दूधगंगा नदीपात्रात असलेली सुमारे पावणेआठ फूट लांबीची व दीडशे किलो वजनाची मगर शुक्रवारी करनूर (ता. कागल) येथील वनमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर पकडली. गेली काही वर्षे ही मगर नदीपात्रात विविध गावच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीला येत होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे मगर सुपूर्द करण्यात आली असून त्यांनी ती चांदोली धरण परिसरात सोडणार असल्याचे सांगितले. दूधगंगा नदीकाठी असलेल्या सुळकुड, वंदूर, मौजे सांगाव, लिंगनूर दुमाला, कोगनोळी, करनूर आदी गावातील नदीकिनारच्या शेतकऱ्यांना एक मगर गेली काही वर्षे दिसत होती. तिचा थेट उपद्रव नसला तरी तिच्या अस्तित्वामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. शुक्रवारी सकाळी करनूर गावातील बशीर शेख हा युवक मासेमारी करण्यासाठी गेला होता. त्याने टाकलेला गळ खेचला असता त्याला पाण्यात मगर असल्याचे आढळले. त्याने ही माहिती गावातील वनमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिली.
वनमित्रचे विनोद आडके, सचिन घोरपडे, अशोक शिराळे, राजेंद्र घोरपडे, कुमार पाटील, प्रकाश पाटील, महंमद शेख, जयवंत चव्हाण, युनूस शेख, रमेश कांबळे यांनी नदीपात्राबाहेर आलेल्या मगरीला जाळे टाकून शिताफीने पकडले. या प्रयत्नात त्यांना तासभर परिश्रम करावे लागले. दोरखंडाने बांधलेली मगर बसस्थानक येथील बिरदेव मंदिरासमोर एका टेबलवर ठेवली होती. ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांनी मगर पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर करनूरमध्ये सहायक वनसंरक्षक विजय भोसले, श्री. धामणकर, वनपाल ए. एस. निपाणीकर, वनक्षेत्रपाल निंबाळकर, दत्तात्रय टिकले, धोंडिराम पिष्टे, रवी पोवार आदी कर्मचारी आले होते. दोरखंडाने बांधलेली मगर जीपमध्ये घालून ते सर्वजण चांदोलीकडे रवाना झाले.