किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दुसरे पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन ३१ जानेवारी रोजी होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांची निवड करण्यात आली आहे. ‘जलसंवेदना’ संमेलनाचा मुख्य विषय असून घोले रस्त्यावरील न्यू आर्ट गॅलरी येथे हे संमेलन होणार आहे.
साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी आणि आशयचे वीरेंद्र चित्राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्ष डॉ. माधवराव चितळे यांचे बीजभाषण होणार आहे. ‘मराठी साहित्यातील जलसंवेदना’ या विषयावर डॉ. अरुणा ढेरे यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतरच्या सत्रात रेखा बैजल आणि सुरेखा शहा यांच्याशी डॉ. माधवी वैद्य संवाद साधणार आहेत. दुपारच्या सत्रात जलसाक्षरता या विषयावर ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे भाषण होणार आहे. प्रसिद्ध कवी-गीतकार गुरू ठाकूर यांचा कविता-गीते आणि त्यांनी चितारलेली निसर्गविषयक छायाचित्रे यावर आधारित ‘जलिबब’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार असून त्यामध्ये कवयित्री डॉ. संगीता बर्वे आणि गायक चंद्रकांत काळे यांचा सहभाग आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि पाणी या विषयासाठी वाहून घेत जलसंवर्धनाच्या क्षेत्रात मूलभूत काम करणारे अनुपम मिश्र यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा समारोप होणार आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांचा ८० व्या वर्षांनिमित्त सत्कार करण्यात येणार आहे.
हे संमेलन सर्वासाठी खुले असून प्रवेशासाठी कोणतेही शुल्क नाही. मात्र, उपस्थितांसाठी नावनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी डॉ. माधवी वैद्य (मो. क्र. ९८२२०३६५४४) किंवा प्रा. मििलद जोशी (मो. क्र. ९८५०२७०८२३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. किलरेस्कर वसुंधरा महोत्सवांतर्गत दहा ठिकाणी विभागीय पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती वीरेंद्र चित्राव यांनी दिली.