सध्या अनेक घरांमधून पाळीव प्राणी हे एखाद्या फॅमिली मेंबरप्रमाणे वावरताना दिसतात. फास्ट जमान्यातील सुपरफास्ट तरुण पिढी इतर कशाला नाही, इतका वेळ आणि लक्ष त्यांच्या पेट्सकडे देते. छंदापासून व्यवसायापर्यंत, सोशल मीडियावरच्या फोटोंपासून, पेट वेबसिरीजपर्यंत सगळ्यावर या पेट्सचं राज्य दिसतंय. प्राणीप्रेमातून तरुणाईला व्यवसायाच्या नव्या वाटादेखील सापडल्या आहेत. या सगळ्यावर एक नजर..

पाळीव प्राण्यांविषयीचं प्रेम हा काही नवा विषय नाही. ते आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं आहे. पण हल्लीच्या फास्ट जमान्यातील सुपरफास्ट तरुण पिढी इतर कशाला नाही इतका वेळ आणि लक्ष त्यांच्या पेट्सकडे देते. स्वतच्या बरोबरीने ते पेट्सच्या फॅशनबाबत काटेकोर असतात. पेट्सबाबतचे अपडेट्स मिनिटामिनिटाला अपटेड करणारे पेटप्रेमीदेखील आहेत. त्यांची सोशल मीडियावरची अकाउंट्स त्यांच्या लाडक्या प्राणीमित्राबरोबरच्या फोटोंनी ओसंडून वाहत असतात. नेहमीच्या साचेबद्ध जगण्यातून अभ्यास आणि व्यवसायाच्या वेगळ्या वाटा शोधत काही तरुण पाळीव प्राण्यांशी संबधित गोष्टींतच रमतात. म्हणूनच पेटप्रेमी मंडळींची वाढती संख्या लक्षात घेत अनेकांनी या क्षेत्रातच व्यवसायाच्या संधी शोधल्या आहेत. पाळीव प्राण्यांसंबंधी व्यवसायात रमणारे बहुतांश तरुणच आहेत. श्वान पालनासोबतच या श्वानांचे आरोग्य, श्वानांच्या देखभालीसाठी लागणाऱ्या वस्तू, श्वान प्रशिक्षण, ब्रीडिंग असे व्यवसाय बाजारात रुळत असताना त्यामध्ये तरुणाईचा सहभाग प्रकर्षांने जाणवू लागला आहे. प्राण्यांविषयीची आपली आवड व्यवसायात रूपांतरित करण्याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

तरुण व्यवसाय

पेट्सच्या प्रेमातून अनेक नवीन व्यवसायांचा जन्म झालेला आहे, असं दिसतं. पेट्स हॉस्टेल, पेट्स पार्लर, ब्रीडिंग सेंटर, पेट ग्रूमिंग सेंटर, श्वान प्रशिक्षण केंद्र, पेट कॅफे, पेट्स शॉप्स, कन्सल्टन्सी या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण अभ्यास सांभाळून काम करताना दिसतात. श्वानांना प्रशिक्षण देण्यामध्ये पूर्वी केवळ पोलीस दलाची मक्तेदारी होती. अलीकडे हे चित्र बदललं आहे. श्वानांना प्रशिक्षण देणारे उत्कृष्ट तरुण डॉग ट्रेनर घडत आहेत.

फिश ब्रीडिंगचा व्यवसाय ट्रेण्डिंग आहे हे खरं. पण या व्यवसायात यायचं, तर मुळात आवड हवी आणि अनुभवदेखील हवा. उत्कृष्ट डिस्कस फिश ब्रीडर म्हणून मला आज ओळख मिळालेली असली तरी सुरुवातीला हे फिशब्रीड लोकप्रिय नव्हतं. आता मात्र याचा ट्रेण्ड आला आहे. आवडीचं बिझनेसमध्ये रुपांतर करण्यासाठी थोडा मार्केटचा अंदाज आणि ट्रेण्ड्सदेखील माहिती हवेत.

परेश पाटील, फिश ब्रीडर

परदेशातून या विषयी प्रशिक्षण घेतलेलेही अनेक आहेत. इंटरनेटमुळे श्वानाची एखादी नवी जात (ब्रीड) लोकप्रिय होते. मग त्या ब्रीडची मागणी वाढते. परदेशातून हे श्वान आयात करून विकण्याचा व्यवसाय काही तरुणांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे काही तरुण परदेशात खास ब्रीडिंग आणि ग्रूमिंग शिकण्यासाठी जातात. भारतात येऊन आपला पेट ग्रूमिंगचा व्यवसाय सुरू करतात. मुंबईत राहणाऱ्या ज्युनेट र्मचट या तरुणाने परदेशात ग्रूमिंगचं प्रशिक्षण पूर्ण करून आपला व्यवसाय सुरू केलाय. डोंबिवलीत राहणाऱ्या पराग पाटीलने फिश ब्रीडिंगचं प्रशिक्षण घेतलंय आणि व्यवसाय सुरू केला आहे. परागकडे ब्रीड झालेले मासे महाराष्ट्राबाहेरही विकले जातात. यातदेखील आता ब्रीडनुसार स्पेशलायझेशन करणारे आलेत. तुषार पाटील यांनी दिनेश वैद्य यांच्या सहकार्याने उत्कृष्ट डिस्कस फिश ब्रीडर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. पाळीव प्राण्यांविषयी आवड असलेला रूपेश नायर हा तरुण आपला व्यक्तिगत व्यवसाय सांभाळून जर्मन शेफर्ड या श्वान जातीचा अभ्यास करतो. या श्वानांच्या ब्लड लाइन्स, जगात सध्या कोणते ब्रीड जास्त लोकप्रिय आहेत, त्याची कारणं काय, उत्कृष्ट डॉग शोज कोणते याबाबत रूपेश माहिती देतो. वेगवेगळ्या ब्रीडर्स आणि श्वान पालकांसाठी रूपेशने आपला ‘पेट कन्सल्टन्सी’चा व्यवसाय सुरू केला आहे. पेट हॉस्टेल हादेखील तरुणांसाठी नफा कमावण्याचे उत्तम माध्यम तयार झाले आहे. बाहेरगावी जाणारे श्वान पालक आपल्या श्वानांना या पेट्स हॉस्टेलमध्ये ठेवतात. डोंबिवलीतील राहुल सारंगधर या तरुणाने आपल्या राहत्या घरी पेट्स हॉस्टेल सुरू केलं आहे. दर दिवसाचे चारशे रुपये आकारून राहुल या श्वानांचे पालक नसताना उत्तम काळजी घेतो. सागर हर्षे यांनी श्वानांना सांभाळताना उपयोगी असणाऱ्या वस्तू श्वान पालकांच्या घरपोच पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. कंपन्यांमध्ये असणाऱ्या श्वानांना प्रशिक्षण देण्याचे कामही सागर करतो. पाळीव प्राण्यांची औषधं, साबण, श्ॉम्पू एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी काही तरुण उत्तम दर्जाच्या वस्तू परदेशातून आयात करून विकतात. विविध डॉग शोजसाठी आपल्या श्वानांचे केशभूषा, राहणीमान उत्तम ठेवावं लागतं. यासाठी ग्रूमिंग व्यवसाय उपयोगी पडतो. ग्रूमिंग व्यवसायातदेखील तरुणांचा सहभाग वाढत आहे.

सध्या अनेक तरुण लाइव्ह स्टॉक सुपरवायजर अभ्यासक्रम शिकतात. महाराष्ट्रात या अभ्यासक्रमासाठी बंदी असली तरी इतर राज्यांत हा अभ्यासक्रम शिकून येऊन आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर लाइव्ह स्टॉक सुपरवायजर हा आपला व्यवसाय काही तरुण सुरू करत आहेत. डेअरी, पोल्ट्री फार्मिग, लसीकरण याविषयी अभ्यासक्रमात माहिती मिळते.\

यूटय़ूबवर  वेबसिरीज

सध्या यूटय़ूबवर ‘मी आणि पॉ’ या वेबसिरीजच्या माध्यमातून सेलेब्रिटींच्या पेट्सची माहिती देणारे व्हिडीओ प्रसिद्ध होणार आहेत. ठाण्यातील मधुरा जोशी आणि ओंकार जोशी यांच्या मनात आलेली ही संकल्पना तेजस पेडणेकर, सागर दवणे आणि राज नाईक यांच्या सहाकार्याने वेबसिरीजच्या माध्यमातून साकारली जात आहे. अमेय खोपकर, रवी जाधव, फुलवा खामकर आणि आदिती सारंगधर या सेलेब्रिटींचं त्यांच्या पेट्सबरोबर असणारं प्रेमळ नातं ही तरुण मंडळी ‘मी आणि पॉ’च्या माध्यमातून पहिल्या काही भागांत उलगडणार आहेत. याशिवाय इतर अनेक सेलेब्रिटींचं पेटप्रेम यातून दाखवण्याचा मधुरा, ओंकार आणि मंडळींचा मानस आहे. वेगवेगळ्या श्वान ब्रीड आणि प्राण्यांविषयी काम करणाऱ्या संस्थांविषयी माहिती या वेबसिरीजमध्ये दिली जाणार आहे. सध्या या तरुणांचं या वेबसिरीजसाठी शूटिंग सुरू असून लवकरच यूटय़ूबवर ही नवी वेबसिरीज दिसेल.

जीव लावणारे दोस्त

आमच्या घरात सध्या दोघे नवे मेंबर आहेत. मोठा अल्फा आणि धाकटा स्कूबी. दोन्ही स्ट्रे डॉग्ज आहेत. ते रस्त्यावरून आणून आम्ही पाळले. अल्फा अडीच महिन्यांचा आहे आणि स्कूबी फक्त महिन्याचा. अल्फा अगदी छोटं पिल्लू होतं भावानं त्याला घरी आणलं तेव्हा. तो नाल्यात पडला होता आणि त्याला बाहेर पडता येत नव्हतं. अनेक लोक जमली होती, पण कुणीच काही केलं नाही. माझ्या भावानं ते पाहून तो नाल्यात उतरला आणि त्यानं अल्फाला बाहेर काढलं. त्याची काळजी घेणारं कुणीच नव्हतं, म्हणून त्याला आम्ही घरी आणलं आणि आता तो घरचा मेंबर झालायं. स्कूबीसुद्धा रस्त्यात सापडला आणि त्याला घरी आणलंय. एका फ्रेण्डची फॅमिली स्कूबीला दत्तक घेणार आहे.

पूजा सावंत

कुत्र्याचं एक पिल्लू पाळणं म्हणजे घरातलं लहान मूल वाढवण्यासारखंच आहे. माणसापेक्षा जास्त भावना त्या प्राण्याला असतात. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमधून प्रसिद्ध व्हायच्या आधी पुण्याच्या धायरी परिसरामध्ये माझ्या घराच्या आसपास सगळे मला ‘मॅगीचा दादा’ म्हणूनच ओळखायचे. आम्ही मोठं घर घेतल्यानंतर गेली नऊ र्वष ‘मॅगी’ ही जर्मन शेफर्ड आमच्यासोबत आहे. माझ्या प्रत्येक भावनेशी एकरूप झालेली माझी मैत्रीण आहे ती! माझ्या प्राणीप्रेमातूनच मी ‘अ‍ॅनिमल्स मॅटर टू मी’ या संस्थेशी जोडला गेलो. केवळ फॅशन म्हणून प्राण्यांसोबत फोटो आणि सेल्फी काढून पोस्ट करण्यापेक्षा खरोखर त्या प्राण्यांबद्दलच्या प्रेमातून त्यांच्यासाठी काही करावं, त्यांच्यासोबत वेळ घालवावा हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. माझ्या वाढदिवसाला मी मित्रांना पार्टी देण्यापेक्षा या संस्थेत प्राण्यांसोबत वेळ घालवणं पसंत करतो. माणसांपेक्षा प्राणी आपल्याला जास्त जीव लावतात आणि जास्त समजून घेतात. मी उदास असेन तर ते माझ्या मॅगीला लगेच कळतं आणि ती शांतपणे माझ्या बाजूला येऊन बसते. सध्या मात्र शूटिंग, नाटक, दौरे या सगळ्यामुळे आम्हांला फार वेळ एकत्र मिळत नाही. त्यामुळे मला नेहमी चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं.

शशांक केतकर

(शब्दांकन : वेदवती चिपळूणकर)