ट्रकला ओव्हरटेक करीत असताना दोन दुचाकींची धडक होऊन एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी येथील तोरस्कर चौकात घडला. विनायक आनंदराव चौगुले (वय २१ रा.रजपुतवाडी, ता.करवीर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सचिन आनंदा चौगुले (वय २२ रा.भाटवाडी, ता.पन्हाळा) असे जखमीचे नाव आहे.     
विनायक हा दुचाकीवरून रजपुतवाडी येथील घरी निघाला होता. तोरस्कर चौकात तो आला असता त्याने समोरून जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून दुचाकीवरून आलेल्या सचिन चौगुलेची व त्याच्या दुचाकीची धडक झाली. विनायक चौगुले हा जागीच ठार झाला. तर जखमी सचिन चौगुले याला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले आहे.