कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील पाणीप्रश्नी जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचा आरोप करीत रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत येऊ न अधिका-यांना घेराव घालत तोडफोड केली. कार्यकारी अभियंत्यांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. या प्रकरणी प्रशासनाच्या वतीने संबंधित आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात चालू होते.
देवराष्ट्रे येथे दलित वस्तीतील दोन गल्ल्यांना पाणीपुरवठा सुरळीत होत  नसल्याचा आंदोलकांचा आक्षेप होता. या प्रकरणी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे तालुका अध्यक्ष महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली १० ते १५ कार्यकत्रे जाब विचारण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात आले होते.  पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.जी.सादिलगे यांना त्यांनी विचारणा केली.  त्या वेळी अधिकाऱ्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता कार्यकत्रे किती दिवस ऐकायचे असे म्हणत संतप्त झाले. कार्यालयातील खुच्र्याची मोडतोड करीत कागदपत्रांची फेकाफेकी केली. श्री. सादिलगे यांना जाब विचारीत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. तत्काळ पोलिसांना पाचारण केल्यानंतर हा प्रकार शांत झाला.
दरम्यान, याबाबत कार्यकर्त्यांची अरेरावी सहन केली जाणार नाही.  कोणत्याही स्थितीत प्रशासनाची शिस्त मोडण्याचे अधिकार कोणालाही दिले जाणार नाही असे म्हणत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी रीतसर कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी संबंधित आंदोलकांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.