टिळक रोडवरील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे पुणे येथील कार्यालय ३१ जुलैपासून सुरू होत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या या कार्यालयात महामंडळाच्या सर्वप्रकारच्या उपक्रमांचे कामकाज सुरू राहणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी दिली.    
महामंडळाचे पुणे येथील कार्यालय बंद झाल्यामुळे सुर्वे व त्यांच्या सहकारी संचालकांवर विरोधी गटातून टीकेची तोफ डागली जात आहे. हे उदाहरण देऊन सुर्वे यांना महामंडळाचे कामकाज व्यवस्थित चालविता येत नाही, असा आरोपही केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर सुर्वे म्हणाले, पुणे येथील कार्यालय आमच्यामुळे बंद पडले नाही. तर तेथे काम करीत असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या उद्धटपणामुळे बंद पडले आहे. मुळात हे कार्यालय अन्य एका कार्यालयामध्ये सुरू होते. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडेच महामंडळाचे कामकाज सोपविले होते. पण हा कर्मचारी महामंडळाच्या कामानिमित्त आलेल्या लोकांना व्यवस्थित उत्तरे देत नव्हता. चित्रपटाची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या निर्मात्यांना कशाला नोंदणीच्या भानगडीत पडता, वेळ संपली आहे, नंतर या अशी दुरुत्तरे करीत होता. चित्रपटसृष्टीशी त्याचे संबंध चांगल्याप्रकारचे नव्हते. पुण्यामध्ये झालेल्या ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमामध्ये त्याने कसलाही सहभाग नोंदवला नाही. उलट कार्यक्रमाच्या ट्रॉफी त्याने मोहन कुलकर्णीच्या मार्फत पाठवून दिल्या होत्या. अखेर त्याच्या वागण्यामुळे कार्यालय बंद राहिले. त्यामुळे कार्यवाह सुभाष भुरके, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी तेथील साहित्य कोल्हापूरला परत आणले होते.     
पुणे कार्यालय हे महामंडळाच्या स्थापनेनंतर सहा महिन्यांतच सुरू झाले होते. गेली ३० वर्षे ते कोणाच्या तरी कार्यालयात, बंगल्यात अशा वेगवेगळय़ा ठिकाणी भरविले जात होते. पुण्यात महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय असावे, असे आमच्या सर्वाचे स्वप्न होते. आता ते ३१ जुलै रोजी साकारले जात आहे. चिंतामणी अपार्टमेंट, पहिला मजला, टिळक रोड, न्यू इंग्लिश स्कूलसमोर, सदाशिव पेठ, पुणे हा महामंडळाचा नवीन व कायमस्वरूपी पत्ता राहणार आहे. या कार्यालयात महामंडळाने तयार करून घेतलेले सॉफ्टवेअर कार्यान्वित केले जाणार आहे. तेथे मुंबई, कोल्हापूरप्रमाणे संपूर्ण कामकाज संगणकावर चालणार आहे. सभासद नोंदणी, बँकिंग कामकाज, लोकांच्या तक्रारी, ना हरकत प्रमाणपत्र अशा सोळा उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. यापुढे पुणे कार्यालयातून चित्रपटविषयक कोणत्याही कामाची उणीव राहणार नाही, याची दक्षता महामंडळ घेत आहे, असे सुर्वे यांनी सांगितले.