बालविवाह करणार नाही, बालविवाह करू देणार नाही अशी सामुदायिक शपथ घेतानाच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा आणि स्त्रीजन्माचे स्वागत करण्याचा निर्धार शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी केला. निमित्त होते येथील बालविवाह प्रतिबंधक समिती व अकोले तालुका पत्रकार संघाने पत्रकारदिनाच्या पार्श्र्वभूमीवर आयोजित केलेल्या बालविवाहविरोधी जनजागरण मोहिमेच्या शुभारंभाचे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुधा कांकरिया होत्या. प्रारंभी समितीचे अध्यक्ष श्रीनिवास रेणुकदास यांनी मागील वर्षभरात तालुक्यात बालविवाह प्रतिबंधक समितीने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. वर्षभरात तालुक्यात १०५ बालविवाह रोखण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. तालुक्यातील गावागावांत शाळेशाळेत ही मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. कांकरिया म्हणाल्या, बालविवाहाचा प्रश्न, हुंडा, कुपोषण, महिलांवरील अन्याय, अत्याचार असे अनेक प्रश्न आज समाजाला भेडसावत आहेत. हे सर्व प्रश्न एकमेकात गुंतलेले आहेत. मागील तीस वर्षांत देशात दीड कोटी भ्रूणहत्या करण्यात आल्या. तीर्थक्षेत्र असणा-या मातेच्या उदराला स्मशानभूमी करण्याचे महापाप केले गेले. विविध कवितांचे प्रभावीपणे सादरीकरण करीत त्यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचे, बालविवाहास नकार देऊन आपणच आपले भविष्य घडविण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. बालविवाह रोखणे हे पुण्यकर्म असल्याचे सांगतानाच पत्रकार संघ व बालविवाह प्रतिबंधक समितीने यासंदर्भात केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. शाळा-शाळांमध्ये कन्या जन्माचा आनंद सोहळा साजरा झाला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या न करण्याची शपथ दिली.
 शुभदा आवारी, प्रा. बीना सावंत, सुभाष खरबस यांनीही या वेळी मनोगते व्यक्त केली. समितीने तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे या वेळी डॉ. कांकरिया यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.