सप्तशृंगी इमारतीच्या बांधकामासाठी महापालिका, नगररचना विभाग यांनी सहकार्य केल्यास सप्तशृंगी इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मागील वर्षी जून महिन्यात फटाक्याच्या दारूच्या स्फोटाने कोसळलेल्या सप्तशृंगी अपार्टमेंटच्या जागी नवीन इमारतीचे भूमीपूजन शुक्रवारी भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
२०११ मध्ये जूनच्या पहिल्याच आठवडय़ात पंचवटीतील तारवालानगरमध्ये असलेली सप्तशंृगी इमारत दारूच्या स्फोटामुळे संपूर्णत उद्ध्वस्त झाली. त्यामुळे इमारतीतील बारा कुटुंब रस्त्यावर आले. त्यावेळी घटनास्थळी भेट देणाऱ्या राजकीय नेत्यांनी त्वरीत नवीन इमारत उभी करण्यास सहकार्य करण्यापासून तर कुटुंबांच्या निवाऱ्यापर्यंत सर्व प्रकारचे आश्वासन दिले होते. जवळच असलेल्या मेरी वसाहतीत रहिवाशांना तात्पुरता निवारा देण्यात आला होता. घटनेला दीड वर्षांचा कालावधी उलटूनही प्रशासकीय पातळीवर त्यांच्या मदतीसाठी कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने रहिवाशांनी स्वत:च पुढाकार घेऊन इमारत पूर्णपणे नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला.
इमारतीच्या भूमीपूजनासाठी पालकमंत्री भुजबळ यांच्यासह शहर परिसरातील आमदार, नगरसेवक यांनाही पाचारण करण्यात आले. अपेक्षा एवढीच की, राजकीय पुढाकाराने तात्पुरत्या निवासाची काही व्यवस्था व्हावी. परंतु या कार्यक्रमातही कोणतेच आश्वासन त्यांना मिळाले नाही. भुजबळ यांनी इमारतीच्या अपघाती घटनेला उजाळा दिला. या घटनेमुळे कुठलाही दोष नसतांना येथील रहिवासी रस्त्यावर आले. त्यांनी अपघातानंतर वाढीव एफएसआयची मागणी केली. अशा अपघाताची पुनरावृत्ती जर राज्यात कुठेही झाली तर कोणीही वाढीव एफएसआय मागेल. यामुळे बऱ्याच पाठपुराव्यानंतर सरकारकडून वाढीव टीडीआर देण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम दिवाळीच्या आत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास आ. जयंत जाधव, आ. उत्तम ढिकले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कोशिरे, नगरसेवक रूची कुंभारकर, दामोदर मानकर, कैलास कमोद आदी मान्यवर उपस्थित होते. दीड वर्षांत राजकीय मंडळींकडून केवळ आश्वासनांची बरसात झाली. प्रत्यक्ष कृती कोणीच केली नाही. परिणामी आता आम्ही स्वखर्चाने नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
आधी घरासाठी पाच ते सहा लाखाचे कर्ज काढले.  आता नवीन घरासाठीही प्रत्येकी आठ ते दहा
लाख रूपये खर्च येत आहे. इमारत पूर्ण होईपर्यंत आमच्या निवाऱ्याचे काय, याविषयी कोणीही बोलत
नाही, असा त्रागा तेथील रहिवाशांनी केला.