मृण्मयी पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरात अगदी लाडाकोडात वाढलेला कबीर काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेला. त्याच्या घरातून परदेशी जाणारा तो पहिलाच होता. त्यामुळे तिथे जाण्याआधी आणि गेल्यानंतरच्या सगळय़ा औपचारिकता त्याला एकटय़ालाच समजून घेऊन पूर्ण कराव्या लागल्या. अमेरिकेत पाऊल ठेवल्या- ठेवल्या त्याला नव्या संधी आणि वाटा खुणावत होत्या. आपल्या जिवाभावाच्या माणसांपासून दूर राहून स्वत:चं एक वेगळं जग निर्माण करणं त्याला उत्साहित करत होतं, पण तितकंच आव्हानात्मकही वाटत होतं. तिथल्या समवयस्क मंडळींशी जुळवून घ्यायला कबीरला साहजिकच काही महिने लागले. भारतातील घर गहाण ठेवून काढलेलं चाळीस-पंचेचाळीस लाखांचं लोन फेडण्यासाठी त्याला भविष्यात चांगली नोकरी मिळेल का, या चिंतेने ग्रासलं होतं. भारतात असताना आपण आपल्या तळय़ातील मोठा मासा होतो, पण आता मोठय़ा तळय़ात वेगवेगळय़ा तळय़ांतून अनेक मासे आल्याने आपल्याला आपला स्वतंत्र ठसा उमटवता येईल का, याची धाकधूकही मनात होती. त्यात घर, इंटर्नशिप सांभाळून अभ्यास करणं आणि एक्स्ट्राकरिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेणं त्याला थोडंसं जड वाटू लागलं. सभोवताली इतर माणसं असली तरीही त्याला एकाकीपणा जाणवत होता. पण घरच्या मंडळींना टेन्शन नको म्हणून त्याने या साऱ्याचा थांगपत्ताही लागू दिला नाही. 

कनिका गेल्या दोन वर्षांपासून कॅनडाला शिक्षणासाठी राहत होती; पण तिचा जोडीदार – आरुष मात्र भारतात स्वत:चं करिअर घडवत होता. या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये भारत आणि कॅनडातील वेगवेगळय़ा टाइम झोनमुळे त्यांचं वरचेवर बोलणं होत होतं. घरातील मंडळींना त्यांच्या नात्याबद्दल पुसटशी कल्पना असल्याने आरुष कधी कॅनडाला जातो आहे, याकडे सगळय़ांचं लक्ष लागून राहिलं होतं. भारतात उभारत असलेल्या करिअरला अचानक कलाटणी देऊन परदेशी जाणं आरुषला थोडं अवघड वाटत होतं; पण इतरांनी त्याला अनेक गोष्टी ऐकवल्या – ‘इथे राहून तू कितीसं कमावणार? तू इथेच राहिलास तर ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आणखी किती काळ टिकेल? शेवटी तुम्हा दोघांपैकी एकाला या नात्याला रामराम करावा लागेल. त्यापेक्षा कॅनडाला जाऊन नोकरी शोध. नाही तर तुला स्पाउजल (spousal) व्हिसा काढून जावं लागेल.’ इतरांचं हे खोचकपणे जेंडर रोल रिव्हर्सल (gender role reversal) बद्दल टोमणे मारणं आरुषच्या मनाला फार लागलं. भारतात त्याने त्याच्या करिअरमध्ये उत्तम प्रगती करूनसुद्धा त्याच्या यशाचा आनंद त्याला जाणवत नव्हता किंवा इतरांसोबत साजराही करता येत नव्हता. 

आपल्याकडे कोणीही परदेशी गेलं, की आपण खूप गोष्टी गृहीत धरतो – परदेशात जाणारी सगळीच मंडळी स्वेच्छेने किंवा स्वखुशीने आपला देश सोडून जातात, शिक्षणासाठी गेलेली मंडळी तिथल्या संस्कृतीशी कालांतराने का होईना जुळवून घेतात, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सगळय़ांनाच तिथे पुष्कळ पगार असलेली नोकरी मिळते, त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये झालेले बदल हे कायम स्वागतार्हच असतात.. पण खरंच या गोष्टी किती जणांना लागू पडतात? ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीप्रमाणे भारतात बसून आपण कित्येकदा परदेशातील राहणीमान किती मोहक असेल याचं दिवास्वप्न रंगवत बसतो.

या दिवास्वप्नामागे कित्येक लाखांचं लोन, विद्यार्थिदशेत असताना अनोळख्या देशात डॉक्युमेंटेशन, घरकाम, इंटर्नशिप करण्यापासून अभ्यास करून चांगली नोकरी मिळवण्यापर्यंतची मेहनत, भरघोस टॅक्स भरून आणि महिन्याभरात आवश्यक खर्च सांभाळून हाती आलेली तुटपुंजी कमाई, आपल्या जवळच्या व्यक्तींपासून कित्येक महिने किंवा वर्ष लांब राहण्याचा विरह, इतर माणसं आजूबाजूला असली तरीही जाणवणारा एकाकीपणा, कुटुंबाच्या किंवा मित्रमंडळींच्या आयुष्यात आलेल्या सुख-दु:खाच्या क्षणांना वेळीच प्रत्यक्ष हजर न राहता येणं, अभ्यासातून आणि करिअरमधून स्वत:ला ‘सिद्ध’ करण्याची धडपड, घरच्यांना ताण येऊ नये म्हणून आपण भावनिकदृष्टय़ा भक्कम आहोत हे दाखवण्यासाठी मनात कल्लोळ निर्माण करणाऱ्या समस्या शेअर न करणं अशा कित्येक गोष्टी आपल्या नजरेतून सुटून जातात.

हे स्ट्रगल्स वरवर सगळय़ांना माहीत असले तरी काही समस्यांबद्दल आपल्याला पुसटशी कल्पनाही नसते. काही जण कुटुंबीयांना घरातील एखादी व्यक्ती तरी परदेशी शिकलेली हवी म्हणून तिथे जाण्याचा निर्णय घेतात, तर काही जण भारतात राहून जे स्वातंत्र्य उपभोगता येत नाही, अशा स्वातंत्र्याच्या शोधात इतर देशांत जातात. याचंच आतापर्यंत लाइमलाइटपासून दूर राहिलेलं उदाहरण म्हणजे क्वीअर (queer) व्यक्तींनी भारतात राहण्यापेक्षा इतर सर्वसमावेशक (inclusive) देशांत केलेलं स्थलांतर. आपल्या देशात एलजीबीटीक्यूआयए+ व्यक्तींचे काही मोजकेच हक्क कागदोपत्री जरी नमूद केलेले असले (आणि याव्यतिरिक्त अनेक हक्क कोर्टकचेरीच्या हेलपाटय़ांमध्ये अडकले गेलेले असले) तरी प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी करण्यात वर्षांनुवर्ष अनेक तफावती आढळून येत आहेत. पैशाचं पुरेसं पाठबळ असेल आणि कुटुंबातील मंडळी आयडेंटिटी स्वीकारत नसतील, तर काही क्वीअर व्यक्ती कुटुंबाला निर्णयात सामावून न घेता स्थलांतर करण्याचा निर्णय घेत आहेत. हा निर्णय कित्येकदा केवळ त्यांच्या करिअरलाच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्याला डोळय़ासमोर ठेवून घेतला जातो.

आपला देश सोडून जाण्याच्या कारणांमध्ये कितीही वैविध्य असलं, तरीही कित्येक जण आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या बदलाला सामोरं जाताना नैराश्य, एन्गझायटी, ताणतणाव, शारीरिक आणि मानसिक थकवा अनुभवतात. कधीकधी हा ताण असह्य झाल्याने काही जण स्वत:ला इजा पोहोचवण्याचा प्रयत्नही करू शकतात. त्यात या समस्या समजून घेण्यासाठी नेहमीच आपल्या संस्कृतीचे अनोखे पैलू लक्षात घेऊन आधार देणारे (culturally competent) मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञ इतर देशांत जवळपास असतीलच असं नाही. त्यामुळे हे सगळं सांगावं तर कोणाला सांगावं, हा प्रश्नही काही जणांसमोर उभा ठाकतो. आता ऑनलाइन थेरपीमुळे हा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला असला, तरी जेव्हा ऑफलाइन मदतीची गरज भासते, तेव्हा कोणी तरी प्रत्यक्षात आपल्यासोबत आहे ही भावना सुखावणारी असते. अशा वेळेस आजूबाजूला असलेले स्थलांतरित विद्यार्थी आणि व्यावसायिक यांची कम्युनिटी कामी येते. कदाचित तेही या आव्हानांना इतरांच्या नकळत सामोरं जात असतील आणि त्यांनाही कोणाचा तरी आधार हवा असेल. त्यामुळे एका आफ्रिकन म्हणीनुसार – ‘तुम्हाला त्वरित तुमचा पल्ला गाठायचा असेल, तर एकटे जा. मात्र, तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचा असेल, तर एकत्र जा.’ आफ्टरऑल, वुई आर ऑल इन धिस टुगेदर!

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manspandane mrunmayi pathare students for higher education go to abroad ysh
Show comments