर केलाय. तो भारतीयांसाठी जाहीर केलाय हे विशेष. डीलक्स इंडिया यांनी ‘मोनार्क गोल्ड’ हा कलर ऑफ २०१६ म्हणून जाहीर केला आहे. पिवळ्या रंगाची ही छटा आहे. वॉर्म ऑकर यलो या रंगाला डोळ्यासमोर ठेवून मोनार्क गोल्ड ही छटा तयार करण्यात आली आहे. डीलक्स इंडियाच्या मते, ऑकर येलो हा रंग आपल्या बरोबर सोनेरी रंगाची झाक घेऊन येतो. येणाऱ्या वर्षांत भारतातील ट्रेंड्समध्ये काहीसा गोल्ड एलिमेंट असेल त्यामुळे मोनार्क गोल्ड आम्ही हा कलर ऑफ द इयर म्हणून जाहीर करतो.’ फॅशनबरोबरच वॉल पेंट्स, फर्निचर यामध्येदेखील मोनार्क गोल्ड भाव खाणार असं दिसतं.