सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील ५१ जणांची सुमारे ८ कोटींची स्थावर मालमत्ता मिळकत कुपवाडच्या खासगी सावकाराने गिळंकृत केली असून, या सावकाराला त्याच्या साथीदारासह ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी शनिवारी पत्रकार बठकीत दिली. गरजू लोकांना मासिक १० टक्के व्याजदराने कर्ज देऊन त्या बदल्यात या सावकाराने जमिनी बळकावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शंकर शामराव चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सांगली पोलिसांनी कुपवाड येथील राजेंद्र बाबूराव जाधव (वय ४०) आणि त्याचा सहकारी भोला शिवाजी जाधव (वय ४३) या दोघांना शुक्रवारी अटक केली होती. चव्हाण यांनी सावकार जाधव याच्याकडून ५ लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करूनही आईच्या नावे असणा-यामहापालिका क्षेत्रातील १३ हजार चौरस फुटाचा भूखंड खरेदी करून दे अन्यथा २५ लाख रुपये दे, असा तगादा सावकाराने लावला होता. घरी जाऊन लोखंडी सळी व पाईपने रात्री अपरात्री फिर्यादी शंकर चव्हाण व भाऊ यशवंत यांना मारहाण केली होती. एका गाडीत जबरदस्तीने बसवून सब रजिस्टर कार्यालयात नेऊन मालमत्ता खरेदी करून घेतली. या संदर्भात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. दोघांना अटक करून त्यांच्याकडील मारूती मोटार एम.एच. १० व्ही.ए. ३८३५ जप्त करण्यात आली.
सावकार राजेंद्र जाधव व त्याचा सहकारी भोला जाधव यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी राजेंद्र जाधव यांच्या घराची झडती घेतली असता ५१ लोकांचे नोंदणीकृत दस्त मिळून आले. या लोकांच्याकडून खरेदी घेणार म्हणून राजेंद्र जाधव आणि त्याच्या कुटुंबीयातील चत्राली बाबूराव जाधव, अमर राजेंद्र जाधव, शोभा राजेंद्र जाधव आदींची नावे आहेत. एकाच कुटुंबाने ५१ लोकांच्याकडून स्थावर मिळकती खरेदी केल्या आहेत. काही मिळकती तर खूषखरेदी, विनामोबदला खरेदी, वटमुखत्यारपत्र अशा पध्दतीने खरेदी करण्यात आल्या आहेत. या जमिनी सांगली जिल्ह्यातील तासगाव, येळावी, पलूस, वालनेसवाडी, कुपवाड, सातारा जिल्ह्यातील कराड, कोल्हापूर जिल्ह्यातील  हुपरी, चिपरी आणि बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी व बेळगाव आदी ठिकाणच्या आहेत. २००८ ते २०१३ या कालावधीत या जमिनींचे व्यवहार झाले असून कागदोपत्री याचे व्यवहार १ कोटी २५ लाखांचे असले तरी बाजार भावाने या जमिनींची किंमत ७ ते ८ कोटी रुपये असल्याचे अधीक्षक सावंत यांनी सांगितले.
या व्यवहारात संबंधित स्टॅम्पव्हेंडर, नोंदणी कार्यालय यांच्याकडे चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगून सावंत म्हणाले, एकाच दिवशी चार चार खरेदी पत्रे होतात हे संशयास्पद आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खरेदी होत असताना आयकर विभागाने चौकशी केली की, नाही याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासगी सावकाराकडून होणारी पिळवणूक नागरिकांनी पुढे येऊन निर्भयपणे सांगावी असे आवाहन करून सावंत यांनी सांगितले की, सावकार जाधव यांनी गिळंकृत केलेल्या मालमत्ता पुन्हा मुळमालकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.