हिंदी सिनेमा आणि प्रेमकथा यांचे नाते अतूट आहे. प्रेमकथापट कितीही आले, त्यात तोच तोचपणा असला तरी हमखास प्रेक्षकवर्ग आहे हे बॉलीवूडवाले कधी विसरत नाहीत. अनेक प्रेमकथापट, त्यातील गाणी, प्रमुख भूमिकेतील जोडी, त्यांचे वागणे-बोलणे असा एक ठरीव फॉम्र्यूला स्वीकारूनच प्रेक्षक ते चित्रपट पाहतो. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर यात काही नावीन्य नव्हते हे स्वत:च्या मनाशी म्हणत तो चित्रपट विसरून जातो. ‘लुटेरा’ या सिनेमात दिग्दर्शकाने जुन्या जमान्यातील प्रेमकथा दाखवायचे ठरविले आणि प्रेमातील नि:शब्दता, शांत रस आणि त्याला कारुण्याची झालर अशा पद्धतीची प्रेम शोकान्तिका कॅमेऱ्याचा सुंदर वापर करून पडद्यावर सादर केली आहे. निसर्गाची रूपं आणि प्रेम यांचे नाते दाखविण्याचाही छान प्रयत्न केला आहे. प्रेमी जोडप्यातील हळुवार प्रेमाची झलक दाखविणारा हा सिनेमा मनात घर करून राहतो, चटका लावून जातो.
१९५० च्या दशकातील बंगालमधील जमीनदार रॉयचौधरी, त्याची कन्या पाखी (सोनाक्षी सिन्हा) यांचे सुखवस्तू, श्रीमंत जमीनदारी पद्धतीचे जीवन सुरू आहे. पाखीला लिखाणाची आवड आहे. शांतीनिकेतनमध्ये शिकून आल्यानंतर आपल्या आलिशान पिढीजात वाडय़ात बसून कथा लिहित बसते. पुरातत्त्वशास्त्रज्ञ वरुण श्रीवास्तव (रणवीर सिंग) जमनीदार रॉयचौधरी यांना भेटायला येतो. भरपूर जमीन असलेल्या जमीनदार रॉयचौधरी यांच्या पिढीजात मंदिराखालच्या जमिनीत उत्खनन करून काही दुवे हाती लागतात का याचा शोध घेण्यासाठी येतो. जमीनदारांच्या घरी येत असतानाच पाखी आणि वरूणची अचानक भेट घडते. नजरानजर होते. रात्री घरी जेवायचे आमंत्रण वरूणला मिळते. नजरानजर, पाखीचा खोडकरपणा, तिच्या एकाकी आयुष्यात हळूच प्रवेश करून वरूण-पाखी यांचे प्रेम फुलते. ते लग्न करायचेही ठरवितात. पण.. पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणून आलेला वरूण जमीनदाराची संपत्ती लुटून निघून जातो आणि सिनेमा एका अनपेक्षित वळणावर येतो. मध्यांतरानंतर पाखी-वरूण पुन्हा एकदा अशा विचित्र समयी भेटतात की तेव्हा त्यांच्या प्रेमाला कारुण्याची झालार लाभलेली असते. ‘उडान’ या आपल्या पहिल्याच सिनेमातून विक्रमादित्य मोटवाने यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याला दाद मिळाली होती. त्यामुळे ‘लुटेरा’कडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. पन्नासच्या दशकात जमीनदारी संपुष्टात आली, विलासी-श्रीमंत जमीनदारांना वास्तव स्वीकारणे खूप कठीण गेले. या सिनेमातही काळ बदलल्याची जाणीव जमीनदार रॉयचौधरी यांना होत नाही असे दाखवून दिग्दर्शकाने त्या कथानकात वरूण श्रीवास्तवसारखा तरुण जमीनदाराची संपत्तीही लुटतो आणि पाखीचे हृदयही चोरतो याची सांगड घातली आहे. सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक ओ हेन्री यांच्या ‘द लास्ट लीफ’ या लघुकथेवर आधारित हा सिनेमा असून मध्यांतरात त्याची प्रचीती मिळते. बंगाल आणि डलहौसी येथे चित्रित झालेला हा सिनेमा आहे. कथानकात खूप नावीन्य नसले तरी प्रेमातील नि:शब्दता, शांत रस आणि कॅमेरा, वेशभूषा, ध्वनी यांच्या योग्य हाताळणीद्वारे निश:ब्द, करूण प्रेमकथा दिग्दर्शकाने सादर केली आहे. नेत्रसुखद डलहौसी, निसर्गाची विविध रूपं, त्याचा पाखी-वरूण यांच्यातील नात्याशी असलेला संबंध यातून सिनेमा खूप काही बोलतो. अतिशय कमी पण मार्मिक संवाद हेही सिनेमाचे वैशिष्टय़ ठरावे. साचेबद्ध हिंदी सिनेमाची चौकट मोडून प्रेमकथापट सादर करण्यासाठी दिग्दर्शकाला गुण द्यायला हवेत. रणवीर सिंग आणि मुख्य म्हणजे सोनाक्षी सिन्हा यांचा अभिनय हे सिनेमाचे बलस्थान आहे. सोनाक्षी सिन्हाने चेहऱ्यावरच्या नुसत्या हावभावांतून आणि डोळ्यांतून केलेला अभिनय, पाखीचे कारुण्य चांगल्या प्रकारे दाखविले आहे. देव आनंदच्या चित्रपटातील दृश्यांप्रमाणे तलावाकाठी बसलेले वरूण-पाखी हे दृश्य, एकंदरीत सिनेमाला लाभलेली लय, अप्रतिम संगीत, उत्तम ध्वनी संकलन यामुळे सिनेमा श्रवणीय आणि नेत्रसुखद ठरतो.
लुटेरा
निर्माते – शोभा कपूर, अनुराग कश्यप, एकता कपूर, विकास बहल
कथा-दिग्दर्शन – विक्रमादित्य मोटवाने
पटकथा – भवानी अय्यर, विक्रमादित्य मोटवाने
छायालेखन – महेद्र जे. शेट्टी
संकलन – दीपिका कालरा
वेशभूषा – सुबर्णा राय चौधरी
गीते – अमिताभ भट्टाचार्य
संगीत – अमित त्रिवेदी कलावंत – रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा, आदिल हुसैन, विक्रांत मासे, शिरीन गुहा, प्रिन्स हेयर,
आरिफ झकेरिया