दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यात १७७ साखळी पद्धतीचे सिमेंट नालाबांध निर्माण करण्यात आले असून या सिमेंट नालाबांधांमुळे १४१४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या सिमेंट नालाबांधांचा लोकार्पण सोहळा येत्या रविवारी, ९ जून रोजी होणार आहे.
सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी येथे सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते, तर मंगळवेढा तालुक्यातील चिक्कळगी येथे आमदार भारत भालके यांच्या हस्ते या साखळी पद्धतीच्या सिमेट नालाबांधाचे लोकार्पण होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने साखळी पद्धतीचे सिमेंट नालाबांध बांधण्याचा कार्यक्रम आखला आहे. यात राज्यात सहा जिल्ह्य़ांतील १५ तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मागील २०१२-१३ वर्षात या कार्यक्रमासाठी शासनाने २३४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, तर चालू आर्थिक वर्षात २५० कोटींची तरतूद केली आहे. यातून राज्यात ४७४ गावांतून १४२३ साखळी पद्धतीचे सिमेंट नालाबांध निर्माण केले जात आहेत. यात सोलापूर जिल्ह्य़ात १७७ नालाबांध तयार करण्यात आले असून त्यासाठी २२ कोटी ८५ लाखांचा निधी खर्च झाला आहे. या नालाबांधांमुळे सांगोला तालुक्यात ७६४ हेक्टर तर मंगळवेढा तालुक्यात ६५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.